News Flash

‘मुघल-ए-आझम’चं ध्यासपर्व

हिंदी चित्रपटांतली सर्वश्रेष्ठ निर्मिती म्हणजे ‘मुघल-ए-आझम’!

‘मुघल-ए-आझम’चं ध्यासपर्व
के. असीफ

कुलवंतसिंग कोहली

‘‘मी असा चित्रपट घडवीन, की यापूर्वी कधी असा चित्रपट झाला नाही आणि भविष्यातदेखील होणार नाही. कुलवंत, आज लोक मला वेडा म्हणतात. आहेच मी वेडा! पण लक्षात ठेव- वेडेच जग बदलू शकतात आणि शहाणे त्यांच्यामागे येतात.’’ – के. असीफ!

‘‘मुघल-ए-आझम’ हा असा चित्रपट घडला आहे, की सारं जग त्याच्याकडे आज पाहत राहिलं आहे. या चित्रपटासारखा चित्रपट यापूर्वी कधी झाला नाही व पुढे कधी असा चित्रपट होईल असे वाटत नाही.’ – वर्तमानपत्रातील समीक्षा.

‘भव्यता, भव्यता आणि भव्यता’ या शब्दांतच के. असीफ यांचं वर्णन करता येईल. ते जसे उंच, रुंद आणि भव्य होते, तसेच भव्य चित्रपट त्यांनी बनवले. एखादं भव्य स्वप्न पाहायचं आणि नंतर ते पूर्ण करण्यासाठी झपाटून जाऊन काम करायचं, हा त्यांचा मूळचा स्वभाव होता. मग त्या झपाटलं जाण्याला लोकांनी ‘वेड’ म्हटलं तरी चालेल. मला ते नेहमी म्हणत, ‘‘कुलवंत, ध्यान में रखना.. ये सब लोग मुझे पागल डायरेक्टर बोलते है। एक बार मेरी पिक्चर रिलीज होने दे। फिर देखना, ये लोग क्या बोलते है।’’

के. असीफ हे आमच्या प्रीतमचे मोठे चाहते. माझ्या पापाजींचे मित्र असलेले. नंतर त्यांनी माझ्यावरही पुत्रवत माया केली. ते आठवडय़ातून एकदा तरी प्रीतममध्ये येत. त्यांचा माझा परिचय थोडासा उशिरा झाला. एक तर मी त्यांच्यापेक्षा बारा वर्षांनी लहान होतो. त्यामुळे पटकन् मी त्यांच्यासमोर गेलो नाही. पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात कायम उत्सुकता असायची. ते टॅक्सीतून यायचे. आत शिरल्यावर पहिले पापाजींबरोबर गप्पा मारायचे. नंतर एखादा लार्ज पेग घेत आधी काउंटरपाशी उभे राहून गप्पा मारायचे आणि नंतर एखाद्या टेबलवर जाऊन बसायचे. त्यांना मटण आवडायचं. ते भरपूर आणि चवीनं खायचे. गप्पा मारतानाही ते खाण्याची तारीफ करत राहायचे. मला वाटायचं की आपलं जेवण किती चांगलं आहे. पण नंतर कळलं, की भव्यतेची स्वप्नं पाहणारा हा माणूस छोटय़ा छोटय़ा गोष्टींतही आनंद घेत असे.

करीम असीफ हा उत्तर प्रदेशातील इटावाचा. तिथंच तो शिकला. मोठा झाला. त्याने शिक्षण चालू असतानाच कपडे शिवण्याचा व्यवसाय तिथं सुरू केला. त्यात लवकरच नावही कमावलं. करीमला नवनवं करायची अतिशय आवड होती. त्यातूनच चित्रपटाच्या मोहमयी दुनियेनं त्याला खुणावलं. करीम असीफने त्याचे नातेवाईक नसीरच्या सांगण्यावरून मुंबई गाठली. इथं चित्रपटकला शिकण्याच्या दृष्टीने त्याने हालचाल केली. असीफचा चेहरा ओबडधोबड, उंचापुरा वगैरे होता. तेव्हा त्याने दिग्दर्शनात हातपाय हलवायचं ठरवलं. आणि १९४४ साली- वयाच्या बाविसाव्या वर्षी त्याने पहिला चित्रपट केला- ‘फूल’! त्याला भरपूर यश मिळालं. करीम असीफचं नाव झालं..

ही सारी गोष्ट त्यांनीच मला याच पद्धतीनं सांगितली- म्हणजे तृतीय पुरुषी निवेदनानं.

