News Flash

माझा लेखक मित्र

दादर स्थानकाच्या पश्चिम भागातला कबुतरखाना असतो. दादरच्या चाळी असतात, जुनी पाटीलवाडी असते आणि सिद्धिविनायकाचं मंदिर असतं.

(संग्रहित छायाचित्र)

कुलवंतसिंग कोहली

एका संध्याकाळी श्रीकांत मला म्हणाला, ‘‘मी टोनीला अशा एका ठिकाणी घेऊन जातो, की तो तिथं कधी गेला नसेल आणि पुढे  कधीही जाण्याची शक्यता नाही.’’ मी हैराण. त्याला म्हणालो, ‘‘श्रीकांत, टोनी को कुछ  ऐसी वैसी जगह मत लेके जाना। बिगाडो मत।’’ त्यानं टोनीला हाक मारली आणि म्हणाला, ‘‘चलो मेरे साथ. पण विचारू  नकोस, कुठे जायचंय ते. तू जिथं गेला नसशील अशी जागा आहे आणि तिथं मीच तुला नेऊ  शकतो.’’

आमच्या दादरची सर कशालाही येणार नाही! आज जरी दादरमध्ये तुम्हाला प्रचंड गर्दी दिसली तरी खऱ्या दादरकरांच्या मनात हिरव्यागार झाडांची राई आणि त्यात दडलेले बंगले असतात. दादर स्थानकाच्या पश्चिम भागातला कबुतरखाना असतो. दादरच्या चाळी असतात, जुनी पाटीलवाडी असते आणि सिद्धिविनायकाचं मंदिर असतं. हॉटेल व्यावसायिक असलो तरी मी मूळचा पक्का दादरकर आहे. लोणावळ्याला आमचं एक घर आहे. तसं दीड-दोन तासांत तिथं पोहोचता येतं. छान हवा असते, हिरवागार निसर्ग असतो. सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा मनाला सुखावत असतात. पण ते ‘वीकेण्ड होम’! जरा दोन दिवस तिथं राहिलं की तिसऱ्या दिवशी सकाळी दादरच्या आमच्या घरासमोरून जाणाऱ्या उड्डाणपुलावरच्या वाहनांचे आवाज कानात जागायला लागतात. अगदी पहाटे दादर स्थानकावरून जाणाऱ्या ट्रेन्सचे आवाज गुंजायला लागतात. काही तरी हरवत असल्याची जाणीव होते. मग आम्ही लोणावळ्यातून निघतो आणि लगेच दादरला येतो. परतताना चेंबूरचा आर. के. स्टुडिओ दिसला की हुश्श वाटतं! परंतु परवा बातमी वाचली की- आर. के. स्टुडिओ विकणार आहेत म्हणे! जिवाला

थोडंसं लागलं. मी त्याचा जन्म पाहिलाय.. आणि आता त्याचं विसर्जन पाहायला लागतंय. काही भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. राजजींच्या परिवारालाही असंच वाटत असणार, परंतु ‘कालाय तस्मै नम:’! आताशा हे स्टुडिओ म्हणजे पांढरे हत्ती बनले आहेत आणि वडिलांच्या स्वप्नांचे डोलारे पुढच्या पिढीने वाहात नेले पाहिजेत असंही नाही. असो.

नुकताच गणेशोत्सव साजरा झाला. सारी मुंबई गणेशोत्सवाच्या उत्साहानं भारली होती. माझं आणि गणेशोत्सवाचं एक नातं आहे. आम्ही घरी गणपती बसवत नाही, पण दादर भागातल्या सार्वजनिक गणपतींचं आम्ही सारे दर्शन घेतो. माझी गणेशगल्लीतल्या गणपतीवर विशेष श्रद्धा आहे. मोठा मुलगा अमरदीपसिंग म्हणजे टोनी याचा वर्गमित्र आहे- दिलीप पै, तो नंतर शिवसेनेचा शाखाप्रमुख झाला. दिलीपमुळे टोनी गणेशगल्लीतल्या गणपतीला जात असे. त्यांचा काही काळ तो कार्यकर्ताही होता. यंदाचं या गणपती मंडळाचं पन्नासावं वर्ष होतं. अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी जाताना हा गणपती काही क्षणांसाठी ‘प्रीतम’समोरच्या रस्त्यावर थांबतो. त्याची आम्ही पूजा करतो, हार अर्पण करतो, बाप्पांचे आशीर्वाद घेतो आणि मग आम्ही सारे गणपतीसोबत काही पावलं चालत जातो. त्याचीही एक कथा आहे. १९८० च्या सुमारास ‘प्रीतम’मध्ये कामगारांचा एक प्रश्न निर्माण झाला होता. मी त्याच्या चिंतेत होतो. त्या दरम्यान गणेशोत्सव येत होता. मी गणेशगल्लीतल्या गणरायाला मनापासून साकडं घातलं, ‘देवा आम्हाला यातून सोडव.’ आणि गणेशोत्सव संपता संपता तो प्रश्न सुटलाही! तेव्हापासून आजतागायत हा बाप्पा ‘प्रीतम’समोर थांबून आशीर्वाद देतो. यंदा आम्ही ठरवलं, की पुढच्या वर्षी ‘प्रीतम’मध्ये बाप्पा बसवायचा. काही तरी वेगळी योजना आहे. पाहू या, बाप्पा कशी सेवा करवून घेतो ते!

