|| कुलवंतसिंग कोहली

प्रमोदजी म्हणजे एक राजहंस! यारों का यार! एकदम दिलखुलास माणूस! त्यांच्या चेहऱ्यावर सदैव मिश्कील हसू विलसत असे. ते नेहमी लोकांच्या गराडय़ात दिसायचे. ते लहानात लहान आणि मोठय़ांत मोठे व्हायचे. गल्लीतल्या, गावातल्या, जिल्ह्य़ातल्या, राज्यातल्या, देशातल्या कोणत्याही व्यक्तीला प्रमोदजी एकदा भेटले तरी त्या व्यक्तीला ते लक्षात ठेवीत. पुढच्या वेळी ती व्यक्ती भेटली की नाव-गावासकट ते त्या व्यक्तीला हाक मारीत आणि मग ती व्यक्ती त्यांनी बांधलेल्या हजारो व्यक्तींच्या मौक्तिकमालेतील एक मोती बनून जाई. ते नेहमी म्हणत, ‘‘ही माळ मी माझ्या देशासाठी बांधतो आहे.’’ त्यांच्या डोक्यात सतत देशहिताचाच विचार चालू असे.

20th April Panchang Marathi Horoscope 12 Zodiac Signs
२० एप्रिल पंचांग: शनिवारी अद्भुत योगायोग १२ राशींना ‘या’ रूपात लाभाचे संकेत; तुम्हाला कशी प्राप्त होईल लक्ष्मीकृपा?
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

प्रमोद महाजन ही व्यक्ती माझ्या आयुष्यात कोणत्या दिवशी आली ती तारीख आता आठवत नाही, परंतु ती भेट आजही लक्षात आहे. त्यालाही आज पाच दशकं झाली असतील. भारतीय जनता पक्षाचे बराच काळ खजिनदार असणारे माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल यांच्या घरी ते मला पहिल्यांदा भेटले. एक अतिशय उत्साही तरुण स्वयंसेवक म्हणून त्यांची व माझी ओळख करून दिली गेली. गोयलसाहेब हे मूळ ब्रिटिश पंजाबातले. मी पंजाब असोसिएशनचा एक कार्यकर्ता होतो व नंतर अध्यक्ष झालो. माझी व गोयलजींची भेट होत असे. गोयलजींच्या घरी प्रमोदजी भेटले. माझ्यापेक्षा ते पंधरा वर्षांनी लहान होते. पण आमची मत्री लगेचच झाली. याचं कारण त्यांचा मोकळाढाकळा स्वभाव. ते मला भेटले तेव्हा जेमतेम २५-३० वर्षांचे असतील. पण चेहऱ्यावरचं तेज आणि उत्साह लपत नव्हता. गोयलजींच्या इथेच ते मला दुसऱ्यांदा भेटले तेव्हा ते आपणहून माझ्या जवळ आले. हसून नमस्कार केला व म्हणाले, ‘‘ओळखलंत का मला? मी प्रमोद महाजन.’’ तोवर ते भारतीय जनता पक्षाचे एक उदयोन्मुख नेतृत्व म्हणून ओळखले जाऊ लागले होते. आम्ही गप्पा मारू लागलो. ते जरी कार्यकर्ता म्हणून भेटत असले तरी एक कौटुंबिक व्यक्तिमत्त्व म्हणूनही माझ्या ते लक्षात राहिले. त्यांचं त्यांच्या भावंडांवर खूप प्रेम होतं. ते आमच्या गप्पांतून जाणवत असे.

महाजन मंडळी ही मूळची तेलंगणातील मेहबूबनगरात राहणारी. नंतर ते अंबाजोगाईला स्थायिक झाले. त्यांच्या वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या अंगात अगदी मुरलेला होता. प्रारंभी शिक्षकाची नोकरी करून नंतर त्यांनी विचारपूर्वक आपलं सर्व आयुष्य संघाचा स्वयंसेवक म्हणून घालवायचं ठरवलं. हा सारा तपशील त्यांच्या गप्पांतूनच मला कळला. प्रमोदजींना अभिनयाची आवड होती. कलांवर त्यांचं प्रेम होतं. अभिनयाच्या प्रेमातून त्यांना त्यांचं प्रेम गवसलं. रेखाभाभींशी त्यांनी विवाह केला. संघाचं कार्य करताना प्रमोदजींना आणीबाणीच्या काळात अटक झाली. आणीबाणी उठेपर्यंत ते अटकेत होते. तिथं त्यांची फार मोठी वैचारिक घडण झाली. ते एक निरलस कार्यकर्ते होते. कामात झोकून द्यायचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाने ते भराभर यशाच्या पायऱ्या चढत गेले.

