“ए सोनम, तुझे आणि देवेनचे धबधब्याखाली काढलेले फोटो सॉलिड आले आहेत हं! पुढच्या वेळी जाताना आम्हालाही सांगा. मी आणि रितेशही येऊ सोबत.” दीक्षा हे म्हणाली, आणि सोनमच्या कपाळावर आठ्या आल्या. दीक्षा गेल्याबरोबर तिनं आधी देवेनला धारेवर धरलं. “तुला काही समजतं का देवेन? एकतर तिथं पाण्याखाली आपल्या दोघांचे फोटो काढायलाच नको होतं. ते चूक होतंच आणि वर ते फोटो तू सगळ्या जगाला दाखवत काय फिरतो आहेस?”

“जगाला काय? मी फक्त दीक्षा आणि रितेशला दाखवले. ते माझे, म्हणजे आपले बेस्ट फ्रेंड्स ना?”

“पण तुला माहितेय ना, की आपलं अत्यंत खासगी आयुष्य असं दुसऱ्यांसमोर उघडं केलेलं मला नाही आवडत ते? इतर हजार गोष्टी आहेत त्या तू सगळ्या जगाला दाखव, मला काही नाही वाटणार, पण फक्त आपल्या दोघांची म्हणून काही गुपितं असावीत की नाही?”

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: सुमधुर दही

“तशा गोष्टी मी नाही सांगत.”

“असं? मागे आपण डिनरला गेलो होतो, तिथे तू मला सरप्राइज दिलंस. गिटारिस्ट आणलास, फुलं आणलीस आणि मला प्रपोज केलंस. माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा सुरेख क्षण, पण तेव्हाच तू चक्क व्हिडिओ कॉल करून तुझ्या ताईला दाखवत राहिलास. मला तो प्रसंग मोहरुन टाकत होता, मी अत्यंत आनंदात होते आणि तू दाणकन मला जमिनीवर आणलंस. थोड्या वेळानं आपण केला असता ना कॉल. मला तो क्षण मस्त जगायचा होता. इतरांना सांगण्याची तुला इतकी घाई का असते?”

हेही वाचा… समुपदेशन: नोकरी – संसार मधला बॅलन्स कसा साधाल?

“मला वाटतं, आपल्या आनंदात आपली माणसं सोबत असावीत.”

“जरूर असावीत की! पण तो प्रेमाचा क्षण जगून तर घेत जा! ”

देवेनला तिचं म्हणणं पटत होतं, पण इतर अनेक पुरुषांप्रमाणे त्याचा स्वभाव खूप चंचल होता. मनात आलं, की करून टाकलं असा. बायकांच्या भावनिक गरजा आणि भावनिक गुंतवणुकीची त्यांना पुरेशी कल्पना येत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानसीलाही असाच काहीसा अनुभव आला होता. तिच्या ‘पोस्ट ग्रॅड’ परीक्षा आटोपल्या बरोबर ती आणि मनीष त्याच्या मावशीकडे कोकणात गेले. मावशीजवळ आपल्या प्रेमाची कबुली देऊन घरच्यांचं मन वळवण्याची जबाबदारी होती. या विषयावर मावशीने प्रामाणिकपणे गुप्तता पाळली, पण मनीषनं मात्र न राहवून त्याच्या शीघ्रकोपी बाबांना सांगितलं आणि सगळा गोंधळ झाला. बाबा खूप संतापले. मावशीला देखील बरेच बोलले. शांतपणे जे मावशीनं समजावून सांगितलं असतं ते राहूनच गेलं. विषय खूप चिघळला. या सगळ्याचा मानसीला अतिशय त्रास झाला. मनीषनं थोडा संयम राखला असता तर विषय या थराला गेला नसता. मानसीला म्हणालीही, की स्त्रियांच्या मानानं पुरुष जास्त उतावळे आणि अधीर असतात. जिथे नको तिथे मूग गिळून बसतील, आणि नको तिथे बोलून जातील. अशावेळेस नाती आणि माणसं दुखावले जाण्याची शक्यता असते. अशा वेळी प्रसंग घडण्याच्या आधीच त्यांना शांतपणे विषयाच्या गुपत्तेचं गांभीर्य समजावून सांगणं गरजेचं आहे. नाहीतर होणाऱ्या परिणामांना तोंड द्यावं लागतं.

adaparnadeshpande@gmail.com