डॉ.अश्विन सावंत

आहारामधील कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्सपासून शरीराला साखर (ग्लुकोज) व ग्लुकोज पासून शरीरपेशींना उर्जा मिळते. जसे-गहू-तांदूळ आदी तृणधान्ये, तूर, मूग आदी कडधान्ये, विविध फळे, भाज्या, कंद, वगैरे. कर्बोदकांपासून मिळणारी साखर (ग्लुकोज) हा शरीराला लागणाऱ्या या उर्जेचा मुख्य स्रोत आहे. उर्जेसाठी शरीरकोषांनी वापरल्यानंतरही जी साखर शिल्लक राहते, ती यकृतामध्ये व स्नायूंमध्ये ‘ग्लायकोजेन(glycogen)’च्या स्वरुपात साठवली जाते.

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

स्वादुपिंडाविषयी…

स्वादुपिंडापासून अन्नपचनासाठी आवश्यक अशा पाचक स्रावांशिवाय ग्लुकेगॉन व इन्सुलिन हे संप्रेरक स्राव (हार्मोन्स) सुद्धा स्रवतात, ज्यांची साखरेच्या चयापचयामध्ये नितांत महत्त्वाची भूमिका असते.

इन्सुलिन(insulin)व ग्लुकेगॉन(glucagon)

रक्तामध्ये अल्प प्रमाणात इन्सुलिन असतेच, मात्र आपण अन्नसेवन करतो तेव्हा त्या अन्नामधील जेव्हा-जेव्हा साखरेचे प्रमाण रक्तामध्ये वाढते, तेव्हा-तेव्हा स्वादुपिंड अतिरिक्त इन्सुलिन रक्तामध्ये सोडते, जे रक्तामधील साखर शरीरपेशींमध्ये नेण्यास साहाय्य करते व रक्तामधील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले जाते.

जेव्हा दीर्घकाळ अन्नसेवन केले जात नाही व अन्नाअभावी रक्तामध्ये साखरेची कमी होते, तेव्हा स्वादुपिंडाकडून ग्लुकेगॉन हे संप्रेरक रक्तामध्ये सोडले जाते. ग्लुकेगॉन यकृतामध्ये व स्नायूंमध्ये साठवलेल्या साखरेचे (ग्लायकोजेनचे) रुपांतर शरीरपेशींना अनुकूल अशा साखरेमध्ये (ग्लुकोजमध्ये) करते, ज्यामुळे रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढते व शरीरपेशींना अन्नसेवन केले नसतानाही ऊर्जा मिळते. थोडक्यात काय तर स्वादुपिंडाचे हे दोन संप्रेरक मिळून रक्तामधील साखर कमी होणार नाही, याची काळजी घेतात, जेणेकरुन शरीरपेशींना साखरेची ऊर्जा नित्य मिळत राहील व उर्जेची कधी कमी होणार नाही.

इन्सुलिनच्या कार्यामध्ये बिघाड कसा होतो?

इन्सुलिनमुळेच रक्तामधील साखर शरीरकोशांना मिळते. इन्सुलिन शरीरपेशींच्या आवरणावर असणाऱ्या विशिष्ट स्वीकृती पेशीं (रिसेप्टर सेल्स)कडे साखर आत पाठवण्याची परवानगी मागते. त्या स्वीकृती पेशींनी इन्सुलिनला स्वीकारले तरच इन्सुलिन रक्तामधील साखरेला पेशींच्या आत पाठवू शकते. थोडक्यात काय तर इन्सुलिन म्हणजे रक्तामधील साखर शरीरपेशींमध्ये ढकलण्याची चावी आहे, जी चावी शरीरपेशींच्या आवरणावरील स्वीकृती कोशांवरच चालते.

इन्सुलिन प्रतिरोध (इन्सुलिन रेसिस्टन्स)

इन्सुलिनमुळे शरीरपेशींचे द्वार उघडते आणि साखर शरीरकोषात शिरते. मात्र साखरेच्या सेवनाचा अतिरेक, परिश्रमाचा अभाव, आळशी-बैठी जीवनशैली यांमुळे जेव्हा शरीरात विकृती सुरू होते, तेव्हा शरीरपेशी इन्सुलिनला जुमानत नाहीत अर्थात इन्सुलिनला विरोध करतात, ज्याला ‘इन्सुलिन प्रतिरोध’ म्हटले जाते.

त्यासाठी इन्सुलिनची चाचणी ही अतिशय महत्त्वाची चाचणी असून ती अनेक संभाव्य विकृतींची निदर्शक असू शकते. कारण इन्सुलिन प्रतिरोध ही केवळ मधुमेहच नव्हे तर पीसीओएस् सारख्या अनेक घातक विकृतींना कारणीभूत होते.

