अवघे क्रिकेटविश्व ज्याची आतुरतेने वाट पाहात होते तो दिवस काही तासांवर येऊन ठेपला आहे.. आतापर्यंत क्रिकेटच्या कुंभमेळ्यात विविध देशांनी आपल्या कामगिरीचे नानाविध रंग उधळले. या रंगात अवघे क्रिकेट जगत न्हाहून निघाले.. आता साऱ्यांनाच उत्कंठा असेल ती विश्वचषकाच्या अंतिम फेरीचीच.. रविवारी अंतिम फेरीचा पडदा वर जाईल आणि एक थरारक, उत्कंठावर्धक, रहस्यमय महानाटय़ाची अनुभूती साऱ्यांना मिळेल.. प्रत्येक सामना सारखाच असला तरी अंतिम फेरीचे दडपण, अंतिम फेरीचा साज काही औरच असतो, त्यामुळे आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर क्रिकेटविश्व झुलेल. प्रत्येक क्षणागणिक, चेंडूगणिक समीकरणे बदलत जातील, प्रत्येक चेंडूवर कोटय़वधी नजरा खिळलेल्या असतील, प्रत्येक चाहता मैदानात असेल ते आपल्या आवडत्या संघाला जिंकवण्यासाठीच. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ अंतिम फेरीत दाखल झाल्याने त्यांच्यामधल्या द्वंद्वाला कट्टरपणाची एक वेगळीच झालर असेल. या देशांतील प्रत्येक खेळाडूला आपल्या या कडव्या प्रतिस्पर्धी संघाबरोबर दोन हात करायला नेहमीच आवडत असते, त्यामुळे एक अनोखी ईष्या या सामन्यात पाहायला मिळेल. पण कितीही कटुता मनात असली तरी हा खेळ आहे आणि तो खेळ भावनेनेच खेळला जाईल, अशीच आशा क्रीडाप्रेमी करत असतील. पाचव्यांदा विश्वचषक पटकावण्यासाठी मायकेल क्लार्कचा ऑस्ट्रेलियाचा संघ सज्ज झाला आहे, तर पारंपरिक प्रतिस्पध्र्याला नमवण्याबरोबरच पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून इतिहास रचण्यासाठी ब्रेंडन मॅक्क्युलमचा न्यूझीलंडचा संघ प्रयत्नशील असेल. दोन्ही संघ जिद्दीने विश्वचषकावर मोहोर उमटवण्यासाठी सज्ज झाले असून क्रिकेटविश्व अंतिम फेरीचा पहिला चेंडू पाहण्यासाठी आतुर आहेत. दोन्ही संघांबरोबर त्यांच्या चाहत्यांच्या ओठांवर यावेळी ‘.. अंती विजयी ठरू’ याच ओळी असतील. न्यूझीलंडचा मितभाषी, पण अनुभवी खेळाडू डॅनियल व्हेटोरी आणि ऑस्ट्रेलियाचा यशस्वी कर्णधार क्लार्क विश्वविजेतेपदासह अलविदा करण्यासाठी उत्सुक आहेत.
न्यूझीलंडने स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. पण हे सर्व सामने त्यांनी आपल्या देशांतील छोटय़ा आकारांच्या मैदानात खेळले होते. मेलबर्नचे मैदान हे त्यापेक्षा आकाराने बरेच मोठे असून कदाचित त्यांना ही समस्या जाणवू शकते. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहेत. फलंदाजीमध्ये मॅक्क्युलम दमदार फॉर्मात आहे. मार्टिन गप्तिल, ग्रँट एलियट, कोरे अँडरसन यांनी आतापर्यंत चांगली फलंदाजी केली असली तरी त्यांना कामगिरीमध्ये सातत्य दाखवता आलेले नाही.
ऑस्ट्रेलियाचा कोणताही खेळाडू कधीही फॉर्मात येऊ शकतो, कारण जिद्दीने पेटून उठल्यावर कोणतीही समीकरणे त्यांच्यासाठी सोपी ठरतात. मिचेल स्टार्कने विश्वचषकात अफलातून कामगिरीचा नजराणा पेश केला आहे. मिचेल जॉन्सनला अजूनही छाप पाडता आली नसली तरी जोश हेझलवूडने अचूक वेळी भेदक मारा केला आहे. फलंदाजीमध्ये स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड वॉर्नर हे चांगल्या फॉर्मात आहेत. पण न्यूझीलंडकडून साखळी फेरीत पत्करावा लागलेला पराभव त्यांचा जिव्हारी लागलेला असेल आणि पराभवाची सव्याज परतफेड करण्यासाठी ते जिवाचे रान करतील.
अंतिम फेरीमध्ये पोहोचल्यावर तुम्ही सर्वोत्तम संघ आहात, हे कळून चुकलेले असते. पण यामधला सवाई कोण, यासाठी अंतिम फेरीचा घातलेला हा घाट साऱ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकवणारा असेल. आतापर्यंतचे सारे काही विसरून नव्याने विश्वविजयाला गवसणी घालण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असून नव्या विश्वविजेत्याला पाहण्यासाठी क्रिकेटविश्व आतुर असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामना क्र. : ४९ ल्ल  स्थळ  : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न, ल्ल  वेळ : सकाळी ९.०० वा.पासून

