पुण्यात सोने मागणीला उठाव
प्रतिनिधी, पुणे
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या मंगळवारच्या (२१ एप्रिल) अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सराफी बाजारपेठेत सोमवारपासूनच लगबग सुरू झाली आहे. लग्नतिथी आणि सोन्याच्या दरामधील स्थिरता यामुळे अक्षय तृतीयेला चांगली खरेदी होईल, असे सराफी व्यावसायिकांनी सांगितले.
अक्षय तृतीयेपासून लग्नतिथी सुरू होते. त्यासाठी आधी नोंदणी केलेल्या दागिन्यांची खरेदी केली जाते. १० ग्रॅम सोन्याचा दर २७ हजार रुपयांच्या जवळपास आहे. सोन्याच्या दरामध्ये स्थिरता असल्याने ग्राहकांमध्ये सोनेखरेदीचा कल असल्याचे पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी केल्यामुळे सोने वाढते ही श्रद्धा असल्यानेही मुहूर्ताची वेढणी किंवा नाण्याला मागणी असते. या मुहूर्तापासून सुरू होणाऱ्या लग्नतिथीमुळे दागिने आणि मुहूर्ताचे सोनेखरेदी केली जाते, असे अजित गाडगीळ यांनी सांगितले.

पिढीजात सुवर्णकारांशी ग्राहकांचे दीर्घकालीन संबंध
सोन्याचा भाव काही दिवसांपूर्वी दहा ग्रॅमसाठी २५ हजार ९०० रुपयांपर्यंतही आला होता. यात पुन्हा वाढ झाली आणि पुढेही होतच राहणार. सोन्यातील गुंतवणूक आजही निर्धोक मानली जाते. त्यामुळे ग्राहकांकडून पारंपरिक सण व उत्सवांना नेहमीच सोन्याची खरेदी केली जाते. यंदाही ती मोठय़ा उत्साहाने होईल.
या व्यवसायात आता काही परदेशी कंपन्या, दुकाने आली आहेत. ते आकर्षक सवलती देऊन ग्राहकांना आकृष्ट करतात. मात्र पारंपरिक आणि पिढीजात सुवर्णकार/व्यावसायिक यांच्याबरोबरचे ग्राहकांचे संबंध हे दिर्घकालीन असतात.
सुधीर पेडणेकर, अध्यक्ष, मुंबई सुवर्णकार संघटना.

गोल्ड ईटीएफ खरेदीसाठी आज अधिक कालावधी
मुंबई : मंगळवारच्या अक्षय तृतियेला यंदा भांडवली बाजारातील गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यासाठीच्या विस्तारित व्यवहार कालावधीची जोड देण्यात आली आहे. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारावर गोल्ड ईटीएफसाठी समभाग खरेदीप्रमाणेच विहित वेळेत व्यवहार होतात. मात्र २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ पर्यंत खरेदी-विक्री करता येणार आहे. सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० पर्यंत नियमित तसेच सायंकाळी ४.३० ते ७ वाजेपर्यंत विशेष व्यवहार करता येणार आहेत. यासाठी मुंबई शेअर बाजार या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारणार नाही.

सोने आयात १०० टन होणार..

मुंबई : सोने खरेदीचे दोन महत्त्वाचे मुहूर्त येणाऱ्या एप्रिलमध्ये मौल्यवान धातूंची आयात तब्बल १०० टन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एप्रिल २०१४ च्या तुलनेत यंदा सोन्याची आयात ८९ टक्क्य़ांनी वाढेल, असा अंदाज ‘दी ऑल इंडिया जेम्स अ‍ॅन्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन’ने (जीजेएफ) व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी होत असल्याने आणि रिझव्‍‌र्ह बँकेवरील नियंत्रणही काहीसे कमी झाल्याने यंदा भारताची सोने आयात वाढेल, असे फेडरेशनचे नवे अध्यक्ष मनिष जैन यांनी म्हटले आहे. मार्च २०१५ मधील १५९.५० टनच्या तुलनेत मात्र यंदा सोने आयात कमीच असेल, असेही ते म्हणाले. गेल्या एप्रिलमध्ये सोन्याची आयात अवघी ५३ टन झाली होती. भारत वर्षांला सरासरी ८०० ते १,००० टनपर्यंत सोने मागणी नोंदवितो.