महिला कितीही सुशिक्षित, कर्तबगार झाल्या तरी त्यांची पात्रता त्यांच्या दिसण्यावरून, कपड्यांवरूनच ठरवली जाते. विविध स्तरांतील स्त्रिया अशा सामाजिक अनिष्ट समजुतींना बळी पडत असतात. अनेकजण याविरोधात बोलणं टाळतात, मात्र काहीजणी याविरोधात खुलेआमपणे आपलं मत मांडतात. असाच प्रकार ऑस्ट्रेलियातील एका टीव्ही न्युज अँकरसह घडला आहे. तिच्या कपड्यांवरून तिला ट्रोल करणाऱ्यांना तिने चोख शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

ऑस्ट्रेलिअन पत्रकार नरेल्डा जेकब्सने एका शोदरम्यान घातलेल्या कपड्यावरून तिला ट्रोल केलं गेलं. तिच्या पोशाखाला अयोग्य म्हटलं गेलं. यासाठी तिला काहीजणांनी मेलही केले. या ट्रोलिंगला कंटाळून तिने ट्रोलर्सला चोख उत्तर दिलं आहे. यासंदर्भात तिने तिच्या त्या पोशाखाचा फोटो टाकून तिच्या ट्रोलर्सचेही स्क्रीनशॉट शेअर केला आहे. “बातम्या वाचण्यासाठी घातलेले कपडे अयोग्य आहेत. क्लिवेज हे नाईटक्लबसाठी असतात”, असा मेल तिला प्राप्त झाला होता. तिने या मेलवरील टीकेला इंस्टाग्रामच्या माध्यमातून चोख उत्तर दिलं आहे.

तिने म्हटलंय की, “होय आम्हाला अजूनही असे ईमेल मिळत आहेत. होय, असे ईमेल न्युजरुममधील सर्वांपर्यंत पोहोचले आहेत. होय, मी त्यावेळी ऑन एअर होते. होय मी लज्जास्पद आणि अपमानित झाले आहे, पण माझ्या कपड्यांमुळे नाही तर तुमच्या मेलमुळे.”

जेकब्सच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटलंय की, “नेहमीप्रमाणे आश्चर्यकारक, माहितीपूर्ण आणि बुद्धिमान”. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, “नेहमीप्रमाणेच अगदी आश्चर्यकारक दिसत आहात! फक्त फिडबॅक अयोग्य आहे.”

“लव्ह यू नरेल्डा! ते कुठे काम करतात हे शोधून त्यांना काही कंपनीतर्फे अभिप्राय पाठवणे चांगले नाही का? असंही एका वापरकर्त्याने म्हटलंय.

हेही वाचा >> “तू गरोदर दिसतेयस”, बॉडी शेमिंगविरोधात अँकरने दिलं अंतर्मुख करणारं उत्तर! दिसण्यावरून डिवचण्याआधी हे वाचाच!

कॅनेडिअन अँकरनेही दिलं होतं चोख प्रत्युत्तर

गेल्यावर्षी एका कॅनेडिअन अँकरही अशाच पद्धतीने बॉडी शेमिंगला बळी पडली होती. लेस्ली हॉर्टनला ही टीव्ही न्युज अँकर आहे. तिला हॉर्टन यांनी एक ईमेल पाठवला. त्यात म्हटलं होतं की, “तुमच्या गरोदरपणाबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्ही असेच जुन्या बस ड्रायव्हरच्या पॅन्ट घालत राहिलात तर तुम्हाला अशाच ईमेलची अपेक्षा करावी लागेल.” अशा पद्धतीचा ईमेल आल्यावर एखाद्या महिलेचं मानसिक खच्चीकरण होईल. तिला आपलं काम सोडून द्यावंसं वाटेल. पण लेस्लीने अत्यंत खिलाडूवृत्तीने या ईमेलला प्रत्युत्तर दिलं. ती ग्लोबल न्यूज मॉर्निंग कॅल्गरीवर चॅनेलवर बातम्या प्रसारित करण्याचं काम करते. तिने नेहमीप्रमाणे आपलं काम सुरू केलं. बातम्या देत असतानाच तिने या ईमेलबाबत बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली की, मला आज एक ईमेल आला. त्यात मी गरोदर दिसत असल्याचं म्हटलंय. तसंच, मी बस ड्रायव्हरप्रमाणे पॅन्ट घालून सोडून दिलं नाही तर तुम्हाला अशा ईमेलची अपेक्षा करावी लागेल. पण या मेलसाठी धन्यवाद.

ती पुढे म्हणाली, मी गरोदर नाही. कर्करोगामुळे गेल्यावर्षी माझे गर्भाशय काढण्यात आले. त्यामुळे माझ्या वयाच्या स्त्रीया अशाच दिसतात. हे जर तुमच्यासाठी आक्षेपार्ह असेल तर ते दुर्दैवं आहे. तुम्ही पाठवलेल्या ईमेलबद्दल विचार करा, असाही सल्ला तिने पुढे दिला.