सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदवीत शेअर बाजार तीन आठडय़ांच्या नीचांकावर येऊन ठेपला आहे. २०७.७० अंश घसरणीसह सेन्सेक्स २२,२७७.२३ वर येऊन ठेपला. तर ५७.८० अंश घसरणीमुळे निफ्टी ६,७००चा टप्पा सोडत, ६,६७५.३०पर्यंत खाली आला. या तीन सत्रांत मुंबई निर्देशांकाने ४३८.१० अंश नुकसान सोसले आहे.
मार्चमधील घाऊक तसेच किरकोळ महागाईने डोके वर काढल्याने रिझव्र्ह बँकेकडून आता व्याजदर कपात नाही, या शक्यतेने गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातील निधी काढून घेणे पसंत केले. यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याच्या अंदाजानेही गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान तसेच भांडवली वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या विक्रीचे धोरण अवलंबले.
गेल्या आठवडय़ात ऐतिहासिक उच्चांकाला पोहोचलेल्या भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी सुरुवातीला नफेखोरी अवंलबली. मात्र आता अर्थव्यवस्थेवरील तणाव त्यांच्या व्यवहारांतून दिसत आहे. वाढती महागाई आणि पाठोपाठ कमी मान्सूनच्या अंदाजाने त्यात भरत घातली आहे. यामुळे माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू, बांधकाम क्षेत्रातील समभागांची गुंतवणूकदारांनी विक्री केली.
बुधवारी सेन्सेक्समधील २२ समभागांचे मूल्य घसरले. यामध्ये रिलायन्स, टीसीएस, टाटा मोटर्स, इन्फोसिस, लार्सन अॅण्ड टुब्रो, एनटीपीसी, विप्रो, टाटा पॉवर, भेल, हीरो मोटोकॉर्प, एचडीएफसी, सिप्ला यांची आघाडी राहिली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बांधकाम निर्देशांक सर्वाधिक, ३.८७ टक्क्यांनी घसरला. तर आयटी निर्देशांकातील घट २.४९ टक्क्यांची राहिली.
रुपयाही घसरणीला तीन आठवडय़ांपूर्वीच्या  ६०.३७ नीचांकपदी
मुंबई: भांडवली बाजाराप्रमाणे परकीय चलन व्यासपीठावरदेखील रुपया आता तीन आठवडय़ांच्या नीचांकावर येऊन विसावला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी १४ पैशांनी घसरत ६०.३७ वर येऊन ठेपला. भांडवली बाजारातील विदेशी संस्थांगत गुंतवणूकदारांना निधी काढून घेण्यासाठी तसेच तेल कंपन्यांना लागणाऱ्या अमेरिकन चलनामुळे रुपया सातत्याने घसरत आहे. ११ एप्रिलपासूनची सातत्याने होणारी त्यातील घसरण ही आता ३० पैशांपर्यंत गेली आहे.