विश्वचषकात सलग सात सामन्यांत विजय मिळवत भारतीय संघाचा विजयरथ भरधाव वेगाने मार्गक्रमण करीत होता. मात्र उपान्त्य फेरीत ऑस्ट्रेलियाने सुरेख सांघिक खेळाच्या जोरावर भारताचा विजयरथ रोखला. मात्र अव्वल दर्जाच्या संघाला टक्कर देत हरल्याने नाराज होण्याचे कारण नाही, असा सूर भारतीय संघाच्या चाहत्यांनी समाजमाध्यमांवर आळवला.

*विश्वचषकात भारतीय संघाने शानदार प्रदर्शन केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना खडतर होता. कोणताही पराभव स्वीकारणे कठीणच असते. मात्र तुम्ही संपूर्ण स्पर्धेत दिमाखदार प्रदर्शन केले आहे. चाहत्यांना तुमचा खेळ पाहताना पुरेपूर आनंद मिळाला. सफाईदार विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. स्मिथचे शतक, फिंचने त्याला दिलेली साथ आणि शेवटच्या षटकात जॉन्सनने केलेली फटकेबाजी यामुळे सामन्याचे चित्र पालटले.
– सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू
****
*खेळामध्ये हार-जीत असतेच.. विश्वचषकात दमदार प्रदर्शन करणाऱ्या भारतीय संघाचे मन:पूर्वक अभिनंदन!
– अभिनव बिंद्रा, नेमबाज
****
*एकूण कामगिरीत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल होता. स्टिव्हन स्मिथ कारकीर्दीतील सर्वोत्तम अशा फॉर्ममध्ये आहे. तीनशेपेक्षा धावांचे लक्ष्य भारतासाठी आव्हानात्मक होते. विराटने मोठी खेळी करीत सूत्रधाराची भूमिका निभावली असती तरच ते शक्य होते. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यातला अंतिम मुकाबला उत्कंठावर्धक असेल.
– कुमार संगकारा, श्रीलंकेचा माजी कर्णधार
****
*भारतीय संघाने उपांत्य फेरीचा सामना गमावला तरी त्यांनी स्पर्धेतील कामगिरीचा अभिमान बाळगायला हवा. ऑस्ट्रेलिया अव्वल संघ होता.
– व्हीव्हीएस लक्ष्मण, भारताचा माजी क्रिकेटपटू
****
*दिमाखदार खेळासाठी ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. शानदार खेळासह उपान्त्य फेरीपर्यंत वाटचाल करणाऱ्या भारतीय संघाचे आभार. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नशिबाची साथ नव्हती, परंतु तुम्ही झुंज दिलीत.
आमिर खान, चित्रपट अभिनेता