फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर न्यूझीलंडचा विजयरथ घोडदौड करतो आहे. प्राथमिक फेरीतल्या शेवटच्या लढतीतही वर्चस्व गाजवण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न आहे. दुसरीकडे इंग्लंडला गाशा गुंडाळायला लावणारा बांगलादेशचा संघ आणखी एका चमत्कारासाठी आतुर आहे. मात्र इंग्लंडच्या तुलनेत न्यूझीलंडचे आव्हान बलाढय़ आहे.
प्रत्येक सामन्यागणिक खेळात सुधारणा करणाऱ्या न्यूझीलंडला अचानकच दुखापतींच्या समस्यांनी वेढले आहे. पोटाच्या विकारामुळे केन विल्यमसनने सराव सत्रात भाग घेतला नाही. याच त्रासापायी डॅनियल व्हेटोरी आणि ग्रँट एलियट हेही सराव करू शकले नाहीत. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हे तिघेही खेळण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम निर्णय सामन्याच्या दिवशी सकाळीच घेतला जाणार आहे. दरम्यान, खांद्याच्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिलनेने सरावातून माघार घेतली. मिलने खेळू न शकल्यास मिचेल मॅक्लेघानला अंतिम संघात स्थान मिळू शकते. ब्रेंडान मॅक्क्युलम आणि मार्टिन गप्तील भन्नाट फॉर्ममध्ये आहेत. बांगलादेशच्या तुलनेने अननुभवी आक्रमणाचा फायदा उठवण्यासाठी हे दोघेही प्रयत्नशील आहेत. घरच्या मैदानांवरही रॉस टेलरला सूर गवसलेला नाही. बाद फेरीच्या लढतींपूर्वी शस्त्रे परजण्याची रॉसला शेवटची संधी आहे. टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट यांच्यावर गोलंदाजीची धुरा आहे. कोरे अँडरसन आणि ल्युक राँची यांच्यामुळे न्यूझीलंड संघाला संतुलितता प्राप्त झाली आहे.
बांगलादेशसाठी शकीब अल हसन आणि मुशफकीर रहीम या अनुभवी खेळाडूंचा फॉर्म महत्त्वाचा आहे. इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी साकारणारा महमदुल्ला रियाझ आणि सौम्या सरकार यांना कामगिरीत सातत्य आणावे लागेल. अनुभवी तमीम इक्बालची बॅट न्यूझीलंडमधील छोटय़ा खेळपट्टय़ांवर चमकू शकते. इमरूल केयस, अनामूल हक, मोमिनूल हक आणि नासीर होसेन यांच्याकडून संयमी खेळीची अपेक्षा आहे. मुश्रफी मुर्तझा आणि रुबेल हुसेन ही जोडगोळी बांगलादेशसाठी जमेची बाजू आहे. अष्टपैलू साबीर रहमान बांगलादेशसाठी उपयुक्त आहे.  

सामना क्र. : ३७
न्यूझीलंड वि. बांगलादेश
स्थळ : सेडन पार्क, हॅमिल
वेळ : शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता
संघ
न्यूझीलंड : ब्रेंडान मॅक्क्युलम (कर्णधार), मार्टिन गप्तील, रॉस टेलर, केन विल्यमसन, कोरे अँडरसन, डॅनियल व्हेटोरी, टॉम लॅथम, नॅथन मॅक्क्युलम, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम मिलने, मिचेल मॅक्लेघान, ग्रँट एलियट, कायले मिल्स, ल्युक राँची.   
बांगलादेश : मश्रफी मुर्तझा (कर्णधार), मुशफकीर रहीम, शकीब अल हसन, मोमिनूल हक, अनामूल हक, इमरुल केयस, तमीम इक्बाल, नासिर होसेन, महमदुल्ला रियाझ, सौम्या सरकार, साबीर रहमान, अराफत सनी, रुबेल हुसेन, ताजीऊल इस्लाम, तास्किन अहमद.
थेट प्रक्षेपण
सर्व स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर