प्रीती गरगडे
“पिल्लू आवर ग पटकन… आज मलाही ऑफिसला जायचंय. तुझ्या मागे मागे करायला अजिबात वेळ नाही हं मला…” मी जरा वैतागूनच कन्यारत्नाला म्हटलं. त्यावर मॅडमनी आपलं तोंड वाकडं करत नाराजी व्यक्त केली. ते ही ठिकच म्हणावं लागेल. कटकट तर केली नाही ना!
हो, आता माझं वर्क फ्रॉम होम संपलं आहे. आम्हाला आमच्या कंपनीने ऑफिसमध्ये येऊन काम करण्याची ‘सक्ती’ केली आहे. नाही तर नोकरीच गोत्यात येऊ शकेल, असा धमकी वजा मेल आम्हाला मागच्याच आठवड्यात मिळाला आणि कामावर हजर राहण्यासाठी आठवडाभराची मुदत.
कित्ती कित्ती आणि काय काय करणार फक्त आठवडाभरात?
गेले तीन वर्षं. घरून काम केलं… केलंच ना. कधी तक्रार करण्याची संधी दिली नाही ऑफिसवाल्यांना मग हा निर्णय का घेतला त्यांनी. जरा माझ्या सारख्या स्त्रियांचा विचार करायचा ना!
आता पुन्हा सकाळी पाच वाजता उठावं लागणार… एवढ्या दिवसांत कन्येला ‘आईच्या हातचं’ खायचं सवय लावून ठेवली आहे. मग ती लगेच तर मोडता येणार नाहीच. तर डब्याला तिच्या आवडीचं आणि शाळेत चालेल असं काही करायचं म्हटल्यावर आता सकाळच्या एक तास अधिकच्या झोपेवर पाणी सोडावं लागणार. स्वयंपाकाला मदत करणाऱ्या मावशी आणि घरकाम करणाऱ्या ताईंनाही लवकर बोलावलं आज. तर त्यांनीही थोडी कुरकुर केलीच. बरोबर आहे म्हणा त्यांचंही… त्यांनाही उशिरा येण्याची मुभा होतीच ना… मी घरीच तर होते…
लेकीच्या डब्यानंतर, तिला आजोबांबरोबर स्कूलबससाठी बाय करून झालं की नवऱ्याबरोबर शांतपणे चहाचे घोट घेत दिवसभराच्या कामांचा आढावा आणि जरा निवांत हलक्या फुलक्या गप्पांनाही आज विसरावं लागलं. त्यामुळे त्याची नाराजीही झेलावी लागलीच. बरोबरच आहे म्हणा त्याची नाराजी… इतके दिवस मी घरीच तर होते…
बाबांना आणि आईंना (सासू-सासरे) त्यांच्या मित्रमंडळींबरोबर फिरायला जायचं होतं. आषाढवारी पण थोडी वेगळी. माझ्या ‘वर्क फ्राॅम ऑफिस’ने त्यांच्या प्लॅनची वाट लावली. त्यामुळे त्यांचाही मूड ऑफ झालाय. इतक्या दिवसांत त्यांनाही सवय झालीय. असे प्लॅन करायची कारण… मी घरीच तर होते.
आज घाईतच चहा उरकावा लागला, म्हणजे उभ्यानेच चहा घेऊन आवरायला धाव घेतली. कारण आज जरा लवकरच जावं म्हटलं स्टेशनवर. कारण इतक्या वर्षांची सकाळच्या वेळेत गाडी पकडण्याची सवय मोडली आहे तर म्हटलं जरा एक दोन गाड्या सोडाव्या लागू शकतात. तर झालंही तसंच सवयच मोडली आहे, आणि ट्रेनला तोबा गर्दी पाहून नाही म्हटलं तरी धडकी भरलीच. ‘जमेल आपल्याला’ अशी मनाची समजूत घालून हिय्या करून चढले एकदाची.