हळूहळू फूल उमलावं तशी आमची दोस्ती झाली. मी तर असं म्हणू शकतो, की आम्ही ‘बाल-मित्र’ आहोत. म्हणजे मी बाल व ते मित्र! दोस्तीसाठी त्यांना वयाचं बंधन नव्हतं. त्यांची व हिंदी चित्रपटांतली सर्वश्रेष्ठ निर्मिती म्हणजे ‘मुघल-ए-आझम’! रूपेरी पडद्यावरील एक अत्यंत संवेदनशील महाकाव्य! किती आख्यायिका या चित्रपटाशी जोडल्या गेल्या आहेत, देव जाणे. पण मी हा चित्रपट घडताना पाहत होतो. त्याच्या निर्मात्याशी बोलत होतो. त्यातले सर्व महत्त्वाचे घटक आमच्या निकटचे होते- पृथ्वीराजजी, युसूफसाब (दिलीपकुमार) आणि मधू! ‘मुघल-ए-आझम’च्या सेटवर बऱ्याचदा आमच्याकडून जेवण जाई. तेही मीच घेऊन जाई. तो भारलेला काळ होता. असीफसाहेब हे ज्या स्वप्नानं भारलेले होते, ते स्वप्न त्यांनी त्यांच्या संपूर्ण टीमच्या डोळ्यांत उतरवलेलं होतं. प्रत्यक्षात सोळा वर्ष हा चित्रपट बनत होता. परंतु त्याची कल्पना त्यापूर्वी कितीतरी वर्ष असीफसाहेबांच्या मनात घोळत होती. मला एकदा जेवताना ते म्हणाले, ‘‘कुलवंत बेटा, मी कॉलेजात असताना सय्यद इम्तियाज अलीची एक उर्दू कादंबरी ‘अनारकली’ वाचली होती. तिच्यावरचा एक सायलेंट मूव्हीही मी पाहिला होता. तब से मेरे मन में मैंने तय किया था, इस कहानी पर मैं एक सिनेमा बनाऊंगा. तुला ठाऊक आहे चंद्रमोहन?’’

‘‘हां असीफसाब, मैं बिलकूल जानता हूँ। खूप मद्य पिऊन तो गेला.’’

एक सुस्कारा सोडून असीफसाब म्हणाले, ‘‘हां भाई, काय देखणा होता तो. कसले डोळे होते त्याचे. सारे भाव व्यक्त करायचे. पण दारू पिऊन तो लवकर गेला. त्याला आणि नर्गिसला घेऊन मी ‘मुघल-ए-आझम’ करणार होतो. पण तो गेला, देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि सारं समीकरणच बदललं.’’

असीफसाहेबांनी मग हा चित्रपट बाजूला ठेवला व ‘हलचल’ नावाचा नवा सिनेमा सुरू केला. तो रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर हिट्ही झाला. नंतर मात्र आपलं स्वप्न पूर्ण करण्याची तयारी असीफसाहेबांनी सुरू केली. सर्व स्टार कास्ट बदलली आणि ‘मुघल-ए-आझम’ची आखणी केली.

