logविश्वचषकात भारताची कामगिरी अद्याप उत्तम आहे. प्रगती पुस्तकात पकीच्या पकी गुण मिळवून भारत आपल्या गटाच्या शिखरावर आहे. या प्रदर्शनाच्या जोरावर उपान्त्यपूर्व फेरीत भारताचे स्थान जवळपास निश्चित दिसत आहे. बऱ्याच क्रिकेट चाहत्यांनी बरीच वष्रे बऱ्याच योजनांच्या आधारे ऑस्ट्रेलियाकडे झेप घेतली होती. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धचा विश्वचषकातील हा सामना प्रत्यक्षात पाहण्यासाठी सर्वानी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. अधिकृत आकडा अद्याप जाहीर झाला नसला तरी ऑस्ट्रेलियन व्हिसासाठी जानेवारीच्या महिन्यात सुमारे १२ ते १५ हजार अर्ज नोंदवले गेल्याच्या बातम्या आहेत. अर्जाचे प्रमाण जवळपास दुप्पट झाल्याने व्हिसा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना नक्कीच अतिरिक्त काम करावे लागले असावे. गर्दीमुळे बऱ्याच चाहत्यांना या जल्लोषात सामील होण्याची संधी मिळाली नाही. पण या आशावादी चाहत्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. पर्यटन कंपन्यांनी भारताचा फॉर्म आणि येणाऱ्या होळीच्या सुट्टय़ांचा फायदा घेत ३-५  दिवसांची ‘पॅकेज टूर’ची लालूच कॉर्पोरेट आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर ठेवलेली आहे.
ख्रिस गेल आणि विराट कोहलीतील गदायुद्ध पाहा आणि ऑस्ट्रेलियातील नागरिकांसोबत रंगांची उधळपट्टी करण्याचे स्वप्न दाखवून ऑस्ट्रेलियाकडे रवाना होणाऱ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २०-२५ टक्के भर पडली आहे. इतकेच नव्हे, तर काही टूर कंपन्या नवीन खास उपान्त्यपूर्व फेरी ते अंतिम फेरी अशा योजनेची तयारी करीत आहेत.
दिवाळी आणि होळी हे ऑस्ट्रेलियात साजरे होणारे दोन मोठे भारतीय सण आहेत. ऑस्ट्रेलियात सिडनी, मेलबर्न, पर्थ, अ‍ॅडलेड, ब्रिस्बेन यांसारख्या जवळपास सर्व मुख्य शहरांत होळी साजरा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. होळीच्या दिवशी सुट्टी नसल्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन सणाच्या दिवसाच्या जवळ असलेल्या शनिवारी किंवा रविवारी होते. अन्यथा त्या महिन्यातील कुठल्या तरी ‘वीकेंड’ला आयोजित केला जातो. पर्थमध्ये गेल्याच रविवारी होळी साजरी झाली.
पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या भारतीय मंडळाने बीटन पार्कमध्ये आयोजित केलेल्या या उत्सवात रंगांव्यतिरिक्त कला, नृत्य आणि खेळाचा समावेश होता. ऑस्ट्रेलियात होळी महोत्सवाचे आयोजन करण्याचे श्रेय भारतीय विद्या भवनच्या ऑस्ट्रेलियन शाखेला जाते. भारतीय विद्या भवन ही एक भारतीय मूल्य आणि संस्कारांचा प्रसार करणारी स्वयंसेवी संस्था आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी सिडनीच्या हृदयात स्थित ‘डाìलग हरबर’ या भागात हा पर्व सुरू झाला. ‘डाìलग हरबर’ २००० मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या ऑलिम्पिक सोहळ्याचे केंद्रस्थान होते. या पर्वात कला, नृत्य, नाटय़, गीत-संगीत यांसोबत स्वादिष्ट खाद्यपदार्थाची छोटी दुकानेही लागतात. यासोबत एका रथयात्रेचेदेखील आयोजन होते. बरेच भारतीय सहकुटुंब या पर्वाची वर्षभर वाट बघतात आणि मनसोक्त रंग खेळण्याबरोबरच भारतीय प्रथा आणि परंपरा परदेशांत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या देश, परिवार आणि मित्रांपासून दूर असणाऱ्यांसाठी हा सण आपल्या देशाजवळ आणतो आणि शहरातील सर्व भारतीयांबरोबर मिसळण्याची संधी प्रदान करतो. सिडनीसारखेच मेलबर्नमध्येदेखील हा एक दिवसाचा सोहळा साजरा केला जातो. भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भिन्न रंगांना परदेशात एकत्र एकमेकांमध्ये मिसळण्याची संधी हा पर्व प्रदान करतो आणि यात जर क्रिकेटचा तडका लागणार असेल तर हा अतिशय स्वादिष्ट अनुभव ठरेल याबद्दल वाद नाही. टूर कंपन्या घटत्या डॉलर्सच्या पाश्र्वभूमीवर अधिकाधिक पर्यटकांना ‘आयुष्यभरातील एकमेव अविस्मरणीय अनुभूती’चे आमिष देऊन ऑस्ट्रेलियाकडे रवाना करण्याच्या मागे लागलेले आहेत. होळी हा सण म्हणजे चांगल्या गोष्टींचा वाईटावरील विजयाचे प्रतीक आहे आणि हीच अपेक्षा महागडे पॅकेज विकत घेणारे क्रिकेटवेडे पर्यटक भारतीय संघाकडून करत असतील आणि जर भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला तर हा फक्त संघाचाच नव्हे तर, त्या क्रिकेट चाहत्यांचा आणि टूर कंपन्यांचादेखील विजय असेल.