ट्रेनच्या वेगाबरोबर माझे विचारही पळायला लागले. गेल्या तीन वर्षांत घराची ऑफिसची बसवलेली घडी आता विस्कटणार तर नाही… मन अगदीच उदास झालं. पिल्लूची शाळा सुरू झाली आणि त्यावेळी तिचा अभ्यास घ्यायचे तिचे आजी-आजोबा. कारण सोपा होता अभ्यास. अगदीच एखाद्या प्रोजेक्टला असायची माझी मदत. पुढे पाचवीपासून क्लास लावला तर ‘आई एवढी हुशार आणि तिला क्लास लावावा लागतो’ हे टोमणे ऐकावे लागले होते. करिअर करताना त्यातल्या वेळा, टप्पे पार करताना घर-ऑफिस सांभाळताना ओढाताण होत होती. घरात थोडाफार दुर्लक्ष झालं तर त्याचं गिल्ट वेगवेगळ्या पद्धतीने येत असायचं. कधी पिल्लूच्या चेहऱ्यावरची नाराजी, तर कधी आई-बाबांना पिल्लूसाठी अडकून पडावं लागतं म्हणून. त्यावरून नवरोबांचीही चिडचिड व्हायची. आजारपण, घरगुती समारंभ यांनाही ऑफिसच्या वेळांमुळे जाता आलं नाही. त्यामुळे घरच्यांबरोबर नातेवाईकांचेही टोमणे मी ऐकले.
लॉकडाऊन लागलं… आणि घरून काम सुरू झालं. पहिलं वर्ष सरलं. पण दुसऱ्या वर्षी प्लॅन करून अनेक गोष्टी केल्या. पिल्लूची शाळा, अभ्यास, तिच्या इतर ॲक्टिव्हिटीज याकडे लक्ष दिलं. मुख्य म्हणजे ऑफिसला जाण्यासाठी ठरावीक वेळा, ट्रेन जाण्या-येण्याचे टेन्शन नव्हते. पिल्लूला एखादी गोष्ट सांगण्यासाठी, विचारण्यासाठी मी घरी येईपर्यंत येण्याची वाट पाहावी लागत नव्हती. तिला आवडीचे पदार्थही इतरांच्या मम्मांप्रमाणेच घरी करून मिळत होते. (त्यामुळे घरातील सगळेच खूष होते.)
मधल्या काळात बाबांना बरं नव्हतं तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं. त्याकाळात त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांना हवं -नको पाहणं, आईंना धीर देणं मी घरी असल्यामुळे करता आलं. ऑफिस सुरू असताना या गोष्टी करता न आल्याची अपराधीपणाची भावना कमी झाली. माझ्या नोकरीमुळे करायची राहिलेली कित्येक शुभकार्ये आई-बाबांनी या काळात आवर्जून केली. त्यावेळी नातेवाईंक, मित्र यांच्या आगमनाने त्यांचा समाधानी चेहरा खूप काही देऊन गेला.
नातेवाईकही ‘अगं तुला वेळच नसतो ना, म्हणून या कार्यक्रमाला नाही बोलावलं,’ असं म्हणून न दुखावता आनंदाने अनेक कार्यक्रमांत सहभागी करून घेत होते. आणि मलाही जायला वेळ होता.
आई-बाबांना बाहेर जायचं असेल तर मी घरी आहे हा दिलासा त्यांना होता. पिल्लूसाठी त्यांना अडकून पडालं लागत नव्हतं. आता मी नसणार, माझं ऑफिस सुरू होत आहे हे कळल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी बरच काही सांगून गेली. परवा नवऱ्याने अतिशय वैतागून त्याच्या मित्राला, ‘अरे आता हीचं ऑफिस सुरू होतंय तर कसं काय जमतंय बघू’ असं म्हटलं. गेल्या वर्षी त्याचं ऑफिस सुरू झालं. त्याच्या विकेंड पार्ट्या, पिकनिक यांना काहीच बंधन नव्हतं. कारण मी घरी होते सगळं सांभाळायला समर्थपणे. आता पुन्हा सगळ्यावर बंधन येतील म्हणून सगळ्यांचीच तोंड पडलेली दिसतात.
आणि मी… मला मलाही या दिवसांत स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देता आलं होतं. वाढलेलं वजन कमी केलं होतं. वाचन सुरू झालं होतं. राहून गेलेले छंद जोपासता आले होते. गाणं नव्याने सुरू केलं होतं. आता सगळं सगळं पुन्हा बंद…
हुंदकाच दाटून आला… डोळे गच्च भरले पाण्याने… वाटलं का बंद केलं वर्क फ्रॅम होम…