भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला सामना हा काही जणांना विश्वचषकाच्या अंतिम फेरीसारखा वाटत असला तरी आजी-माजी खेळाडूंना मात्र तसे वाटत नाही. कारण हा पहिलाच विजय असून बरेच सामने बाकी असल्याचे सांगत भारताने या सामन्यानंतर जल्लोष साजरा केला नाही. दुसरीकडे पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी संघाचे सांत्वन करत त्यांना आगामी विश्वचषकातील सामन्यांसाठी सज्ज राहण्याचा संदेश दिला आहे; पण पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी संघावर पराभवानंतर आसूड ओढले असले तरी माजी विश्वविजेता कर्णधार इम्रान खानने मात्र हा पराभव वाईट कामगिरीमुळे झाल्याचे मान्य करत देशवासीयांना निराश होऊ नका, असे आवाहन केले आहे.

विजयानंतर धोनी रिक्त हस्तेच परतला!
मेलबर्न : सामना जिंकल्यावर त्या विजयाची आठवण म्हणून खेळाडू स्टम्प आपल्या जवळ ठेवतात. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची तर ही सवयच; पण पाकिस्तानवर विजय मिळवल्यावर मात्र धोनीला स्टम्प आपल्याकडे ठेवता आला नाही, कारण सामन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टम्प आणि बेल्स यांची किंमत २५ लाख रुपयांपर्यंत असल्याने धोनीला रिक्त हस्तेच पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. सामन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सहा ‘एलईडी’ स्टम्पची किंमत २४ लाख रुपये एवढी आहे, तर प्रत्येक बेल्सची किंमत २५ हजार रुपये आहे.
पाकिस्तानवर विजय मिळवल्यावर धोनीने विजयाची आठवण म्हणून एक बेल्स आपल्याकडे ठेवली, पण ‘स्क्वेअर लेग’ला असलेले पंच इयान गोल्ड धोनीकडे आले आणि त्यांनी धोनीला बेल्सबद्दल विचारणा केली. विजयाची आठवण म्हणून मैदानावरील कोणतेही साहित्य ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची मान्यता असणे महत्त्वाचे आहे.

पाकिस्तानने विश्वचषकात भारताविरुद्धच्या सुमार कामगिरीची पुनरावृत्ती केली. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय संघाला कसोटी तसेच एकदिवसीय दोन्ही प्रकारांत एकही विजय मिळवता आला नव्हता. मात्र पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध निग्रहाने खेळ करत भारताने शानदार विजय मिळवला. भावनिक कणखरतेची परीक्षा पाहणाऱ्या या सामन्यात पाकिस्तानने पराजयाची परंपरा कायम राखली.
डॉन, पाकिस्तानचे वृत्तपत्र.

भारतीय संघाला विजयाच्या जल्लोषासाठी वेळ नाही
मेलबर्न : कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळवल्यावर भारतामध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला. देशवासीयांनी रस्त्यांवर फटाके फोडले, मिठाई वाटली, पण भारतीय संघाला मात्र विजयाचा जल्लोष साजरा करता आला नाही.
‘‘हा विश्वचषकातला पहिला विजय आहे. याबद्दल संघात नक्कीच आनंदाचे वातावरण होते, पण जल्लोष मात्र कुणी केला नाही. कारण विश्वचषकाच्या अभियानाला आता सुरुवात झाली असून अजून बरेच सामने बाकी आहेत. त्याचबरोबर आम्हाला सकाळी अॅडलेडवरून मेलबर्नसाठी निघायचे होते. त्यामुळे खेळाडूंनी सामान भरून शांतपणे विश्रांती करणे पसंत केले,’’ असे संघाच्या सहयोगी चमूतील एका व्यक्तीने सांगितले.

पाकिस्तानच्या पराभवाने  निराश नाही -इम्रान खान
कराची : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उत्सुकता साऱ्यांनाच असते आणि त्याच्या विजयाबरोबरच पराभवाचे पडसाद उमटत असतात; पण भारताविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे मी निराश झालो नाही, कारण पाकिस्तानची कामगिरीच चांगली झाली नसल्याचे मत पाकिस्तानचा विश्वविजेता कर्णधार इम्रान खानने व्यक्त केले आहे.
‘‘भारताविरुद्धच्या पराभवाने पाकिस्तानी चाहत्यांनी निराश होण्याची गरज नाही. जर दोन्ही संघांच्या कामगिरीचा विचार केला तर पाकिस्तानचा वाईट कामगिरीमुळेच पराभव झाला हे सिद्ध होत आहे. पाकिस्तानच्या युवा गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी न करता आल्यामुळेच पाकिस्तानचा पराभव झाला,’’ असे इम्रान म्हणाला.