‘सचिन, सचिन..’ या जयघोषांनी रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) पुन्हा एकदा दुमदुमले. क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेला हा महान फलंदाज ‘विश्वचषकाचा राजदूत’ म्हणून भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याला हजर होता. परंतु क्रिकेटरसिकांसाठी त्याची ही उपस्थितीसुद्धा पुरेशी होती. एमसीजीवरील मोठय़ा स्क्रिनवर जेव्हा सचिनला दाखवण्यात आले, तेव्हा ‘सचिन, सचिन..’ या घोषणांनी क्रिकेटरसिकांनी मैदान दणाणून सोडले. त्याला जेव्हा दुसऱ्यांदा स्क्रिनवर दाखवण्यात आले, तेव्हा क्रिकेटरसिकांनी पुन्हा स्टेडियमवर तितक्याच उत्साहाने जयघोष केला.

सचिनचा सेल्फी
कॅमेऱ्यात स्वत:चे छायाचित्र काढून समाजमाध्यमांमध्ये अपलोड करण्याच्या सेल्फीची क्रेझ प्रचलित आहे. विश्वचषक स्पर्धेचा सदिच्छादूत असलेला सचिन मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर अवतरला. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांच्याशी बातचीत केल्यानंतर त्याने सेल्फी काढला.

सचिनकडून भारतीय संघाचे कौतुक
भारतीय संघाचे दिमाखदार प्रदर्शन. विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलाच विजय. विश्वचषकाचा सामना प्रेक्षक म्हणून पाहण्याची माझी पहिलीच वेळ. अविस्मरणीय अनुभव. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय प्रेक्षकांचा उत्साह आणि जल्लोष थक्क करणारा होता.
सचिन तेंडुलकर