आज, आंतरराष्ट्रीय महिला आणि विज्ञानातील मुलींचा दिवस म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन जगभरात साजरा केला जात आहे. या दिवसाच्या निमित्ताने जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महिलांना विज्ञानाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. आजच्या काळात स्त्रिया विज्ञानाकडे वळत आहेत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. महिलांना शिक्षणासाठी आधार आणि संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या दिवसाला खूप महत्त्व आहे. जाणून घेऊया या दिवसाच्या खास गोष्टी.
काय आहे या दिवसाचा इतिहास?
११ फेब्रुवारी २०१५ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश महिला व मुलींना विज्ञान क्षेत्रात प्रगत करणे हा होता. UNESCO (युनेस्को) आणि UN Women (यू एन महिला) द्वारे आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन राबविण्यात आला. जगभरात लैंगिक समानता मिळवणे हे युनेस्कोचे प्राधान्य आहे. या दिशेने काम करत युनेस्को मुलींच्या शिक्षणासाठी मदत करते. स्त्रिया आणि मुलींना विज्ञानाच्या दिशेने समान अधिकार मिळावेत, जेणेकरून त्यांचा सहभागही वाढवता येईल, हा यामगचा मुख्य उद्देश आहे.
हेही वाचा- सर्वाधिक श्रीमंत महिला कोण? अब्जाधीश महिलांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक? जाणून घ्या!
दरवर्षी या दिवशी एक थीम ठरवली जाते आणि त्यानुसार कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिनाची थीम आयडिया (इनोव्हेट, डिमॉन्स्ट्रेट, एलिव्हेट, ॲडव्हान्स, सस्टेन) अशी ठेवण्यात आली आहे.
यू एन ए ची आकडेवारी काय सांगते?
बहुतेक देशांमध्ये, महिलांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा कमी संशोधन निधी दिला जातो. महिला सर्व संशोधकांपैकी ३३.३ टक्के संशोधकांचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या सदस्यांमध्ये केवळ १२ टक्के महिला आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक क्षेत्रात, पाच व्यावसायिकांमध्ये फक्त एक महिला आहे. महिला संशोधकांचे करिअर छोट्या स्वरुपाचे असते व त्यांना पगारही कमी असतो.
हेही वाचा- शासकीय योजना : स्त्री-उद्योजिकांना मिळणार प्रदर्शन प्रोत्साहन अनुदान
संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, २०१८ मध्ये तीनपैकी एक संशोधक महिला होती. डिजिटल माहिती तंत्रज्ञान, संगणन, भौतिकशास्त्र, गणित व अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये महिला अल्पसंख्य आहेत. ही अशी क्षेत्रे आहेत जी डिजिटल क्रांती आणि भविष्यातील अनेक नोकऱ्यांना चालना देत आहेत.