काही दिवसांपूर्वी कारने दादर पश्चिम भागातून चाललो होतो. विचारांत गर्क होतो. कार थांबली होती. बराच वेळ थांबली होती. विचारांतून बाहेर येत नजर टाकली तर समोर कबुतरखाना आणि डाव्या बाजूला गर्दीत हरवलेलं रेल्वे स्थानक. बेस्टच्या एका बसला वळण घेता येत नव्हतं, कारण कोणीतरी चुकीच्या पद्धतीनं स्वत:ची कार मधेच घुसवली होती. ‘चक् चक्’ करत गप्प बसलो. माझ्या माहितीतला मुंबईकर असा नव्हता. भारतात सर्वाधिक ट्रॅफिक सेन्स असलेलं शहर म्हणजे मुंबई अशी ख्याती होती. परंतु आता ती हरवली आहे. यावरून आठवलं, माझे पापाजी एकदा दादरच्या भाजी मंडईतून मला घेऊन कबुतरखान्याजवळ आले. त्यांनी काही धान्याचे दाणे माझ्या हाती दिले आणि कबुतरांना खायला घालायला सांगितले. बारा-तेरा वर्षांचा असेन तेव्हा, म्हणजे १९४५चा सुमार! तेव्हा कबुतरखाना पहिल्यांदा पाहिला. पापाजी म्हणाले, ‘‘हा कबुतरखाना का बनला माहिती आहे? आपण आपला किराणा माल घेतो ना, त्या मार्केटमध्ये रोज भरपूर धान्य येत असे. त्याची पोती ट्रकमधून हलवताना वा ढकलगाडय़ांवरून नेताना धान्य खाली सांडे. ते धान्य खायला तिथं कबुतरं येत व दाणे खात. वर्दळीचा भाग असल्यानं ती कबुतरं वाहनांच्या धक्क्याने मरून जात. बाजूला बघ, तिथं जैन मंदिर आहे. जैन धर्म हा शाकाहारी आहे आणि अधिक भूतदयावादी आहे. तिथल्या जैन साधूंना कबुतरांचं हे मरणं फार त्रासदायक वाटे. मग त्यांनी एका व्यापाऱ्याला विनंती केली, की काहीतरी उपाययोजना करा. मग त्यांनी नगरपालिकेकडून कबुतरांसाठी एक जागा मिळवली आणि कबुतरखाना बनवला.’’ माझ्या आठवणीप्रमाणे त्या व्यापाऱ्याचे नाव व्होरा असं होतं. ते ऐकून मला खूप गंमत वाटली. मी मांसाहारी आहे, पण माझ्या खाण्यात कधीही कबुतर हा पक्षी आला नाही. त्याचं मांस म्हणे रुचकर लागतं, पण कोणी त्याविषयी बोललं की माझ्या डोळ्यांसमोर हा प्रसंग उभा राहतो.