मुंबईत ते आले की एकदा तरी आमच्या ‘प्रीतम’मध्ये येत असत, मनापासून जेवत व गप्पा मारत असत. त्यांना शाकाहार अधिक पसंत असे. आमच्या गप्पांत त्यांना एकदा कळलं, की मी माझ्या आई-वडिलांचं एकुलतं एक अपत्य आहे. मग एका राखी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी ते माझ्याकडे आले. मला म्हणाले, ‘‘कुलवंतजी, चला- मी माझ्या बहिणीकडे राखी पौर्णिमेसाठी जातोय. तुम्हाला बहीण नाही, त्यामुळे आजवर कधी राखी बांधली गेली नाही. आज प्रज्ञा तुम्हाला राखी बांधेल.’’

मी म्हणालो, ‘‘प्रमोद, राखी पौर्णिमेला बहीण भावाकडे जाते ना?’’

प्रमोदजी म्हणाले, ‘‘हो, ते उत्तरेत. पण आम्ही मात्र आमच्या बहिणीकडे जातो.’’

मी म्हणालो, ‘‘ठीक आहे. चला, जाऊ या.’’

ते मला घेऊन गेले आणि तिला म्हणाले, ‘‘बघ, तुला आजपासून आणखी एक भाऊ मिळाला.’’ प्रज्ञा फारसं बोलत नाही. ती थोडी अंतर्मुख आहे. परंतु तिचं सौजन्य असं, की तिनं मला ओवाळलं. मला प्रेमळ बहीण मिळाली.. प्रज्ञा गोपीनाथ मुंडे. एक भाऊ मिळाला.. प्रमोद महाजन. आणि एक मेव्हणा लाभला.. गोपीनाथ मुंडे! (गोपीनाथजी आणि प्रमोदजी हे दोघे सख्खे भाऊ असल्यासारखे मित्र होते.) त्यानंतर मात्र प्रत्येक राखी पौर्णिमेला प्रमोद मला घ्यायला यायचे. त्यांच्या गाडीतून आम्ही दोघं जायचो. प्रज्ञाला भेटायचो. हा सिलसिला प्रमोदच्या हत्येपर्यंत चालू होता. आम्ही दोघांनी कधी राखी पौर्णिमा व भाऊबीज चुकवली नाही प्रज्ञाची!

नाती जपण्यात प्रमोदजी अव्वल होते. संघाचे स्वयंसेवक असणाऱ्या प्रमोदजींना भारतीय जनता पक्षाचं कार्य करण्यास सांगण्यात आलं. त्यावेळी भाजपचे फक्त दोन खासदार निवडून आले होते. मी गमतीत प्रमोदजींना म्हटलं, ‘‘यार, सिर्फ दो आ गये! ऐसे कैसे चलेगा?’’