शरीरपेशी इन्सुलिनला का जुमानत नाहीत?

इन्सुलिन प्रतिरोधाच्या या विकृतीमध्ये एक गंभीर प्रश्न दुर्लक्षितच राहतो, तो म्हणजे शरीरपेशी इन्सुलिनला का जुमानत नाहीत? शरीरपेशी इन्सुलिनला जुमानत नाहीत कारण, इन्सुलिन ज्या साखरेला (ग्लुकोजला) आतमध्ये आणणार असते, ती साखर शरीरपेशींना नकोशी होते. कारण शरीरपेशींना साखरेची गरजच नसते. शरीरपेशींना ऊर्जा (एनर्जी) नको असते. ऊर्जा का नको असते? कारण फारशी कामे, परिश्रम करायचे नसतात.’ “मग हवीय कशाला ऊर्जा आणि ऊर्जा देणारी ती साखर”, असे शरीरपेशींचे सरळ गणित असते. याच अवस्थेमध्ये ती व्यक्ती जर जिभेवर ताबा न ठेवता जिव्हालौल्याने रक्तामधील साखर वाढवत असेल आणि परिश्रम मात्र शून्य होत असतील तर विकृती विकोपाला जाण्याचा धोका असतो.

आपल्या स्वतःच्या शरीराच्या संवेदना त्या व्यक्तीला कळत नाहीत हे दुर्दैव. त्या व्यक्तीला न कळणारी ती शरीराची संवेदना शरीरपेशींना मात्र नेमकी समजते. कारण साखर आत घेतलीच तरी ती आधी यकृतामध्ये, यकृताची टाकी भरली की स्नायूंमध्ये आणि स्नायू साखरेने भरून-सुजून नको म्हणू लागले की मग चरबीच्या स्वरुपामध्ये शरीरावर इथे-तिथे साठवून ठेवावी लागणार, विशेषतः मधल्या अंगावर, त्यातही पोटावर. ही अधिकची ऊर्जा, ही अधिकची साखर, साठवून ठेवलेली चरबी हीच पुढे जाऊन आपल्याला महाग पडणार आहे. याचा भुर्दंड पुढे भरावा लागणारच, तोसुद्धा घातक आजारांच्या रुपामध्ये! हे ओळखून त्या शरीरपेशी इन्सुलिनला विरोध करून रक्तामधील साखरेला आत घेण्यास मनाई करतात.

इन्सुलिन प्रतिरोधाची विकृती कोणामध्ये संभवते?

जे लोक दिवसातून निदान चार वेळा अन्नसेवन करणारे, एकाच वेळी अधिक प्रमाणात जेवणारे, आधीचे पचलेले नसतानासुद्धा पुन्हा अन्नसेवन करणारे, मैदा, साखर, दूधदुभत्यांनी युक्त विविध पदार्थांचे मनसोक्त सेवन करणारे, घरच्यापेक्षा बाहेरच्या खाण्याला प्राधान्य देणारे, दिवसातून चार वेळा चहा पिणारे, चॉकलेट, कॅन्डी, आईस्क्रीम, खारी, टोस्ट, बिस्किटे, केक्स खाणारे आणि नित्यनेमाने गोडधोड खाणारे असतात आणि कोणतीही कष्टाची-परिश्रमाची कामे करत नाहीत, जे दिवसभरातून १०० पावलेसुद्धा चालत नाहीत; अशा लोकांमध्ये ही विकृती बाहुल्याने होते. त्यामुळेच तर इन्सुलिन प्रतिरोध ही विकृती आज सर्वसामान्य झाली आहे आणि साहजिकच ही जीवनशैली जगणाऱ्या तरुण मुलींमध्ये सामान्य झाला आहे पीसीओडी हा आजार.

इन्सुलिन प्रतिरोध ही विकृती आजच्या आधुनिक समाजामध्ये एका घातक विकृती-समुच्चयाला जन्म देते, ती विकृती म्हणजे ‘मेटाबोलिक सिन्ड्रोम’. प्रत्यक्ष पीसीओएस् विषयी जाणून घेण्यापूर्वी मेटाबोलिक सिन्ड्रोम म्हणजे काय ते जाणून घेणे अगत्याचे आहे. कारण मेटाबोलिक सिन्ड्रोम हा २१व्या शतकातील मानवजातीमध्ये पेरलेला एक टाईमबॉम्ब आहे असे संशोधक सांगतात, त्याविषयी समजून घेऊ उद्या.

drashwin15@yahoo.com