परतताना त्याच मार्गानं येत होतो. ‘प्लाझा’च्या अलीकडच्या सिग्नलवर गाडी थांबली आणि डावीकडे अलोट गर्दीनं भरलेला रानडे रोड दिसला. त्या रस्त्यावरून नजर फिरवताना एकदम आठवण झाली ती माझ्या एका लेखक मित्राची.. श्रीकांत सिनकर याची! तो इथंच कुठे तरी राहत होता. नेमकं कुठे राहत होता, ते मला कधीच कळलं नाही. परंतु एकदा त्याच्या तोंडून त्याच्या घराचा उल्लेख आला होता. (त्या दिवशी त्याच्या आठवणीने अस्वस्थ होऊन माझ्या एका मित्राला मी सांगितलं की श्रीकांत सिनकर दादरच्या कोणत्या भागात राहत होते याची चौकशी कर. त्यानं श्रीकांतच्या पुतणी कस्तुरी सिनकर यांना विचारून माहिती घेतली आणि कळलं की, श्रीकांत गोखले रोडवर राहत होता.) श्रीकांतच्या आठवणींनी एवढं अस्वस्थ व्हायचं कारण कोणतं होतं? मला तर त्याचं घर माहिती नाही, त्याचं कुटुंब माहिती नाही, तो अद्याप हयात आहे की नाही, हेही माहिती नाही.. आणि तरीही मी अस्वस्थ का झालो?

श्रीकांत जवळपास २०-२५ वर्ष ‘प्रीतम’मध्ये येत असे. मी कॅश काऊंटरवर बसणं कमी केलं होतं. परंतु रेस्टॉरंटमध्ये येणं-जाणं सुरू होतं. मला मराठी माणसांत अभावानं आढळणाऱ्या उंचीचा, सावळ्या रंगाचा, भव्य कपाळाचा माणूस दिसला. तो अगदी नियमितपणे येत असे. त्याच्याबरोबर त्याचे दोन-तीन मित्र असत. त्यांच्याशी गप्पा मारत ठरावीक टेबलावर बसून तो मद्यपानाचा आनंद घेत असे. त्याचं मद्यपान देखणं होतं. ते कडवट जहर पिताना त्याच्या चेहऱ्यावर अमृतपान केल्याचा आनंद असे. त्यांच्या गप्पांचे आवाज कधीही वाढले नाहीत. कधी कधी तो एकटा असे. हातात एखादा पेग घेऊन तो गृहस्थ विचार करत बसे. वेटर्स पेयात बर्फ टाकून जात, त्याचं त्याकडे लक्षही नसे. मधेच तो खिशातून एक छोटी टाचण वही काढून काही तरी खरडत बसे, पण शांत असे.

त्या माणसाची एक सवय मला त्याच्याबद्दलचं कुतूहल निर्माण करून गेली. ती म्हणजे, तो मद्यपानापूर्वी एक ग्लास दूध मागवत असे. ते संपवल्यावर मगच त्याचं पिणं सुरू व्हायचं. ते तीन-चार जण मिळून वीसएक पेग घेत असत. मला आश्चर्यच वाटलं. मी पुन्हा चौकशी केली तेव्हा मॅनेजरनं मला सांगितलं की, ‘‘त्यांचे मित्र दोन-दोन पेग घेतात आणि हे उंच गृहस्थ मात्र बारा-तेरा पेग घेतात.’’ मग माझी उत्सुकता आणखी वाढली. त्या गृहस्थांना अजिबात चढत नसे, त्यांचे पाय स्थिर असत. चालताना ठामपणे चालत जात. ते मद्यपान चालू असताना मधेच उठून कुठेतरी जात व तासाभरानं परत येत. परतल्यावर पुन्हा त्यांचं ‘आन्हिक’ चालू होई आणि मित्रांबरोबर गप्पाही! ‘प्रीतम’ बंद होईपर्यंत ते बसत. शेवटी एकदा मी टोनीला म्हणालो, ‘‘बेटा, ये कौन शख्स है, जरा पता तो करो।’’ टोनीनं चौकशी केली आणि त्याला कळलं, की तो गृहस्थ मराठी साहित्यातला बडा माणूस आहे. त्यांचं नाव- श्रीकांत सिनकर! बस्स, त्या दिवशी माझ्या मनात त्याच्याबद्दल स्नेह निर्माण झाला. मी त्याच्या त्या ठरलेल्या टेबलवर गेलो, त्याची ओळख करून घेतली आणि ती ओळख श्रीकांतनं ‘प्रीतम’मध्ये येणं बंद करेपर्यंत टिकली. मी श्रीकांतशी ‘अरे-तुरे’त बोलायचो आणि तो मला ‘सरदारजी’ किंवा ‘सरजी’ असं म्हणायचा. श्रीकांतचं बोलणं सौजन्यशील व आतिथ्यशील असे. नम्र असे, पण त्यात ठामपणाही असे.