प्रमोदजी आत्मविश्वासाने म्हणाले, ‘‘कुलवंतजी, देखिये- बीस साल के अंदर हम अपनी सरकार बनायेंगे.’’ आणि तसंच घडलं! ते सरकार बनवताना प्रमोदजींचा मोठा हातभार होता. प्रमोदजींची मला आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांची दूरदृष्टी आणि आत्मविश्वास! आपण जे करतो आहोत, त्या कृतीवरची त्यांची निष्ठा. त्यांचं आणखी एक मोठं वैशिष्टय़ मला जाणवलं ते म्हणजे- ते जे कार्य करत असत, ते कार्य त्या- त्या अंगीकृत कार्याच्या नियमांनुसार करत. मत्री करायची ती मत्रीच्या नियमांनुसार. संघकार्य हे संघाच्या नियमांनुसार. आणि राजकारण हे राजकारणाच्या नियमांनुसार! त्यामुळे त्यांना सर्व क्षेत्रांत मित्र लाभले. सच्चा स्वयंसेवक म्हणून मान्यता मिळाली व राजकारणातही यश मिळत गेलं. त्यांना कधी अपयश आलं नाही, की कोणत्याही गोष्टीची खंत त्यांच्या मनात राहिली नाही. निवडणुकीत ते पराभूत झाले तरी त्यांचा दबदबा कधीच कमी झाला नाही.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात आगीचा डोंब उसळला होता. दंगलींचा वणवा पेटला होता. त्यावेळी मुंबई शांत राहिली याचं कारण होतं- बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी स्वीकारलेली भूमिका. आमचे काही शीख बांधव कवडीमोलानं आपली घरं विकून मुंबई सोडून जाऊ लागले होते. पंजाब असोसिएशनचा कार्यकर्ता व अध्यक्ष या नात्यानं मी चिंतित होतो. त्याचवेळी प्रमोदजी स्वत:हून माझ्याकडे आले. तेही खूप अस्वस्थ होते. ते मला म्हणाले, ‘‘कुलवंतजी, कृपया- आपल्या शीख बांधवांना व भगिनींना मुंबई सोडून जाऊ नका असं सांगा.’’

मी म्हणालो, ‘‘प्रमोद, अहो, ते सारे घाबरलेत खूप. त्यात मुंबई कशी झपकन् पेटते तुम्हाला माहीत आहे.’’

‘‘हो, म्हणून तर मी आलोय आज तुमच्याकडे. असं करा- तुम्ही शीख बंधू-भगिनींची एक सभा बोलवा. त्या सभेला आम्हा सर्वपक्षीय मंडळींना बोलवा. मी त्या सभेची प्रस्तावना करेन. पण तुम्ही आधी बाळासाहेबांना (बाळासाहेब ठाकरे) ही कल्पना सांगा. ते आले पाहिजेत.’’

आम्ही दोघं बाळासाहेबांकडे गेलो. त्यांनी लगेच ही कल्पना उचलून धरली. त्यांनी स्वत: अनेक फोन फिरवले. षण्मुखानंद सभागृहात ही सभा झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील या सभेस हजर होते. बाबा आमटे आपल्या प्रकृतिअस्वास्थ्यास बाजूला सारून खास आले होते. सर्व पक्षांची नेतेमंडळी शीख समुदायाला विश्वास देण्यासाठी आली होती. दुर्दैवाने बाळासाहेब नेमके तेव्हा आजारी पडले व त्यांचं प्रतिनिधित्व प्रमोद नवलकरांनी केलं. आपल्या प्रस्तावनेनं प्रमोदजींनी सारा माहोल अंतर्मुख केला. त्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द माझ्या मनात कोरला गेला आहे. अतिशय भावुक सुरुवात प्रमोदजींनी केली. ते म्हणाले, ‘‘मी दिल्लीत जेव्हा जातो आणि चांदणी चौकातून शीशगंजकडे जातो तेव्हा माझी मान शरमेनं खाली झुकते. शीशगंजचा परिसर हा धर्मरक्षणार्थ स्वत:च्या प्राणांची कुरवंडी करणाऱ्या गुरू गोविंदसिंगांचे पिताश्री असणाऱ्या गुरू तेगबहादूर यांच्या तेजस्वी मरणाची साक्ष देतो आहे. औरंगजेबानं धर्मातरासाठी तत्कालीन जनतेचा छळ केला होता आणि ते धर्मातर रोखण्यासाठी गुरू तेगबहादूर यांनी प्राणार्पण केलं होतं.’’ आपल्या ओघवत्या शैलीत प्रमोदजींनी ती कथा सर्वाना सांगितली. ‘‘गुरूंचं शीश (मस्तक) त्या भागात औरंगजेबानं कापून काढलं आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या मरणानं हिंदू धर्म टिकवणाऱ्या गुरूंच्या शीख समाजाला आज सरसकट अतिरेकी समजत आहेत याचं मला अतीव दु:ख होतंय आणि म्हणून माझी मान शरमेनं खाली झुकतेय.’’

