26 February 2021

News Flash

रूपेरी माणूस!

माझी आणि तुलीची ओळख आमच्या ‘प्रीतम’मध्येच झाली. तो दिसायला हँडसम होता.

माझ्या या स्टार मित्राला काही जण ‘नशीबवान’ म्हणतात, काही जण लॉटरी लागली असं म्हणतात, काही जण त्याला ‘ज्युबिली स्टार’ म्हणतात तर काही जण ‘देवाचा लाडका’ म्हणतात. परंतु मी माझ्या या मित्राला ‘कष्टांचा महासागर’ म्हणेन! एक गोष्ट नक्की की, ही स्टार मंडळी चमकतात; पण त्यांच्या ‘चमकण्या’मागे दिव्यासारखं स्वत:च जळण्याचं भागधेय लिहिलेलं असतं. बहोत सारे पापड बेलने पडते है!

माझी आणि तुलीची ओळख आमच्या ‘प्रीतम’मध्येच झाली. तो दिसायला हँडसम होता. मध्यम उंची, घट्ट बांधा, नम्र वागणं. एच. एस. रवैल यांच्या प्रॉडक्शनमध्ये तो काम करायचा. रोज सकाळ-संध्याकाळ आमच्याकडे जेवायला यायचा. अशा लोकांना आम्ही ‘कार्डवाले’ म्हणायचो. ‘कार्डवाले’ म्हणजे त्यांचं कार्ड असायचं, ज्यावर त्यांच्या जेवण्याची नोंद व्हायची आणि महिनाअखेरीस त्यांनी जेवणाचे पैसे द्यायचे. महिन्याला अडतीस रुपयांत जेवण देत असू. तुली असा आमच्याकडे जेवायला यायचा. त्याच्याशी बोलताना जाणवायचं की हा मुलगा खानदानी आहे. दिलखुलास, कष्टाळू आणि सहनशील आहे. त्याने कधीतरी श्रीमंती भोगली असणार, परंतु आज त्याची परिस्थिती फारशी चांगली नाही. या स्थितीतून बाहेर पडण्याचा विश्वास मात्र त्याच्यामध्ये दिसायचा. त्याचे डोळे स्वप्नाळू होते. तो माझ्याच वयाचा होता, फार तर चार-पाच वर्षांनी मोठा असेल.

आमच्याकडे त्या काळात एकच माणूस भटारखान्यावर, ग्राहकांवर, काउंटरवर लक्ष ठेवत असे. तो मी असे व माझ्या पापाजींना विश्रांती देत असे. त्यामुळे ‘कार्डवाल्या’ लोकांशी माझी चटकन मैत्री होत असे. ते त्यांची दु:खं, त्यांचे आनंद माझ्याबरोबर वाटून घेत असत. खरं तर आमचं एक कुटुंबच बनलं होतं. एकदा तुली मला म्हणाला, की तो मूळचा पाकिस्तानातला होता. त्यांचा तिथं मोठा व्यवसाय होता. त्याचे आजोबा मिल्रिटीचे मोठे पुरवठादार होते, तर वडिलांचा कापड व्यवसाय होता. फाळणीनंतर सारं काही उद्ध्वस्त झालं आणि त्याचा सारा परिवार रिकाम्या हातानं भारतात आला. त्यावेळी तुली जेमतेम अठरा वर्षांचा होता. त्यानं आपलं नशीब चित्रपटात आजमावायचं ठरवलं. त्याला खरं तर दिग्दर्शक व्हायचं होतं, म्हणून त्यानं एच. एस. रवैल यांच्याबरोबर ‘पतंगा’ या चित्रपटासाठी ‘तिसरा साहाय्यक दिग्दर्शक’ म्हणून काम करायला सुरुवात केली. तिसरा साहाय्यक दिग्दर्शक म्हणजे ‘चहा आणून दे’, ‘खुर्च्या लाव’ यांसारखी कामं करणारा माणूस! त्याला फारसं महत्त्व नसतं. पण तुलीला मोठं व्हायचं होतं.