एका संध्याकाळी तो मला म्हणाला, ‘‘मी टोनीला अशा एका ठिकाणी घेऊन जातो, की तो तिथं कधी गेला नसेल आणि पुढे कधीही जाण्याची शक्यता नाही.’’ मी हैराण. त्याला म्हणालो, ‘‘श्रीकांत, टोनी को कुछ ऐसी वैसी जगह मत लेके जाना। बिगाडो मत।’’ श्रीकांत हसत म्हणाला, ‘‘सरजी, वो आप का बेटा है। वो मुझे सुधार देगा।’’ त्यानं टोनीला हाक मारली व त्याला म्हणाला, ‘‘चलो मेरे साथ. पण विचारू नकोस कुठे जायचंय ते. तू जिथं गेला नसशील अशी जागा आहे आणि तिथं मीच तुला नेऊ  शकतो.’’ टोनी जायला तयार होईना. एक तर मद्यपान केलेला माणूस. तो कुठे नेईल कुणास ठाऊक? मीच टोनीला म्हणालो, ‘‘तो बोलावतोय ना, मग जा की!’’ टोनी गेला. तासा-दीड तासानंतर ते परतले. टोनी एकदम उत्तेजित होता. मला म्हणाला, ‘‘पापाजी, मी कुठे गेलो होतो माहिती आहे? मी जेलमध्ये गेलो होतो.’’ मी थक्क झालो. आता हा जेलमध्ये कशाला गेला? टोनी उत्तरला, ‘‘पापाजी, श्रीकांतजी हे गुप्तहेरकथा आणि पोलिसी चातुर्यकथा लिहितात. रोज संध्याकाळी ते आपल्या जवळपासच्या एखाद्या कारावासात जातात, पोलिसांचं रेकॉर्ड बघतात, त्यांच्याशी गप्पा मारतात. त्यांना एखाद्या गुन्ह्य़ाबद्दल कुतूहल निर्माण होतं. मग ते पोलीस परवानगीनं त्या कैद्याला भेटतात व नंतर कथा वा कादंबरी लिहितात.’’ टोनी, गोगी दोघांनाही मराठी उत्तम येतं. त्यांना श्रीकांतचं मराठी वाचकांत असलेलं स्थान लगेच ध्यानात आलं. तशी सर्वच ग्राहकांशी आमची गट्टी होत असे, परंतु श्रीकांत हा खास आमचा माणूस झाला!

त्या दिवशी श्रीकांतने टोनीला एका तुरुंगात नेलं. टोनीने मला सांगितलं, ‘‘पापाजी, श्रीकांतजींना सगळे पोलीस ओळखतात. त्यांनी तिथल्या इन्स्पेक्टरशी बोलणं केलं. त्यांनी श्रीकांतजींना एक फाइल दाखवली. ती त्यांनी भराभर वाचली, काही नोट्स काढल्या. मग आम्हाला इन्स्पेक्टरने जेलच्या आत नेलं. मी तर घाबरून गेलो होतो. ती कैद्यांना भेटण्याची जागा होती. मध्ये एक लोखंडी जाळीचा पडदा होता. काही सेकंदांत एका कैद्याला साखळदंडानं बांधलेल्या अवस्थेत आणलं गेलं. तो कैदी येऊन समोर बसला. त्याच्या नजरेत कोणतेही भाव नव्हते. दगडी डोळे वगैरे म्हणतात तसे त्याचे डोळे होते. थंडगार! श्रीकांतजी कैद्याशी काही बोलू लागले. तो सुरुवातीला काही बोलेच ना. श्रीकांतजींचा आवाजही खूप हळुवार होता. मला ऐकू येत नव्हतं, पण कैद्याला बरोबर ऐकू जात असावं. काही मिनिटांनंतर तो कैदी हो-नाही असं करत एकेका शब्दात उत्तरे देऊ  लागला. पाचएक मिनिटांनी तो एकेका वाक्यांची उत्तरे देऊ  लागला आणि पंधरा मिनिटांनी तर त्याला श्रीकांतजींनी असं बोलतं केलं, की तो घडाघडा बोलू लागला! बायकोला त्यानं मारल्यामुळे तो कैदी तुरुंगात होता. श्रीकांतजींशी बोलता बोलता तो घळाघळा रडू लागला. त्यानं काय सांगितलं ते कळलं नाही मला. पण त्याला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप होत असावा. श्रीकांतजींशी बोलणं झाल्यावर तो उठला. त्याचं उठणं थोडंसं जडावलं होतं. बेडय़ांचं नाही, तर एका अपराधीपणाचं ओझं त्यात होतं. तो जाताना श्रीकांतजींना एवढंच म्हणाला, ‘जर तुम्ही आधी भेटला असतात, तर कदाचित मी तिला मारलं नसतं.’’’ या प्रसंगानंतर टोनीचा एकूण दृष्टीकोनच बदलून गेला. तो समाजाशी निगडित होताच, पण त्याच्या सामाजिककार्यात जबाबदारीबरोबरच सहानुभूतीची भावनाही वाढली.

