एका डावात दहा बळी घेण्याची किमया साधणाऱ्या भारताच्या माजी कर्णधार अनिल कुंबळेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’ मांदियाळीत समावेश केला जाणार आहे. दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवणारा कुंबळे ७७वा खेळाडू ठरणार आहे. बिशनसिंग बेदी, कपिलदेव, सुनील गावस्कर यांच्यानंतर या यादीत झळकणारा कुंबळे चौथा भारतीय क्रिकेटपटू आहे. कुंबळेच्या बरोबरीने ज्येष्ठ महिला क्रिकेटपटू बेटी विल्सन यांचाही या यादीत समावेश केला जाणार आहे.
आयसीसीच्या क्रिकेट समितीचे प्रमुख असलेला कुंबळे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ६१९ बळींसह तिसऱ्या स्थानी आहे. एकदिवसीय प्रकारातही ३३७ विकेट्ससह सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये कुंबळे अव्वल दहामध्ये आहे.