त्याची पंचाईत अशी होती की, त्याला पगार होता तीस रुपये आणि आमच्या जेवणाचा दर होता मासिक अडतीस रुपये. हा मेळ बसणार कसा? कसाबसा तो वेळ मारून नेत होता. तुली कुठं राहत होता, हे मला माहीत नव्हतं. बहुधा तो सेटवरच कुठं तरी निजत असणार! महिन्याला तो जेमतेम वीस रुपये देऊ  शकत असे. पापाजी महिन्याच्या सुरुवातीस कुणाकुणाचे पैसे आले ते विचारत असत आणि ज्याची थकबाकी असे, त्याची अडचण समजून घेत त्याला मुदत देत. परंतु तरीही पैसे न आल्यास नंतर त्यास ओरडत असत आणि शेवटी कार्ड सिस्टीममधून काढून टाकत असत. तुलीच्या पहिल्या दोन पायऱ्या झाल्या होत्या. आता तिसरी पायरी येणार म्हणून तो पापाजींचा डोळा चुकवत असे. ते यायच्या वेळी तो जेवायलाच येत नसे. त्यामुळे एकदोनदा त्याची जेवणंही चुकली. एकदा त्यानं मला हळूच विनंती केली, ‘‘यार कुलवंत, तू पापाजींना सांग ना, की माझे दोनशे रुपये बाकी आहेत ते जमा झालेत.’’ मी लगेच म्हणालो, ‘‘रजिंदर (तुलीचं नाव), मला यात घेऊ नकोस. मी खोटं सांगणार नाही. त्या ऐवजी मी गप्प बसेन.’’

असे काही दिवस गेले. परंतु एक दिवस पापाजी आणि तुली हे दोघं एकमेकांसमोर आलेच! पापाजींनी त्याला विचारलं, ‘‘अरे रजिंदर, तुझी बरीच बाकी आहे. तुला सगळ्या मुदती देऊन झाल्या. आता आज पैसे दे, नाही तर तुझं जेवण आजपासून बंद!’’ मी बाजूलाच उभा होतो. तुली माझ्याकडे बघत म्हणाला, ‘‘ना पापाजी. मी तर पैसे जमा केलेत. विचारा कुलवंतला..’’ मी तोवर शब्द दिल्याप्रमाणे चुपचाप होतो. परंतु मला त्या संभाषणात तुलीनं गोवल्यावर पापाजींना म्हणालो, ‘‘नाही पापाजी, रजिंदरने पैसे दिलेले नाहीत.’’ पापाजींचा राग अनावर झाला. ते चिडले आणि त्यांनी सरळ रजिंदरच्या गालावर एक जोरात थप्पड मारली. त्याच्या गोऱ्या गालांवर पापाजींची पाच बोटे स्पष्ट उमटली. त्याला म्हणाले, ‘‘एक तो झूठ बोलते हो, वो गलत है। .. आणि कुलवंतलाही खोटं बोलायला लावतोस! मोठा आहेस ना त्याच्यापेक्षा, फिर ऐसी सिख क्यूँ देते हो?’’ रजिंदरच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं. त्यानं पापाजींची क्षमा मागितली. ‘काही बोलू का’ अशी विनंती केली आणि त्याची सगळी कर्मकथा पापाजींना सांगितली. पगार तीस रुपये आणि जेवण अडतीस रुपये, कसा निभाव लागणार वगैरे.. पापाजींना त्याची समस्या लक्षात आली. त्यांनी विचारलं, ‘‘कुणाकडे काम करतोस?’’ रजिंदर म्हणाला, ‘‘रवैलसाहेबांकडे!’’ एच. एस. रवैलसुद्धा आमच्याकडे कार्डवाले होते. तेही तोवर आले.

पापाजींनी त्यांना विचारलं, ‘‘तुम्ही तुलीला ओळखता का?’’

रवैलजींना काही आठवेना.

‘‘अरे, रजिंदर.. तुली.. तेरा असिस्टंट है। बोलता है, थर्ड असिस्टंट है। वो देखो सामने खडा है। कितनी पगार देते हो उसे? वो बोलता है, की तीस रुपये देते हो.’’

रवैल म्हणाले, ‘‘हां, थर्ड असिस्टंट है, तो उतनी ही तनख्वाह होनी चाहिये।’’

पापाजी रवैलजींवर उखडले, ‘‘अरे, तू त्याला तीस रुपये देतोस. तू इथं जेवतोस आणि तोही जेवतो. माझ्याकडे महिन्याला किती पैसे देतोस?’’

रवैल – ‘‘अडतीस रुपये’’

पापाजी- ‘‘तर मग हे पोरगं कसं जगत असेल? पगार तीस रुपये आणि जेवणाला अडतीस रुपये? कसं निभावणार? चल उसकी तनख्वाह बढा दे।’’

रवैल चुपचाप म्हणाले, ‘‘हां पापाजी, बढा देता हूँ.’’

लगेच त्याचा पगार त्यांनी पन्नास रुपये महिना केला. पापाजी रजिंदरला म्हणाले, ‘‘रजिंदर, आता जे झालं ते झालं. तुला जेव्हा जमेल तेव्हा पैसे दे, पण आयुष्यात कधी खोटं बोलू नकोस. नेहमी खरं सांग. आज परिस्थितीनं तुला खोटं बोलायला लावलं. परिस्थिती कायम राहत नसते, पण खोटं बोलायची सवय कायम राहते.’’ रजिंदरचा प्रश्न मार्गी लागला.

