‘सर सलामत तो पगडी पचास’ ही म्हण दैनंदिन आयुष्यात तंतोतंत लागू होईल अशीच आह़े  त्यामुळे धक्काबुक्कीच्या, दगदगीच्या दिनक्रमात स्वत:ला तंदुरुस्त ठेवून पुढील आव्हान पेलण्यासाठी आपण सज्ज राहतो़  तसे न झाल्यास आपली काय तारांबळ उडते, हे वेगळे सांगायला नको़  त्यात तर खेळाडू आपल्या तंदुरुस्तीची जरा जास्तच काळजी घेतात, मग क्रिकेटपटू त्याला अपवाद कसे ठरतील़  मात्र यंदाच्या विश्वचषक स्पध्रेला जणू ‘दुखापतींचे ग्रहण’च लागले आह़े  एकापाठोपाठ एक संघातील खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत.  त्यापैकी काही सावरले, परंतु ज्यांना ते नाही जमले त्यांना स्पर्धा अध्र्यावर सोडून मायदेशी परतावे लागले आह़े
दुखापतीचा सर्वाधिक फटका श्रीलंकेच्या संघाला बसतो आहे. त्यांना प्रवासाच्या मध्यापर्यंत दोन खेळाडूंना दुखापतीमुळे मायदेशी पाठवावे लागले, तर एकाला काही सामन्यांना मुकावे लागले आह़े  त्यामुळे हा स्पध्रेतील कठीण काळ असल्याचे संघातील अनुभवी खेळाडू महेला जयवर्धनेने कबूल केले आह़े  या खडतर काळातही श्रीलंकेचा संघ एकजुटीने प्रतिस्पर्धी संघाला सडेतोड उत्तर देतो आहे, हे महत्त्वाच़े  यापाठोपाठ वेस्ट इंडिज व बांगलादेश संघांचा क्रमांक येतो़  भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांनाही दुखापतींचा विळखा बसला आहे, मात्र तो आणखी घट्ट होण्यापूर्वीच संघांनी सावध भूमिका घेत संकट टाळले आह़े
स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारताचा इशांत शर्मा दुखापतीमुळे माघारी परतला आणि मोहित शर्माला संधी मिळाली़  मोहितलाही सराव सत्रात दुखापत झाली होती, परंतु तो त्यातून बरा झाला़  भारतासाठी आणखी एक दिलासादायक बाब घडली आणि ती म्हणजे फॉर्मात असलेला गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हेही दुखापतीतून सावरले आहेत़  मात्र इशांतच्या रूपाने लागलेली ही लागण पुढे श्रीलंकन संघाकडे सरकली.़  संघातील महत्त्वाचा खेळाडू जीवन मेंडिसला दोन सामन्यांनंतर मायदेशी परतावे लागल़े  न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील लढतीनंतर सराव सत्रात मेंडिसला दुखापत झाली आणि त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली़  त्यापाठोपाठ श्रीलंकेचे प्रमुख अस्त्र रंगना हेराथच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आणि श्रीलंकन संघ खडाडून जागा झाला.  इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ही दुखापत झाल्यामुळे त्याला दहा दिवसांच्या विश्रांतीवर जावे लागल़े  तो या दुखापतीतून कधी बरा होतो आणि त्याची कामगिरी कशी होते, हे श्रीलंकेच्या नशिबावर अवलंबून आह़े  या धक्क्यातून सावरण्याआधीच फलंदाज दिमुथ करुणारत्नेच्या बोटाला सराव करताना दुखापत झाली आणि तोही माघारी परतला़  मायदेशी परतलेल्या खेळाडूंना बदली म्हणून ताफ्यात चेहरे दाखल झाले असले तरी संघावर दुखापतींचे सावट आहेच़  बांगलादेशलाही अनामुल हक यालाही स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीत झालेल्या दुखापतीमुळे माघारी परतावे लागले आह़े  वेस्ट इंडिजलाही भरवशाचा फलंदाज डॅरेन ब्राव्होला स्पध्रेच्या मध्यंतरालाच विश्वचषकाचा निरोप घ्यावा लागला.
पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये जखमी खेळाडू आहेत़, परंतु एकावरही मायदेशी परतण्याची नामुष्की ओढावलेली नाही़  पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद इरफान, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि दक्षिण आफ्रिकेचा जे. पी. डय़ुमिनी हे दुखापतीतून सावरत आहेत़  आता पुढील प्रवासात प्रत्येक संघाला विजयी रथ कायम राखण्याबरोबरच या दुखापतीच्या ग्रहणापासून दूर राहण्याचे आव्हानही पेलावे लागणार आह़े
स्वदेश घाणेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Players face injury in cricket world cup
First published on: 07-03-2015 at 02:13 IST