सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्ये गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढ झालेली आहे. माणसाचं संपूर्ण जीवनचं अलीकडे ‘सोशल’ होतं चाललंय. दैनंदिन जीवनात एखादी गोष्ट खटकली की, त्याचे सर्रास मीम्स बनतात. आतापर्यंत वाढती महागाई, भारत-पाकिस्तान सामना, सरकारचे न पटणारे निर्णय यांसारख्या विषयांवरचे अनेक मीम्स मी वाचले आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘वुमन’ आणि पुढे एका पुरुषाचं बीभत्स हास्य अशाप्रकारचे मीम्स व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : चॉइस तर आपलाच: करियर आणि गृहिणीकामातला बॅलन्स कसा साधणार?

अलीकडच्या पिढीला ‘वुमन’ अर्थातच, एक ‘स्त्री’ जर चेष्टेचा विषय वाटत असेल, तर अशा मानसिकतेला आताच लगाम घालणं आवश्यक आहे. आजची तरुणाई देशाचं उज्ज्वल भविष्य आहे असं म्हणतात…आणि आज तिचं तरुणाई हातात कप-बशी घेऊन ‘वुमन’ बोलणाऱ्या कार्टुनवर हसते आणि स्वतःच्या आयुष्याचं कार्टुन करून घेते हे मीम्स पाहून लक्षात येतं.

‘वुमन’ मीम गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड व्हायरल झालं आहे. स्त्रियांमधील वेगळे गुण, त्यांची मतं, त्यांच्या इच्छांना करोडो लोकांसमोर ‘वुमन’ म्हणून हिणवण्यात येतं. याचं उदाहरण सांगायचं झालं, तर एक मुलगा एका मुलीला केदारनाथच्या ट्रिपबाबत संपूर्ण माहिती देतो आणि तिला अंदाजे किती खर्च येईल? तुला काय वाटतं? असे प्रश्न विचारतो. पंचतारांकित सुविधेत राहायचं असल्यास साधारण १ लाखांपर्यंत खर्च होईल असं उत्तर ती मुलगी देते. त्यानंतर तो मुलगा १० हजारांहून जास्त पैसे खर्च होणार नाहीत असं सांगत पुढे ‘वुमन’ मीमचा व्हिडीओ जोडून तिला हिणवतो. त्या मुलीचा अंदाज चुकू शकतो मान्य आहे. परंतु, या चुकीसाठी तिची ‘वुमन’ म्हणून चेष्टा करणं योग्य आहे का? याचं दुसरं उदाहरण द्यायचं झालं, तर बायका खरेदी करायला गेल्यावर हजार रुपयांची वस्तू दोनशे रुपयांमध्ये मागतात. हा प्रसंग रिक्रिएट करत ‘वुमन’ म्हणून त्यांना ट्रोल करण्यात आलं.

हेही वाचा : अमेरिकेमध्ये महिलेने दिला ‘मोमो’ जुळ्यांना जन्म; जाणून घ्या या दुर्मीळ गर्भधारणेबद्दल…

एवढंच नव्हे तर एका व्हिडीओ कुठेही फिरायला जाताना स्त्रियांचं सामान पुरुषांच्या तुलनेत जास्त असतं, त्या खूप खर्च करतात, मैत्रिणींना किंवा बहिणींना प्रत्येक गोष्ट फोन करून कळवतात या सवयींचं प्रासंगिक वर्णन करून त्यापुढे ‘वुमन’ मीम जोडण्यात आलं. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक महिलांनी यावर आक्षेप नोंदवला होता. याचं आणखी एक उदाहरण पाहायचं झालं, तर एखादी महिला गाडी चालवत असताना तिच्यापासून चार हात लांब गाडी चालवतोय असं भासवणं आणि महिला गाडी चालवतेय म्हणजे ती चुकीचीच चालवत असणार असं गृहीत धरून पुढे ‘वुमन’ मीम जोडलं जातंय. या अशा मीम्समुळे भावना जास्त दुखावतात, पहिल्यांदा गाडी चालवायला शिकणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. कमेंट्स वाचून हे माझ्या लक्षात आलं.

हेही वाचा : मैत्रिणींनो उद्योग-व्यवसाय करताय?… मग या ७ अर्थविषयक टिप्स वाचाच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावरील ‘Boys’च्या डोळ्यात ही २१ व्या शतकात कर्तृत्व गाजवणारी ‘Women’ एवढी खुपली तर कसं व्हायचं? हे मीम्स बनवणाऱ्यांना मला एक प्रश्न आवर्जून विचारायचा आहे तो म्हणजे, सकाळी उठून आई जेवणाचा डबा बनवते तेव्हा तुम्ही तिची ‘वुमन’ म्हणून खिल्ली उडवता का?, रात्री उशिरा आल्यावर जी बहीण दार उघडते तिच्यावर सुद्धा तुम्ही ‘वुमन’ म्हणून हसणार का? तुमच्या बायकोची भविष्यात तुम्ही ‘वुमन’ म्हणून चेष्टा करणार का? आज वुमन म्हणून खिल्ली उडवणाऱ्यांची बौद्धिक क्षमता खरंच संपली असावी असं वाटतं. शेवटी एकच सांगेन, ‘वुमन’ मीम बनवण्यासाठी तुम्ही जेवढी मेहनत घेता तेवढीच सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी घेतली तर फार बरं होईल. कारण, तुम्ही मेन…वुमनशिवाय अपूर्ण आहात.