आपल्या भावनिक आवाहनानं प्रमोदजींनी सारं वातावरण गंभीर आणि संवेदनशील बनवलं. त्यानंतर बोलणाऱ्या प्रत्येकाला प्रमोदजींच्या भाषणाचा संदर्भ घेऊनच बोलावं लागलं होतं.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘यानंतर एकाही शीख कुटुंबानं मुंबई किंवा महाराष्ट्र भीतीनं सोडला तर ते माझं वैयक्तिक आणि सरकारचं अपयश असेल असं मी मानेन.’’

नवलकरांनी बाळासाहेबांचा निरोप दिला, की ‘‘प्रत्येक शीख बांधवाला मी शिवसनिकच समजतो. आणि शिवसनिकाला जर काही इजा झाली तर शिवसेना कशी वागते हे सर्वाना माहितीच आहे.’’

मुंबई त्या काळात शांत राहिली.

नंतर आमच्या ‘प्रीतम’च्या पार्किंग लॉटमध्ये बॉम्बस्फोट झाला तेव्हा सर्वप्रथम धावून येणाऱ्या नेत्यांमध्ये प्रमोदजी होते. मला बाळासाहेब आणि त्यांनी खूप धीर दिला. बाळासाहेब आणि त्यांची दोस्ती सर्वश्रुत आहे. मी त्यांच्या स्नेहाचा अतिशय जवळून साक्षीदार आहे. मी राजकारणी माणूस नाही. याची गोष्ट त्याला सांग आणि त्याची गोष्ट याला सांग, हे करणं माझ्या स्वभावात नाही, हे सगळ्यांनाच ठाऊक होतं. त्यामुळे आम्हा तिघांच्या गप्पांच्या एकत्र मफिली खूप झाल्या. आमच्या कुटुंबांचं परस्परांकडे नेहमी येणं-जाणं असे. १९९५ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी मी व प्रमोदजी गप्पा मारत असताना ते म्हणाले, ‘‘यावेळी आमची सत्ता येणार.’’ मी हसत हसत म्हणालो, ‘‘प्रमोद, दिवास्वप्न पाहू नका. हे खूप अवघड आहे.’’ ते ठामपणे म्हणाले, ‘‘बघालच तुम्ही. बाळासाहेब आणि आम्ही सारे जशी योजना करतो आहोत, त्याप्रमाणे माझी गणितं सांगताहेत की आम्ही सरकार बनवणार!’’ मी फक्त हसलो. तर ते थोडे उखडले. म्हणाले, ‘‘सत्ता आली तर काय द्याल?’’ मी म्हणालो, ‘‘मी पजा लावणारा जुगारी नाही. मी आहे साधा हॉटेलवाला. सर्वाना जेवण देईन!’’

नंतर कामाच्या ओघात मी हे विसरून गेलो. निवडणुकीचे निकाल लागले. त्या दिवशी संध्याकाळी नवनिर्वाचित सेना-भाजप आमदारांची सेनाभवनमध्ये बठक होती. बठक सुरू होण्यापूर्वी सहा वाजता मला प्रमोदजींचा फोन आला- ‘‘कुलवंतजी, लक्षात आहे ना?’’

मी थोडासा गडबडलो. ‘‘काय लक्षात आहे ना?’’

‘‘अच्छा? पार्टी द्यायची वेळ आली तर आता विसरलात काय? आपली पज लागली होती- आमची सत्ता आल्यावर तुम्ही आमच्या सर्व मंडळींना जेवण देणार होता! आज संध्याकाळी आम्ही येतोय.’’

मला एकदम आठवलं. मी लगेच उद्गारलो, ‘‘हो, हो. या. मी तयारी करतो.’’ आणि त्या संध्याकाळी निवडून आलेल्या सर्व आमदारांसाठी आणि नेत्यांसाठी आम्ही प्रीतमच्या टेरेसवर जोरदार पार्टी दिली. प्रमोदजींचा शब्द होता तो! खाली कसा पडू द्यायचा? त्याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, ‘‘माझी आणि कुलवंतजींची पज लागली होती, की आमचं सरकार आलं की त्यांनी सर्वाना पार्टी द्यायची. आणि मी ती पज जिंकलोय!’’ मी उत्तर दिलं- ‘‘प्रमोद, तुम्ही अशाच पजा जिंकत राहा. मला त्या कायम हरत राहायला आवडेल!’’