जितकी वर्ष त्यांचा ‘मुघल-ए-आझम’ बनत होता, तितकी वर्ष (आणि नंतरही त्यांच्या मृत्यूपर्यंत) ते नियमितपणे प्रीतममध्ये येत असत. ते आले की त्यांच्या टेबलवर मी जेवण घेऊन जात असे. कधी पापाजी त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसत. त्या गप्पांतून अनेक गोष्टी उलगडत. त्यावेळी त्या गप्पांचं महत्त्व मला कळलं नाही, पण आज ते ध्यानात येतं. असीफसाहेबांनी कथा, पटकथा व संवादलेखनासाठी स्वत:सह आणखी चौघांची नियुक्ती केली होती. कमाल अमरोही, अमन, वजाहत मिर्झा आणि एहसान रिज़्‍ावी. कित्येक वर्ष हे काम सुरू होतं. कधी कधी हे चौघेही जण त्यांच्यासोबत प्रीतममध्ये येत असत. त्यांच्यात एकेका प्रसंगासाठी, संवादासाठी चाललेल्या चर्चा ऐकत राहणं हा आनंदाचा भाग असे. या चित्रपटाची भाषा उर्दूबहुल होती. ‘एवढी उर्दू भाषा लोकांना कशी पचेल? ते चित्रपटापासून लांब पळतील..’ असा आक्षेप या चर्चात घेतला गेला. असीफसाहेबांनी त्यावर उत्तर दिलं- ‘‘खरं आहे. पण लक्षात घ्या, चित्रपटाची म्हणून एक भाषा असते. ती संवाद व दृश्य मिळून असते. अजिबात काळजी करू नका.’’ आणि तसंच झालं. युद्धाच्या वेळी अकबर म्हणतो, ‘यल्गार हो..’ आणि युद्ध सुरू होतं. अकबर जेव्हा म्हणतो- ‘तखलियां’! त्यानंतर त्याला एकांत देऊन सारे निघून जातात. या चित्रपटानंतर एकेक संवाद लोकप्रिय झाला. विविध भाषिक मंडळीही ‘यल्गार हो’, ‘तखलियां’ असं म्हणू लागली. असीफजींना चित्रपट नेमका कळला होता याचं हे लक्षण आहे. अनारकली जेव्हा सलीमला बेहोश करणारं फूल आपल्या मुकुटात खोवून त्याला भेटायला जाते तेव्हा प्रेमासाठी मृत्युदंडाची शिक्षा मिळालेली अनारकली म्हणते, ‘‘मौत मोहोब्बत से करीब हो गयी.. कनीज तो कब की मर चूकी.. अब जनाजे को रुख्सत की इजाजत दीजिये.. शहेनशाह की इस बेहिसाब बक्षिसों के बदले में यह कनीज जलालुद्दीन मोहम्मद अकबर को अपना खून माफ़ करती है.’’ यातला एकेक अल्फ़ाज तोलूनमापून, पारखून मगच कागदावर उतरलाय. कित्येकदा ही प्रक्रिया मी जवळून पाहिली आहे, हे माझं भाग्य!

एकदा असीफसाहेब मला म्हणाले, ‘‘मी दुनियेतला सर्वात मोठा शीशमहल या चित्रपटासाठी उभा करणार आहे. त्यासाठी कितीही खर्च आला तरी चालेल. यातल्या प्रत्येक आयन्यात अनारकली दिसली पाहिजे. तिच्या करोडो प्रतिमा पाहून शहेनशहा अकबर हादरला पाहिजे. त्याला हादरवून सोडायला दुसरं दृश्य असूच शकत नाही. एकाच वेळी प्रेमाची ताकद आणि प्रेमाचं बंधन त्याला हलवून सोडणारं असायला हवं.’’ जेव्हा असीफसाहेब मला हे म्हणाले तेव्हा नुसतं ऐकूनच माझ्या अंगावर सर्रकन् काटा आला. आजही तो क्षण मी विसरू शकत नाही. हे सारं करण्यासाठी अफाट पसा लागणार होता. ते कुठून आणणार होते तो पसा? असीफसाहेब माझ्या पापाजींना म्हणाले, ‘‘जेव्हा असा प्रश्न उभा राहिला तेव्हा मी पृथ्वीराजजींना सांगितलं. त्यांनी सरळ शापूरजी पालनजी यांना यात पैसे गुंतवायला सांगितले. माझ्यासमोर पृथ्वीराजजी शापूरजींना म्हणाले, ‘हा एक वेडा माणूस आहे. एक ध्येय समोर ठेवून तो ‘मुघल-ए-आझम’ बनवतो आहे. अशा फिल्म्स कधी बनतील हे सांगता येत नाही. पण जेव्हा ती पूर्ण होईल तेव्हा ती जगातील सर्वश्रेष्ठ फिल्म बनेल.’’ शापूरजींनी फायनान्स करायचं व निर्माता बनण्याचं कबूल केलं. आपली शीशमहलची कल्पना शापूरजी मंडळींकडे कशी मांडावी असा असीफसाहेबांना प्रश्न पडला. प्रीतममध्ये एकदा जेवताना त्यांनी मला विचारलं, ‘‘यावर मार्ग काय काढावा?’’ मी काय सांगणार? मला कसला आलाय अनुभव? काही काळ ते गप्प बसले. नंतर मला म्हणाले, ‘‘कुलवंत, मी शापूरजींना सर्व सांगतो व मला फ्री हँड द्या असंही सांगतो.’’ शापूरजींना भविष्यात काय असणार आहे याची कल्पना आली होती. त्यांनी असीफसाहेबांना होकार दिला आणि शीशमहालाचं काम सुरू झालं. त्या काळात २०० फूट लांब, ८० फूट रुंद आणि ३५ फूट उंच अशा शीशमहलचा सेट दहा लाख रुपयांत बनला होता. (त्या काळात एवढय़ा पशांत दोन चित्रपट तयार होत.) तो बनत असताना प्रत्येक टप्प्यावर मी जात असे. दोन वर्षांनी तो पूर्ण झाल्यावर त्यावर शूटिंगच होईना. कारण सगळीकडून प्रकाश परावर्तित होत होता. कॅमेरामन राठोड हैराण झाले. परदेशातून तंत्रज्ञ बोलावले गेले. मी सेटवर गेलो असताना तिथं शूटिंग कसं करावं यावर जोरदार चर्चा चालू होती. मग अचानक एका मोठय़ा लाइटवर कापड आलेलं असताना अख्ख्या सेटवर लाइट पडताना राठोडसाहेबांना दिसला आणि त्यांना मार्ग सापडला. आणि मग त्या अजरामर गाण्याचं शूटिंग झालं.. ‘प्यार किया तो डरना क्या’! फिल्मवर इतकं प्रेम केल्यावर थोडंच घाबरायचं असतं? लाइट्सवर पांढरं कापड टाकून, रिफ्लेक्टरच्या साहाय्याने तो प्रकाश खेळवून मधुबालाचं आणि सेटचं सौंदर्य खुलवलं गेलं.