टोनी नंतर अनेकदा श्रीकांतबरोबर तुरुंगयात्रा करत असे. प्रत्येक वेळी तो अनुभवसमृद्ध होत असे. तुरुंगातून परतल्यावर श्रीकांत पुन्हा एकदा दूध मागवून ते पीत असे आणि त्यानंतर रोजचं आचमन सुरू! मी न राहवून एकदा त्याला विचारलं, ‘‘तू मद्याच्या आधी दूध का पितोस? हे अगदीच ऑड कॉम्बिनेशन आहे.’’ तो हसून म्हणाला, ‘‘सरजी, तुम्ही दारू पीत नाही, त्यामुळे दारूनं कशी अ‍ॅसिडिटी होते, हे तुम्हाला माहीत नाही. त्या जबरदस्त अ‍ॅसिडिटीला घालवण्यासाठी मी दूध पितो. त्यात तुम्ही पाहिलंत, मला भेसळ आवडत नाही. मी शुद्ध दारू पितो, त्यासोबत काहीही खात नाही. त्यामुळे अ‍ॅसिडिटी होण्याचा धोका असतो. तो मी दूध पिऊन कमी करतो.’’ मी कपाळाला हात लावला, कोणाचं काय अन् कोणाचं काय!

श्रीकांत अगदी दररोज येत असे. त्याची तब्येत बरी नसेल तरच तो चुकत असे. आमच्या येथे ‘अ‍ॅरिस्टोक्रॅट’ या त्याच्या आवडत्या व्हिस्कीचा पेग त्या काळात साधारणत: २५ रुपयांना मिळत असे. तो व त्याचे मित्र वीसएक पेग घेत असत. तो त्याच्या मित्रांना कधीही पैसे देऊ  देत नसे. त्या काळात दिवसाला पाचेकशे रुपये खर्च करणारा तो आमचा ग्राहक होता. जेवढी वर्ष त्याला येता आलं तो आला. त्यानं कधीही आमच्याकडे उधारी ठेवली नाही. रोजच्या रोज पैसे द्यायचा. एके दिवशी त्याला म्हणालो की, ‘‘आजचं बिल ‘प्रीतम’च्या नावावर!’’ तर म्हणाला, ‘‘आज द्याल हो! उद्याचं काय?’’ मी उत्तरलो, ‘‘श्रीकांत, तू आता ‘प्रीतम’चा फॅमिली मेंबर आहेस. आजपासून तुला मद्य फुकट.’’ तो त्याक्षणी उत्तरला, ‘‘सरजी, फुकट खाणारी-पिणारी जमात वेगळी. मी लेखक आहे.. स्वत:च्या जिवावर जगणार आणि स्वत:च्या जोरावर पिणार. उलट, तुमच्याच हॉटेलात तुम्हाला पाजीन मी!’’ आणि त्या दिवशी तो ‘प्रीतम’ दणाणून सोडणारं हसला, पहिल्यांदा!

काही वर्षांनी आम्ही ‘मिडटाऊन प्रीतम’ उभं केलं आणि श्रीकांतचं येणं बंद झालं. १९८९ नंतर तो आमच्याकडे आलाच नाही. आमच्या मनात घर केलेल्या श्रीकांतची आम्हीही खबर ठेवू शकलो नाही. परवा रानडे रोडच्या निमित्तानं तो मनात जागा झाला, आठवणींत सळसळत राहिला आणि आज कागदावर आला. नाहीतरी लेखकाला कागद आणि शाईतूनच आठवावं हे बरं, नाही का?

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2018 12:10 am

Web Title: yeh hai mumbai meri jaanarticle on shrikant sinkar
Next Stories
1 आदरातिथ्याचे प्रणेते
2 अर्ध्यावरती डाव मोडला..
3 हृदयरोगी हृदयसम्राज्ञी!
Just Now!
X