होळीचे अनेक रील्स आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दरम्यान नोएडामध्ये चालत्या स्कुटीवर स्टंट करताना आणि अश्लील पद्धतीने होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली असून अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आता याप्रकरणी दोन मुली आणि एका मुलाला अटक करण्यात आली आहे.

नोएडा पोलिसांनी सेक्टर १५ मेट्रो स्टेशनजवळ व्हिडीओ बनवणाऱ्या प्रीती, विनीता आणि पियुष या तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या या तिघांनी सेक्टर ७८ मध्ये अश्लील व्हिडीओ बनवला होता. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादंवि २७९, २९०, २९४, ३३६, ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले.

इतकंच नाही तर दिल्ली मेट्रोमध्ये होळी खेळणाऱ्या या मुलींचा व्हिडीओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोन्ही मुली अश्लीलतेसह होळी खेळताना दिसत आहेत. ‘गोलियों की रासलीला-रामलीला’ या बॉलीवूड चित्रपटातील ‘अंग लगा दे रे’ या गाण्यावर डान्स केला. व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी नाराजी व्यक्त केली. एवढेच नाही तर वाहतूक विभागाने कारवाई करत स्कूटरवर व्हिडीओ बनवल्याबद्दल ४७,५०० रुपयांचा दंड ठोठावला. स्कूटर मालकाला एकूण ८०,५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

(हे ही वाचा:महिला सजग! आरोग्य विमा काढणाऱ्या महिलांचे वाढले प्रमाण, गतवर्षीच्या तुलनेत ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ)

या दोन मुली आणि हा मुलगा कोण आहे?

प्रीती उत्तराखंडची आहे, विनीता नोएडामध्ये राहते आणि पियुष दिल्लीचा आहे. ते काही दिवसांपासून व्हिडीओसाठी एकत्र काम करत आहेत. मात्र, त्यांच्या अलीकडच्या होळीच्या थीमच्या व्हिडीओने ते अडचणीत आले आहेत. इन्स्टाग्रामवर प्रीतीचे दोन अकाउंट आहेत. पहिल्याचे ४० हजार फॉलोअर्स आहेत, तर दुसऱ्याचे तीन लाख फॉलोअर्स आहेत. यूट्यूबवरही दोन चॅनेल आहेत, ज्यामध्ये पहिल्याचे एक लाख तर दुसऱ्याचे साडेआठ लाख फॉलोअर्स आहेत.

प्रीतीने सांगितले की, ती फक्त व्हिडीओ बनवण्यासाठी दिल्लीत राहते आणि तिचे बहुतेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रीती आणि विनीताची ओळख काही दिवसांपूर्वीच झाली. त्यानंतर प्रीती, पियुष आणि विनीताने एकत्र येत रिल्स बनवण्याचा निर्णय घेतला. प्रीतीप्रमाणेच विनीताही इन्स्टाग्रामवर रिल्स बनवते. तिच्या पहिल्या व्हिडीओला दोन लाख व्ह्यूज आले. त्यामुळे तिने रिल्स बनवण्याचा निर्णय घेतला. कंटेंट निर्मितीची तिची आवड टिकवून ठेवण्यासाठी ती छोटी नोकरीही करत आहे. पियुष या जोडीला रील शूट करण्यास मदत करतो आणि काहींमध्ये अभिनयदेखील करतो. त्याचे फक्त बारावीपर्यंतच शिक्षण झाले आहे. छोट्या नोकऱ्यांमधून तो दरमहा सहा हजार ते सात हजार रुपये कमावतो.

प्रीती म्हणाली की, ती आठ महिन्यांपूर्वी पियुषला भेटली होती तर विनीता तिला फक्त १५ दिवसांपूर्वी भेटली होती आणि त्यानंतर त्यांनी एकत्र व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. आज तकच्या वृत्तानुसार, नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी लावलेला दंड भरण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. त्यांनी आपली चूक मान्य केली आणि दंड भरण्यास असमर्थता व्यक्त केली. आपला उद्देश स्टंट करण्याचा नसून इंस्टाग्राम रिल्स बनवण्याचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मेट्रो आणि स्कूटीवरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आम्ही कुठलाही स्टंट करत नव्हतो तर रील बनवत होतो. आम्ही माफी मागतो. एवढे मोठे चलान आम्ही भरू शकत नाही. आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत. भविष्यात असे करणार नाही, अशी प्रतिक्रिया दोन मुलींनी दिली आहे.