आम्ही दोघं एकमेकांचे छान मित्र होतो. एकमेकांशी सुखदु:खाच्या गोष्टी करायचो. मंत्री झाल्यानंतरही मुंबईत आल्यावर जरासा वेळ मिळाला की ते घरी किंवा प्रीतममध्ये यायचे. गप्पा मारायचे. काही महत्त्वाच्या बठका ते इथं घेत असत. एकदा प्रीतममध्ये एका मोठय़ा उद्योगपतीची व त्यांची अचानक गाठ पडली. मी तिथंच होतो. दोघांच्या गप्पा झाल्या. निघताना त्या उद्योगपतीनं प्रमोदजींच्या हाती एक अतिशय महागडं पेन ठेवलं व म्हणाले, ‘‘हे पेन तुमच्या मुलासाठी. त्याचा वाढदिवस येतोय ना!’’ मी आश्चर्यचकित झालो. त्या उद्योगपतींना प्रमोदजींच्या कुटुंबातल्या वाढदिवसांबद्दलही माहिती होतं!  प्रमोद म्हणाले, ‘‘हे पेन तुम्हीच तो भेटला कधी तर त्याला द्या. माझ्या हाती नको. एकतर असं पेन मला परवडणार नाही आणि दुसरं म्हणजे असं काही मला आवडत नाही.’’ ते उद्योगपती निघून गेले. पण माझ्या या मित्राचं मला कौतुक वाटलं. सत्ताधारी पक्षातला एक बडा मंत्री अशी भूमिका घेतो, हे पाहून मला आनंद वाटला. अखेरीस प्रमोदजी मूळचे शिक्षकी पेशातले होते.

१९९८ साली मुंबईच्या महापौर बंगल्यात मुंबईचा शेरीफ निवडण्यासाठी बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन अशा मान्यवरांची एक बैठक झाली. त्यात जोशी सरांनी सूचवलं की, ‘‘आपण अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती शेरीफ म्हणून देऊ या. ती व्यक्ती कोण असावी?’

प्रमोदजी म्हणाले, ‘‘बाळासाहेब, तुम्ही सुचवा.’’ काही क्षण विचार करून साहेबांनी प्रमोदजींनाच नाव सुचवायला सांगितलं. त्यांनी ‘मी शीख समाजातलं नाव सुचवू का?’ असं विचारून माझं नाव सुचवलं. साहेब पटकन् म्हणाले, ‘‘अरे, हा तर माझा कँडिडेट आहे!’’ प्रमोद आणि बाळासाहेब दोघांनाही एकमेकांचं मन छान कळत असे. सेना-भाजप युतीचे तेच तर शिल्पकार होते! बाळासाहेबांना जरा जरी राग आला किंवा त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर प्रमोदजी त्यांना भेटून तो विषय संपवायचे. साहेबांची समजूत कशी काढायची, हे त्यांना नेमकं माहीत असे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींवर प्रमोदजींची श्रद्धा होती. अटलजींच्या आजारपणात मुंबईतील इस्पितळात प्रमोदजींनी त्यांची अथक सेवा केली. ते त्या काळात इस्पितळ सोडून एक क्षणही दूर गेले नाहीत. लालकृष्ण अडवाणींचेही ते निकटवर्तीय होते. अडवाणीजींच्या रथयात्रेचं त्यांनी केलेलं नियोजनच त्यांच्या पक्षाला भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी घेऊन गेलं. त्यांचा दिवस भल्या पहाटे सुरू व्हायचा आणि मध्यरात्रीनंतर कधीतरी संपायचा. ही एवढी ऊर्जा हा माणूस कुठून आणतो, याचं मला आश्चर्य वाटायचं. या सकारात्मक ऊर्जेमुळे अंबाजोगाईचा हा साधा माणूस देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी जाऊन पोहोचला होता. प्रमोद महाजन कदाचित देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचले असते, पण अचानक त्यांचं आयुष्य संपवलं गेलं. नियती किती दयाळू असते.. आणि क्रूरही! महान माणसांचं दान आपल्या पदरात न मागता ती टाकते.. आणि न सांगता ते काढूनही घेते.

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर