प्राची पाठक

आयुष्यात अनेक प्रसंग असे येतात, जेव्हा नेमके निर्णय घ्यावे लागतात. कोणाकडे गेलं की चहा हवा, की कॉफी, की सरबत, या प्रश्नाचं उत्तर देता येणं, हा सुद्धा एक निर्णयच असतो! वरवर हा प्रश्न सोपा वाटतो. त्याने झालंच नुकसान तर आपलंच होईल, त्यात धोका काही नाही, म्हणून आपण निवांत असतो. या निर्णयाचं टेन्शन आपण घेत नाही. तरीही अनेकदा अनेक लोक या प्रश्नालादेखील ‘काहीही चालेल’ असा सोपा मार्ग उत्तर म्हणून निवडतात! त्याने समोरच्याला नेमकं काहीच कळत नाही! मग पुढचे प्रश्न येतात. त्यापेक्षा दिलेल्या पर्यायातून नेमकं उत्तर देता येणं, नेमका निर्णय घेता येणं, याचा सराव अशाच छोट्या छोट्या प्रसंगातून करता येईल.

आयुष्यात अनेक प्रसंगात स्त्रिया निर्णय घ्यायला घाबरतात. शाळेतली गंमत आठवते? वर्गातल्या कोणी साधी पेन्सिल जरी मागितली, तरी “आई नाही म्हणते, बाबा नाही म्हणतात,” अशी उत्तरं द्यायचो आपण अनेकदा! समोरचा पेन्सिल घेऊन काही पळून जाणार नसायचा. पद्धतशीरपणे मागितलेली असायची ती पेन्सिल. विसरला असेल तो! त्याच्या पेन्सिलीचं टोक तुटलं असेल. आजच्या पुरती वापरून देईल परत. पण नाही. बरं, थेट नकार न देता, “मी” नाही देणार हे न सांगता आपण आई-वडिलांचं नाव पुढे करून उत्तरे द्यायचो! कोणाच्या तरी छत्रछायेखाली जायची, इतरांच्या निर्णयामागे लपायची सवय लागते ती अशीच छोट्या छोट्या प्रसंगांतून. मग “अमुक शिकायला, नोकरी करायला नवरा नाही म्हणतो”, “सासरे नाही म्हणतात”, “वडील/भाऊ नाही म्हणतात”, “सासूचा विरोध”, असं एकापाठी एक सुरूच होते! कुठं जायचं असेल, तरी कोण त्याला विरोध करेल, याचीच यादी आधी अनेक बायका समोरच्याला ऐकवतात. तुमची स्वतःची अशी काही मतं/ विचार आहेत की नाहीत? ते अंमलात आणायचं धाडस करणार की नाही कधी?

हेही वाचा… आहारवेद : हृदय बलकारक दालचिनी

आयुष्यात अनेक लहान मोठे निर्णय घेण्याचे प्रसंग येतात. कितीतरी स्त्रिया, मुली ते सगळे निर्णय घरातल्या ज्येष्ठांवर- खासकरून पुरुषांवर ढकलून मोकळ्या होतात, असं आजूबाजूला पाहायला मिळतं. वडील, लहान- मोठा भाऊ, नवरा, मित्र वगैरे. म्हणजे, त्या निर्णयातून काही वाईट घडलं, तर “तुमच्यामुळे असं घडलं,” हे बोलता येतं. दुसऱ्याच्या माथी खापर फोडता येतं. वर घरातच धुमसत म्हणत राहायचं, “तरी मी सांगत होते, असंच होणार!”. अरे, मग निर्णय घ्यायची वेळ आली होती, तेव्हाच घ्यायचा की निर्णय. त्या निर्णयाची जबाबदारी घायला कधी शिकणार? मान्य आहे, अजूनही अनेक ठिकाणी स्त्रियांना “तुला काय कळतं त्यातलं?”, असंच वागवलं जातं. पण त्या वृत्तीला “मला बरंच काही कळतं”, असंच उत्तर देत सुरुवात करावी लागणार ना? ते उत्तर देता येण्यासाठी जरा चौकस व्हावं लागेल. निर्णय घेण्याची पात्रता कमवावी लागेल. खंबीर व्हावं लागेल. चुकांची जबाबदारी घ्यावी लागेल.

हेही वाचा… आपल्याच प्रेमाला ठार करण्याइतपत तिरस्कार येतो कुठून?

खरंतर, निर्णय घेता येणं, ही एक फार मस्त गोष्ट आहे. आत्मविश्वास वाढविणारी गोष्ट. जबाबदारीची जाणीव करून देणारी आणि परिस्थितीचं भान देणारी गोष्ट. ती सतत दुसऱ्याच्या खांद्यावर कशाला टाकायची? आपणही पेलून बघू की ती! अनेकदा निर्णय घेण्यातला अडसर समोरच्याचं वयदेखील असतं. वडीलधाऱ्यांचे ऐकावं, या संस्कारात आपण वाढलेले असतो. यात खरंतर स्त्रियाच असं नाही, पुरुषदेखील अनेकदा भरडले जातात. कुटुंबात एकेक सत्ताकेंद्र होऊन गेलेलं असते. ते भेदून काढावं लागतं. आपलं मत आग्रहपूर्वक सांगता येणं, प्रश्न पडणं, ते विचारायचे धाडस येणं, अगदीच समोरच्याचा अपमान असं नाही, तरीही ठामपणे मत मांडायची सवय करणं, असं करूनच हा बदल घडू शकेल. कोणत्याही लहानसहान निर्णयात “तुम्ही म्हणाल ते” ही वृत्ती सोडण्यासाठी आपली निवड आधी शिकावी लागते. निवड शिकणं म्हणजे विचार करावा लागतो. त्यासाठी आळस झटकावा लागतो. सक्रिय सहभाग घ्यावा लागतो. “मला हे जमणार नाही” हे पालुपद सोडावं लागतं. “का नाही जमणार?” असा प्रश्न पाडून घ्यावा लागतो.

मग, करायचा का प्रयत्न आपली निर्णय क्षमता जोखायचा? जमेल की हळूहळू… चहा हवा की कॉफी की सरबत, यावर नेमकं काय हवं आणि तेच का हवं, याची मनातच उजळणी करून बघू! विचारांना खाद्य तर मिळेलच, त्यांचा सर्वांगीण विचार करत ताबा मिळवायची सवय देखील होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

prachi333@hotmail.com