ऑस्ट्रेलिया
संघ
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, स्टीव्हन स्मिथ, शेन वॉटसन, जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, ब्रॅड हॅडीन, जेम्स फॉकनर, झेवियर डोहर्टी, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, मिचेल         जॉन्सन.
आतापर्यंतची वाटचाल
साखळी फेरी
वि. इंग्लंड : १११ धावांनी विजयी
वि. बांगलादेश : पावसामुळे सामना रद्द
वि. न्यूझीलंड : एका विकेटने पराभूत
वि. अफगाणिस्तान : २७५ धावांनी विजयी
वि. श्रीलंका : ६४ धावांनी विजयी
वि. स्कॉटलंड : ७ विकेट्सनी विजयी
उपांत्यपूर्व फेरी
वि. पाकिस्तान : ६ विकेट्सनी विजयी
उपांत्य फेरी
वि. भारत : ९५ धावांनी विजयी

लक्षवेधी खेळाडू
मिचेल स्टार्क
विश्वचषकात सातत्यपूर्ण प्रदर्शन करणारा ऑस्ट्रेलियाचा उंचपुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क. घोटीव यॉर्कर, अचूक उजव्या यष्टी रोखून मारा, उसळत्या चेंडूंचा खुबीने उपयोग ही स्टार्कची गुणवैशिष्टय़े आहेत. प्रमुख फलंदाजांना माघारी धाडत प्रतिस्पध्र्याच्या डावाला खिंडार पाडण्यात सातत्याने यशस्वी. बळी घेतानाच धावा रोखण्यातही तो वाकबगार आहे.

आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये मी नेहमीच संघाला प्रथम प्राधान्य दिले आहे. या सामन्यासाठी अथक सराव वगैरे केलेला नाही. पण गेल्या वेळी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्याचा अभ्यास केला. रात्री झोपताना कोणतेही दडपण माझ्यावर नाही. त्याबरोबर फलंदाजीला जाताना कोणतीही समस्या मला जाणवणार नाही. यापूर्वीच्या दोन विश्वचषकांचा अनुभव माझ्या गाठीशी आहे आणि यासाठीच मी स्वत:ला सुदैवी समजतो.
– मायकेल क्लार्क (ऑस्ट्रेलिया)