सलीम युद्धावरून घरी परत येतो त्यावेळी जोधाला झालेला आनंद दाखवताना अनेक मोती वर्षतात. यावेळी काचेचे मोती तयार करून वापरता आले असते. पण त्या मोत्यांना खऱ्या मोत्यांचा ‘फील’ कसा येणार? आणि ते पडत असताना जो आवाज येणार तो प्रॉपर तोच आवाज कसा येईल, असा विचार करून असीफजींनी शापूरजींना सांगून शेकडो मोती मागवले व मगच ते दृश्य त्यांनी शूट केलं. त्यांना परफेक्शनचा ध्यास किती असावा? तर युद्धाच्या दृश्यांत कुठेही त्यांनी फसवणाऱ्या युक्त्या वापरल्या नाहीत. त्यांचे मित्र होते भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी चक्क २००० उंट, ४००० घोडे आणि ८००० सैनिक मिळवले. युद्धदृश्यं राजस्थानात शूट झाली. त्यासाठी सन्य ज्या भागातून त्यांना आणायचे होते त्या खिंडीत विजेचे खांब होते. राजस्थानात अन्य ठिकाणी चित्रण होऊ शकले असते, पण असीफसाहेब मला म्हणाले, ‘‘कुलवंत, मैंने वो बिजली के खंबे ही हटवाये। सब परमिशन वगरा निकाल के, खुद का खर्चा कर के उन्हें दुसरी जगहपर लगवाये और फिर मैंने वो शूटिंग किया। पण बघ, खिंडीतून येताना सन्य कसं जबरदस्त दिसतं!’’ प्रत्येक गोष्ट खरीच वाटली पाहिजे.

एकदा ‘मुघल-ए-आझम’च्या चित्रीकरणाच्या एका सत्रानंतर पृथ्वीराजपापा प्रीतममध्ये आले. ते थोडेसे लंगडत होते. पापाजींनी विचारलं, काय झालं? ते म्हणाले, ‘‘मुघल-ए-आझमच्या शूटिंगला गेलो होतो राजस्थानात. अकबर बादशहा दग्र्यासमोर वाळवंटातून चालत जात पुत्ररत्नासाठी मन्नत मागतो असं दृश्य होतं. इस असीफ बच्चे ने मुझे कडी धूप में रेगीस्तान में नंगे पाँव दग्रे तक चलवाया। मला म्हणतो, की पुत्रप्राप्तीची बादशहाची तडप दिसायला पाहिजे ना, ती पायाला बसणाऱ्या चटक्यांनी अधिक वास्तव होईल. मी नाराजीनं त्याच्याकडे पाहिलं, तर मला म्हणाला, तुम्हाला त्रास होणार आहे ना म्हणून मैं भी शूटिंग करते वख्त आपके साथ कॅमेरा के पिछे, इस रेगीस्तान में और धूप में बगैर टोपी से चलनेवाला हूँ। पागल है। लेकीन फिर मैंने वैसे ही किया, जैसे वो चाहता था.’’ असीफसाहेब या चित्रपटाच्या संपूर्ण काळात स्टुडिओमध्ये चटईवर झोपत.

