आता कुठे गायब झाला, महेंद्रसिंग धोनी ऊर्फ माहीचा तो मिडास-टच किंवा परिसस्पर्श, ज्याला ज्याला हात लागेल, त्याचं बावनकशी सोन्यात रूपांतर करवणारी त्याची दैवी करामत? मग का झाला माहीच्या भारताचा logo03विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ९५ धावांनी दणदणीत पराभव? रोहित शर्मा (०), शिखर धवन (५ धावा) दस्तुरखुद्द माही (४२) यांना वॉटसन, हॅडिन व क्लार्क अशांकडून जीवदान मिळाल्यानंतरही, धोनीच्या संघाचा डाव २३३ षटकांतच का गडगडावा? पुरी ५० षटकंही न चालता, सामना तीन षटकं आधीच का संपावा?
गेली काही वर्षे प्रभावशाली प्रसारमाध्यमं व वाहिन्या आपल्या कानीकपाळी राजा माहीच्या परिसस्पर्शाची रसभरीत वर्णनं ऐकवत आहेत. कसोटी व एकदिवसीय कसोटय़ांच्या जागतिक क्रमवारीमध्ये, शिखरावर तिरंगी झेंडा फडकला, तेव्हा यशाचा धनी होता माही. २० व ५० षटकांच्या क्रिकेटचे विश्वचषक भारताने हस्तगत केले, तेव्हा माहीच्या श्रीलंकेविरुद्धच्या एका अप्रतिम खेळीचे बेफाम उदात्तीकरण केलं गेलं. म्हणूनच हा प्रश्न उपस्थित होतो, कुठे गेला तो धोनीचा सुवर्णस्पर्श?
कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान भारतानं तब्बल १९ महिने उपभोगलं. पण २०११च्या विश्वचषक विजयानंतर, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्या दोन-दोन दौऱ्यांत, अन् न्यूझीलंड-द. आफ्रिकेच्या एकेक दौऱ्यात भारतानं भरपूर मार खाल्ला. झटपट क्रिकेटमधील विश्वचषकाचा उरलासुरला गड पडू नये, यासाठी धोनीने कसोटी क्रिकेट सोडलं. कप्तानानं जहाज बुडताना ते सोडायचं नसतं, या क्षात्रधर्माचं पालन केलं नाही! आता उरलासुरला किल्ला, ५० षटकांच्या क्रिकेटचा किल्लाही उद्ध्वस्त झालाय.
ल्ल  इतिहास काय सांगत होता? : प्रसारमाध्यमांनी भयानक उत्कंठा निर्माण केलेल्या सिडनीतील उपांत्य फेरीआधीचा इतिहास काय सांगत होता? सिडनीतील सुप्रसिद्ध एससीजी मैदानातील भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील १४ सामन्यांपैकी १२ कांगारूंनी जिंकले होते. भारताला विजयश्री प्राप्त झाली होती, अवघ्या एका सामन्यात; अन् एक सामना अनिकाली ठरला होता. १९९१ ते २०१५दरम्यान भारत-ऑस्ट्रेलिया यांतील सामन्यांत, भारतीय यशाचं प्रमाण होतं अवघं १९ टक्के! २ नोव्हेंबर २०१३ ते २५ मार्च २०१५ या १७ महिन्यांच्या कालावधीत भारताला कांगारूंवर एकदाही मात करता आलेली नव्हती व ताजा फॉर्म अजमावयाचा तर कसोटी मालिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियातील तिरंगी स्पध्रेतही भारताची पाटी कोरीच होती.
विश्वचषकात, उपांत्य फेरीआधीच्या सातही सामन्यांत भारतानं १०० टक्के यश संपादलं होतं. पण ते कुणाकुणाविरुद्ध? संयुक्त अरब अमिराती, आर्यलड, झिम्बाब्वे अशा उघडउघड दुय्यम संघांविरुद्ध तसेच बांगलादेश, विंडीज व पाकिस्तान या मध्यम दर्जाच्या संघांसमोर. भारताचा एकमेव गौरवास्पद विजय दक्षिण आफ्रिकन कसदार संघांविरुद्धचा, तरीही या विजयमालिकेचा आणि त्यामुळे माही-महत्तेचा केवढे वातावरण निर्माण केले प्रसारमाध्यमांनी. त्यामुळे किती वाहवत गेले जनसामान्य!
ल्ल  बाजारपेठा, माध्यमे : वातावरण निर्माण करणं ही कायमची गरज बाजारपेठेची व प्रसारमाध्यमांची. विश्वचषक उपांत्य सामन्याआधीच्या चार किरकोळ, दोन मध्यम व एकच कसदार विजयांतून त्यांनी निर्माण केली नुसती हवा नव्हे, तर लाटांवर उसळणाऱ्या लाटा. त्यातूनच अधिकृत टीव्ही वाहिन्यांच्या जाहिरातींचे दर दुपटीने उंचावत गेले. भारतीय कामगिरी उंचावत राहिली तर येत्या चार दिवसांत चांदीच चांदी होत राहणार होती व आम आदमीला हे वातावरण थोडेच नकोसे होते? सर्व क्षेत्रांप्रमाणे क्रीडा क्षेत्रातही तो शोधत राहतो यश. चषक अन् विश्वचषक. राष्ट्रकुल, एशियाड, ऑलिम्पिकमधील पदकं. सुवर्ण, नाही जमल्यास रौप्य, निदान कांस्य पदकं. त्यालाही हवे असतात नायक. माध्यमं व बाजारपेठा यांना हे यश हवं असतं, त्यातून मिळणाऱ्या करोडो रुपयांसाठी. आम आदमीसाठी ती असते भावनिक, समाधान भागवण्याची व उमेद मिळवण्याची गरज!
आता पुन्हा मैदानी वास्तवाकडे वळू या, धोनी नामक आगामी दहा वर्षे चालू शकणाऱ्या ब्रँडला, बाजारपेठेनं उचलून धरलं. त्याच्या नावानं ढोल बडवले. पण ते विसरले की कसोटीतील यशाची गोष्टच सोडा. पण विश्वचषक २०११चे असली मानकरी कोण कोण होते? फलंदाज सचिन, सेहवाग व गंभीर; अष्टपैलू युवराज, गोलंदाज झहीर, मुनाफ व हरभजन. तीच होती धोनीची असली कवचकुंडलं. तीच धोनीच्या सुवर्णस्पर्शातील असलियत. ती कवचकुंडलं नियतीनं काळानुसार उतरवली अन् चव्हाटय़ावर आणल्या गेल्या धोनीच्या मर्यादा. हेच भारतीय क्रिकेटचं वास्तव. ते पचवायला जड जाईलही. पण ते पचवलं तरच पुढे जाऊ शकू!
क्लार्कने वॉर्नला वापरलं
सिडनीतील खेळपट्टीविषयी बरंच लिहिलं-बोललं गेलं. मायकल क्लार्कला तेज खेळपट्टीच हवी होती. ती गोष्ट तो बोलून दाखवत राहिला. लगेच इयान चॅपलनं त्याला चिमटे काढण्यास सुरुवात केली : ‘‘चॅम्पियन्स संघासारखं ऑस्ट्रेलिया वागत नाही. चॅम्पियनन्सनी खेळपट्टीची इतकी धास्ती घ्यायची नसते!’’ धास्ती घ्यावी असे फिरकी गोलंदाज भारताकडे नसले तरीही क्लार्कनं शेन वॉर्नला बोलावून घेतलं. या वयातही वॉर्नच्या फिरकीवर कांगारू फलंदाजांनी सराव केला!
फिरकीबाबत एवढं सावध राहणाऱ्या क्लार्कनं, डावखुरा झेव्हियर डोहर्टी हा चमूतील एकमेव खासकरून फिरकीपटूला संघाबाहेरच ठेवलं! पण भारतानं आपलं बलस्थान अधिक मजबूत करण्याचा विचार कार्यक्रमपत्रिकेवरच घेतला नाही. अश्विन व जडेजा यांसह मध्यमगती मोहित शर्माऐवजी डावखुऱ्या अक्षर पटेलला खेळवण्याचा विचार धोनी करणं अशक्यच होतं. खरं म्हणजे संघ-संचालक रवी शास्त्री व प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी अशा प्रयोगाचा आग्रह साखळी सामन्यात धरून बघावयास हवा होता. प्रत्यक्षातही शमी, यादव व मोहित यांच्या २९ षटकांत २१५ धावा बदडल्या गेल्या, तर अश्विन-जडेजाच्या २० षटकांत ९८! पण सामना संपल्यावरही ही चूक कबूल करेल, तो धोनी कसला?
३२९ धावांचं लक्ष्य. अशा वेळी गरज एका शतकवीराची, निदान दोन अर्धशतकवीरांची व तीन चांगल्या भागीदाऱ्यांची. आता एकमेव अर्धशतक धोनीचं, पण संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज येणार सहाव्या क्रमांकावर, २३ षटकं संपल्यावर, अन् आवश्यक धावगती षटकामागे आठ धावांवर गेल्यावर! सदोष आखणी यालाच म्हणायचं नसेल तर कशाला? क्रमांक नऊपर्यंतचे कांगारू फलंदाज उत्तम फटकेबाजी करतात. याउलट सरळ बॅटनं खेळणाऱ्या तंत्रशुद्ध कसोटीवीर अश्विनच्या १३ चेंडूंत ५ धावा!
ल्ल  सरतेशेवटी : वातावरणाला बळी न पडणाऱ्या, वाढत्या वर्गास भारतीय अपयश अनपेक्षित नव्हतं. २०१५च्या विश्वचषकात भारताचा क्रमांक तिसरा, ही बाब उत्साहवर्धक नव्हे. भारतीय मंडळाच्या पुढाऱ्यांनी वेळात थोडा वेळ आयपीएलऐवजी क्रिकेटला द्यावा. क्रिकेटमधील अपयश व क्रिकेटबाबत आम आदमीतील वाढता निरुत्साह यांचाही विचार जमल्यास करावा!