न्यूझीलंड
संघ
ब्रेंडन मॅक्क्युलम (कर्णधार), मार्टिन गप्तिल, रॉस टेलर, केन विल्यमसन, कोरे अँडरसन, डॅनियल व्हेटोरी, ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी, ग्रँट एलियट, टॉम लॅथम, मिचेल मॅक्लेघान, मॉट हेन्री, ल्युक राँकी, नॅथन मॅकक्युलम, कायले मिल्स.
आतापर्यंतची वाटचाल
साखळी फेरी
वि. श्रीलंका : ९८ धावांनी विजयी
वि. स्कॉटलंड : ३ विकेट्सनी विजयी
वि. इंग्लंड : ८ विकेट्सनी विजयी
वि. ऑस्ट्रेलिया : एका विकेटने विजयी
वि. अफगाणिस्तान : ६ विकेट्सनी विजयी
वि. बांगलादेश : ३ विकेट्सनी विजयी
उपांत्यपूर्व फेरी
वि. वेस्ट इंडिज : १४३ धावांनी विजयी
उपांत्य फेरी
वि. दक्षिण आफ्रिका : ४ विकेट्सनी विजयी
आमच्यासाठी ही एक अद्भुत अशी वेळ आहे. जे स्वप्न आम्ही पाहिले होते, त्याची चांगली सुरुवात आमच्याकडून झाली आहे. आतापर्यंतचा प्रवास हा अविस्मरणीय असाच होता. विश्वचषक जिंकण्याची सारखीच संधी दोन्ही संघांना आहे. मोठय़ा आकारांच्या मैदानात खेळण्याचे आमच्यावर दडपण नाही, कारण यापूर्वी आम्ही मोठय़ा मैदानांमध्ये खेळलो आहोत. आमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे आणि विश्वचषकाला गवसणी घालण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
– ब्रेंडन मॅक्क्युलम (न्यूझीलंड)

लक्षवेधी खेळाडू
ब्रेंडन मॅक्क्युलम
सलामीला फलंदाजीला येत जोरदार आक्रमण करून प्रतिस्पध्र्याना नामोहरम करण्यात निष्णात. डावाच्या सुरुवातीलाच तुफानी हल्लाबोल करत धावगतीच्या पातळीवरही संघाला आगेकूच करून देणारा खेळाडू. विश्वचषकात झंझावाती फॉर्ममध्ये असणारा मॅक्क्युलम ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरू शकतो. फलंदाजीबरोबरच मॅक्क्युलमची आक्रमक आणि चतुराईपूर्ण नेतृत्वशैली यंदाच्या स्पर्धेचे आकर्षण ठरले आहे.

आमनेसामने
एकूण- १२६    
ऑस्ट्रेलिया- ८५,
न्यूझीलंड-३५,
रद्द-६
 विश्वचषक-९
ऑस्ट्रेलिया- ६,
न्यूझीलंड-३,
रद्द-०
ऑस्ट्रेलियात-६०,
ऑस्ट्रेलिया- ३८,
न्यूझीलंड- १८,
रद्द-४
मेलबर्न येथे- १९,
ऑस्ट्रेलिया-१४,
न्यूझीलंड-४,
रद्द-१

खेळपट्टी
मेलबर्नच्या खेळपट्टीवर चेंडूला उसळी मिळते, मात्र तरीही फलंदाजीला अनुकूल अशी ही खेळपट्टी आहे. पिवळसर करडय़ा रंगाची खेळपट्टी असून, चेंडू स्विंग किंवा सिम होण्याची शक्यता नाही. खेळपट्टी कालांतराने संथ होत जाणारी असल्याने कोणताही संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला प्राधान्य
देईल.

अव्वल फलंदाज
१. कुमार संगकारा (श्रीलंका) ५४१ धावा
२. मार्टिन गप्तिल (न्यूझीलंड) ५३२ धावा
३. ए बी डी’व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) ४८२ धावा

अव्वल गोलंदाज
१. ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) २१ बळी
२. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) २० बळी
३. उमेश यादव (भारत) १८ बळी

*१९७५* वेस्ट इंडिज    
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : ६० षटकांत ८ बाद २९१ (क्लाइव्ह लॉइड १०२, गॅरी गिलमूर ५/४८) विजयी विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ५८.४ षटकांत सर्वबाद २७४ (इयान चॅपेल ६२, केथ बॉइस ४/५०)
सामनावीर : क्लाइव्ह लॉइड

