(विजयी मुद्रेने चंपक अवतरतो.)
चंपक : तुम्ही कमाल केलीत. इंग्लंडला धुपाटण्याचा प्रसाद मिळाला.
तोताराम : अहो कामच आमचं.
wc13चंपक : आज विठ्ठलपंत आणि तुमची कसोटी आहे.
तोताराम : अहो, वन-डेचा वर्ल्ड कप आहे ना हा?.. (जस्ट किडिंग हा) तुमचा रोख लक्षात आला. विठ्ठलपंत समर्थ आहेत.
(कार्डाऐवजी विठ्ठलपंत चिठ्ठी देतात.)
चंपक : हे नवीनच.
तोताराम : याचा अर्थ मंडळींना खेळण्यातच रस नाही.
चंपक : म्हणजे?
तोताराम : दोन्ही टीममध्ये एवढे बंडोबा आहेत की त्यातच गुरफटल्यात दोन्ही टीम्स. कधी पैशाचा वाद, कधी कराराचा जुगाड. तो त्याला शिव्या घालतोय, हा त्याच्यावर आरोप करतोय. वर्ल्ड कपला नाही म्हणू शकत नाही म्हणून फिजिकली आलेत ते फक्त. बरं, दोन्ही टीम्सचं वैशिष्टय़ म्हणजे बेभरवशीपणा. आज उच्चांकवीर, उद्या नीचांकवीर. आजचं बलस्थान उद्या त्यांचा कच्चा दुवा होतो. ब्रह्मदेवजीसुद्धा यांच्याविषयी होरा वर्तवण्याच्या फंदात पडत नाही. विठ्ठलपंत तर पामर एकदम. तर चिठ्ठीचा अर्थ असा, जी टीम किल्मिषांतून बाहेर पडून खेळेल ती जिंकेल.
चंपक : दुसऱ्या मॅचचं काय?
तोताराम : तिथे वरुणराजाचा खेळ. आणि समजा झालीच मॅच तर ऑस्ट्रेलिया जिंकणार. बांगलादेशचा वचपा घ्यायला ते टपलेत.