नौशादसाहेबांचं संगीत या चित्रपटाला होतं. त्यांची या चित्रपटात जबरदस्त इन्व्हॉल्व्हमेंट होती. त्यांनी तब्बल वीस गाणी तयार केली होती व असीफसाहेबांनी ती चित्रितही केली होती. चित्रपटाची लांबी वाढते म्हणून त्यातली आठ कापली गेली. एकदा नौशादजी जेवायला आले असताना खूप खुशीत दिसत होते. त्यांनी असीफसाहेबांच्या सांगण्यावरून वाजीदअली शाहच्या एका रचनेवरून ‘मोहे पनघट पे नंदलाल’ हे गाणं तयार केलं होतं आणि त्याच्या नृत्य-दिग्दर्शनासाठी कोणा ऐऱ्यागैऱ्याला न बोलावता खुद्द लच्छू महाराजांना बोलावून मधुबालाचं शूटिंग करा असं त्यांनी सुचवलं.  अर्थात असीफसाहेबांनी ते मान्यही केलं. बडे गुलाम अली खांसाहेबांना एका गाण्यासाठी पंचवीस हजार रुपये त्यांनी दिल्याचं सर्वश्रुत आहेच. पण खुद्द दिलीपकुमार यांनी मला सांगितलं, की केवळ त्या पाश्र्वगायनाच्या बळावर एकही संवाद न वापरता दीड हजार फूट लांबीचं शृंगारदृश्य असीफसाहेबांनी चित्रित केलंय. कमाल आहे!

असीफसाहेब हट्टी होते आणि योग्य कारणासाठी ते हट्टी होते. ‘मुघल-ए-आझम’च्या श्रेयनामावलीत पृथ्वीराज कपूर यांचं नाव सर्वात आधी येतं. दिलीपकुमार यांनी मला एक किस्सा सांगितला- ‘‘मी चित्रपटाचा नायक. त्यामुळे माझं नाव सर्वात आधी यायला पाहिजे असा रास्त आग्रह मी धरला होता. असीफसाहेबांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. अपनी सिगारेट तिसरी और चौथी उंगली के बीच में रख के मुझे बोले, देखो युसूफ, मेरे पिक्चर का नाम क्या है? ‘मुघल-ए-आझम’! तो हिरो कौन है? शहेनशहा अकबर.. याने की पृथ्वीराजजी. त्यांचंच नाव आधी येणार. पटत असेल तर पुढे चल, नाही तर सोडून दे पिक्चर आत्ताच! मी त्यांचं ऐकलं. कारण मला तरी अशी भूमिका परत कोण देणार?’’ लक्षात घ्या- हे दिलीपसाहेब म्हणतात!

चित्रपटाच्या रिलीजच्या अनेक कथा आहेत. त्या मी नाही सांगत. पण एक गमतीदार गोष्ट सांगतो. त्या काळात दर सोमवारी पुढच्या आठवडय़ाचं बुकिंग सुरू होत असे. असीफसाहेबांना लोकमानस माहिती होतं. हा उर्दूबहुल चित्रपट आहे, सुरुवातीच्या हवेत आठवडाभर चालेल, पण नंतर तो काहीसा झोपेल. तसंच होत होतं. आमच्या प्रीतममध्ये बसून असीफजी अंदाज घेत आणि मग आपल्या लोकांना सांगून ते विविध चित्रपटगृहांतली उरलेली तिकिटे खरेदी करायला लावत. पण काहीही झालं तरी सोमवारीच ‘चित्रपट हाऊसफुल झाला’ ही पाटी लागलेली ते पाहत असत. नंतर हा चित्रपट हळूहळू आपल्या आपण हाऊसफुल्ल होऊ लागला आणि तो आजवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट बनला.

के. असीफसाहेबांनी फक्त तीन चित्रपट दिग्दर्शित केले. ‘फूल’, ‘मुघल-ए-आझम’.. अर्धामुर्धा चित्रपट ‘लव्ह अँड गॉड’ करताना ते गेले. वामनानं दोन पावलांत पृथ्वी, आकाश सारं पादाक्रांत केलं आणि तिसरं पाऊल त्यानं बळीच्या मस्तकावर ठेवलं. के. असीफसाहेबांनी फक्त ‘फूल’, ‘मुघल-ए-आझम’ या दोनच चित्रपटांत सारं सिनेविश्व पादाक्रांत केलं आणि तिसऱ्या चित्रपटाचं तिसरं पाऊल त्यांनी स्वत:च्याच मस्तकावर ठेवलं आणि ते पगंबरवासी झाले.

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2018 1:36 am

Web Title: the story behind the making of mughal e azam
Next Stories
1 ‘पाकीजा’चे दिवस..
2 राजस फकिरी
3 माझा लेखक मित्र
Just Now!
X