काही महिने गेले. त्यानं चित्रपटात छोटी कामं करायला सुरुवात केली. तो नर्गिस, दिलीपकुमारच्या ‘जोगन’मध्ये एका छोटय़ा भूमिकेत होता. एकेदिवशी संध्याकाळी तो नेहमीप्रमाणे ‘प्रीतम’मध्ये आला. मला म्हणाला, ‘‘कुलवंत, एक गोयल म्हणून आहेत. त्यांनी मला एक नायकाचा रोल दिलाय ‘वचन’ नावाच्या चित्रपटात. त्याची सायनिंग अमाउंट आलीय. हे राहिलेले दोनशे रुपये घेशील का?’’ मी त्याच्याकडून पैसे जमा करून घेतले व ज्यांची बाकी राहिली आहे अशा लोकांच्या लिस्टमधून त्याचं नाव खोडलं. उरलेले पैसे घेऊन तो पापाजींकडे गेला. त्यांच्या हाती उरलेले पैसे दिले आणि त्यांना म्हणाला, ‘‘पापाजी, ही माझी नायक म्हणून पहिली कमाई. तिला तुमचे हात लागावेत.’’ पापाजींच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांनी ते पैसे स्वत:चा एक रुपया घालून त्याला परत दिले.

काही दिवसांनी रजिंदर पापाजींकडे आला. त्यांना विनंती करून एका टॅक्सीतून त्यांना कार्टर रोडवर घेऊन गेला व म्हणाला, ‘‘पापाजी, एक सल्ला पाहिजे. समुद्रकिनाऱ्यावरचा कार्टर रोडवरील हा बंगला विकत मिळतोय, पस्तीस हजारांना. मालक थांबायला तयार आहे, पण अ‍ॅडव्हान्स म्हणून त्याला पंधरा हजार हवे आहेत. माझ्याकडे तर पाच हजार आहेत. काय करू?’’ पापाजींनी त्याला सांगितलं, ‘‘विकत घेऊन टाक. मी तुला दहा हजार देतो.’’ दुसऱ्या दिवशी रजिंदरने तो बंगला विकत घेतला. गंमत अशी की, त्या बंगल्याला त्यानं स्वत:च्या मुलीचं ‘डिंपल’ हे नाव दिलं. तिथून त्याचं नशीबच बदललं. त्याचा ‘वचन’ हिट झाला आणि ‘ज्युबिलीस्टार राजेंद्रकुमार’चा उदय झाला!

त्यानंतर तीन आठवडय़ांत त्याने अनेक चित्रपट साइन केले आणि त्याने पापाजींचे सारे पैसे परत केले. राजेंद्रकुमारचे चित्रपट एकापाठोपाठ एक हिट होत गेले. परंतु तो जसा होता तसाच साधा राहिला. त्यानं कधीही आपल्या स्टारपदाचा माज केला नाही. जशी परिस्थिती आली तशी स्वीकारत गेला.

राजेंद्रकुमार त्या बंगल्यात राहायला गेला. काही दिवसांनी तो ‘प्रीतम’मध्ये आला. मला म्हणाला, ‘‘यार कुलवंत, त्या बंगल्यात कसले कसले आवाज येतात. मला तर भीती वाटतेय. चूक झाली की काय बंगला घेऊन?’’ माझा अशा फालतू गोष्टींवर मुळीच विश्वास नाही. मी काही मित्रांना घेऊन त्याच्या ‘डिंपल’ बंगल्यात गेलो. त्या काळी त्या भागात खरंच तो बंगला एकाकी होता. त्यामुळे समोरच्या समुद्राची गाज तिथं ऐकू यायची. माडांच्या झाडातून वारा जायचा, त्याचे वेगवेगळे आवाज यायचे व त्या आवाजाची भीती वाटायची. मग आम्ही मित्र तिथं गप्पा मारत बसलो, पत्ते खेळलो. राजेंद्रकुमारच्या मनातली भीती गेली. हळूहळू तो स्थिर झाला. काही वर्षांनी त्यानं मोठं घर घेतलं आणि तिथं राहायला गेला. राजेंद्रकुमारचं घर मग राजेश खन्नानं विकत घेतलं. ते द्यायला खरं तर राजेंद्रकुमार तयार नव्हता, परंतु राजेशच्या हट्टापुढे तो झुकला आणि ते घर त्यानं एका अटीवर विकलं, की ‘त्या बंगल्याचं नाव बदल.’ राजेश खन्नानं त्याचं नाव ‘आशीर्वाद’ ठेवलं आणि राजेश खन्नाची किस्मत बदलली. तो भारताचा पहिला ‘सुपरस्टार’ झाला आणि राजेंद्रकुमारचा नायक म्हणून डाऊन फॉल सुरू झाला. नंतर एकदा मजेत राजेंद्रकुमार मला म्हणाला, ‘‘यार कुलवंत, उस घर के साथ मैं मेरा लक वही छोड आया।’’ ती गंमत नव्हती; त्याच्या बोलण्यात एक उसासा होता. अर्थात, मला वाटतं की, हिंदी चित्रपटांत टायटलमध्ये सुरुवातीला येतं ना- ‘हा फक्त योगायोग समजावा’, तसंच हेही मानावं! मनात कोणतीही अंधश्रद्धा ठेवू नये.

राजेंद्रकुमार हा शांत प्रकृतीचा व स्वभावाचा माणूस होता. राज कपूर आणि राजेंद्रकुमारची छान मैत्री होती. इतकी की, त्यानं राजच्या मुलीशी कुमार गौरवचं लग्न ठरवलं होतं. दुर्दैवानं ते झालं नाही आणि कुमारनं सुनील दत्तच्या मुलीशी- नम्रताशी- लग्न केलं. राजेंद्रकुमार व सुनील दत्त यांचीही जबरदस्त दोस्ती होती. ती दोस्ती ‘मदर इंडिया’पासून सुरू झाली होती. ‘मदर इंडिया’ हा राजेंद्रकुमारचा दुसराच चित्रपट होता. त्यात त्यानं व सुनील दत्तने नर्गिसच्या मुलांची भूमिका केली होती. राजेंद्रकुमार त्यात आज्ञाधारक मुलाची भूमिका वठवीत होता. तो प्रत्यक्ष जीवनातही तसाच होता. सुनील दत्तच्या राजकीय कारकिर्दीत राजेंद्रकुमारची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांचं नातं जुळायच्या आधीपासून तो सुनील दत्तच्या कायम बरोबर असायचा. त्याच्या निवडणुकीत तो कायम प्रचार करायचा. एकदा एखाद्याला आपलं मानलं, की राजेंद्रकुमार त्याची साथ सोडायचा नाही. सुनील दत्तच्या मुलावर- संजयवर ज्या आपत्ती कोसळल्या, त्यावेळी राजेंद्रकुमार सतत त्याच्यासोबत असायचा. त्या काळात सुनीलची सर्वानी साथ सोडली, पण बाळासाहेब ठाकरे आणि राजेंद्रकुमार त्याच्यासोबत राहिले. जेव्हा पोलीस सुनील दत्तच्या घराची तपासणी करत असत, त्यावेळी राजेंद्रकुमार तिथं हजर राही. कोणी काही गैर तर करत नाही ना, याची डोळ्यांत तेल घालून काळजी घेई. सुनील दत्त त्याविषयी अनेकदा कृतज्ञतेने माझ्याशी बोलत असे. राजेंद्रकुमार मात्र याबद्दल कधीही एका अक्षरानं बोलला नाही. तो अडचणीत आलेल्या प्रत्येकाचा हुकमी आणि सायलेंट मित्र होता. कधी मी याविषयी काही मुद्दा छेडला तर तो म्हणे, ‘‘यार कुलवंत, पापाजींनी त्या दिवशी थोबाडीत मारली आणि पुढच्या क्षणी मला मदत केली. तो दिवस मला खूप शिकवणारा होता. त्या दिवसाकडून जर आपण काही शिकणार नसू, तर काय उपयोग आहे आपल्या माणूस असण्याचा?’’

माझी राजेंद्रकुमार, राज कपूर, सुनील दत्त या सर्वाशी छान दोस्ती होती. काही वेळा हे सारे माझ्याकडच्या पाटर्य़ाना येत. एकत्र बसून एखादं पेय घेत, जेवत. हे सारे मोठे स्टार्स होते. त्यांच्या प्रत्येकाचे स्वभाव भिन्न, आवडीनिवडी वेगळ्या होत्या. त्यांच्यात कदाचित हेवेदावे असतील, मत्सरही असेल. ते लोकांना दिसत असतील किंवा नसतीलही, मला मात्र ते लख्ख दिसले. आणि कोणालाही न दिसणारा त्यांच्यातला माणूस मला पाहता आला, हे माझं भाग्य!

रजिंदरला शेवटी शेवटी कॅन्सर झाला. त्या भयानक रोगाला तो हसतमुखानं सामोरा गेला. त्यावर कसलाही उपचार नाही, हे तो जाणून होता. म्हणून त्यानं कोणतंही औषध घ्यायला नकार दिला. मृत्यूला तो राजसपणे सामोरा गेला.

राजेंद्रकुमार हा रूपेरी पडद्यावरचा रूपेरी माणूस होता! शुक्र है वाहे गुरु का, तो माझा मित्र होता!

– कुलवंतसिंग कोहली

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 1:41 am

Web Title: kulwant singh kohli articles in marathi on unforgettable experience in his life part 12
Next Stories
1 दिलीपसाब
2 ताठ कण्याचं झाड
3 बाळासाहेब नावाचा राजयोगी
Just Now!
X