*१९७९* वेस्ट इंडिज
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : ६० षटकांत ९ बाद २८६ (विवियन रिचर्ड्स १३८, फिल एडमंड्स २/४०) विजयी विरुद्ध इंग्लंड : ५१ षटकांत सर्वबाद १९४ (माइक ब्रेअर्ली ६४, जोएल गार्नर ५/३८)
सामनावीर : विवियन रिचर्ड्स

*१९८३* भारत
संक्षिप्त धावफलक
भारत : ५४.४ षटकांत सर्वबाद १८३ (के. श्रीकांत ३८, अँडी रॉबर्ट्स ३/३२) विजयी विरुद्ध वेस्ट इंडिज : ५२ षटकांत सर्वबाद १४० (विवियन रिचर्ड्स ३३, मोहिंदर अमरनाथ ३/१२)
सामनावीर : मोहिंदर अमरनाथ

*१९८७*ऑस्ट्रेलिया
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ५ बाद २५३ (डेव्हिड बून ७५, इडी हेमिंग्स २/४८) विजयी विरुद्ध इंग्लंड :
५० षटकांत ८ बाद २४६ (बिल अ‍ॅथे ५८, स्टीव वॉ
२/३७)
सामनावीर : डेव्हिड बून

*१९९२* पाकिस्तान
संक्षिप्त धावफलक3.
पाकिस्तान : ५० षटकांत ६ बाद २४९ (इम्रान खान ७२; डेरेक प्रिंगल ३/२२) विजयी विरुद्ध इंग्लंड : ४९.२ षटकांत सर्वबाद २२७ (नील फेअरब्रदर ६२, मुश्ताक अहमद ३/४१)
सामनावीर : वासिम अक्रम

*१९९६* श्रीलंका
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ७ बाद २४१ (मार्क टेलर ७४, अरविंदा डिसिल्व्हा ३/४२) पराभूत विरुद्ध श्रीलंका : ४६.२ षटकांत ३ बाद २४५ (अरविंदा डिसिल्व्हा १०७, डॅमियन फ्लेमिंग १/४३)
सामनावीर : अरविंदा डिसिल्व्हा

*१९९९*ऑस्ट्रेलिया
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : ३९ षटकांत सर्वबाद १३२ (इजाज अहमद २२, शेन वॉर्न ४/३३) पराभूत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : २०.१ षटकांत २ बाद १३३ (अ‍ॅडम गिलख्रिस्ट ५४, साकलेन मुश्ताक १/२१)
सामनावीर : शेन वॉर्न

*२००३*ऑस्ट्रेलिया
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत २ बाद ३५९ (रिकी पॉन्टिंग १४०, हरभजन सिंग २/४९) विजयी विरुद्ध भारत : ३९.२ षटकांत सर्वबाद २३४ (वीरेंद्र सेहवाग ८२, ग्लेन मॅकग्रा ३/५२)
सामनावीर : रिकी पॉन्टिंग

*२००७* ऑस्ट्रेलिया
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ३८ षटकांत ४ बाद २८१ (अ‍ॅडम गिलख्रिस्ट १४९, लसिथ मलिंगा २/४९) विजयी विरुद्ध श्रीलंका : ३६ षटकांत ८ बाद २१५ (सनथ जयसूर्या ६३, मायकेल क्लार्क २/३३)
सामनावीर : अ‍ॅडम गिलख्रिस्ट

*२०११* भारत
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ५० षटकांत ६ बाद २७४ (महेला जयवर्धने १०३, युवराज सिंग २/४९) पराभूत विरुद्ध भारत : ४८.२ षटकांत ४ बाद २७७ (गौतम गंभीर ९७, लसिथ मलिंगा २/४२)
सामनावीर : महेंद्रसिंग धोनी

मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup final australia vs new zealand
First published on: 29-03-2015 at 06:13 IST