सरलेल्या २०१३-१४ आर्थिक वर्षांची शेवटच्या म्हणजे जानेवारी ते मार्च तिमाहीसाठी इन्फोसिसकडून मंगळवारी जाहीर होणाऱ्या वित्तीय कामगिरीसह,  देशातील माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या निकालांच्या हंगामाला सुरुवात होईल. आधीच्या तिमाहीतील इन्फोसिसची कामगिरी गुंतवणूकदार जगतासाठी आश्चर्यकारक ठरली होती, पण यंदा प्रत्यक्ष निकालांपेक्षा आगामी वर्षभरावर नजर ठेऊन कंपनीकडून दिले जाणारे निर्देश गुंतवणूकदारांच्या दृष्टीने उत्सुकतेचे ठरतील.
टीसीएस आणि इन्फोसिस या देशातील सॉफ्टवेअर क्षेत्रातील दोन्ही अग्रणी कंपन्यांनी मार्च तिमाहीतील कामगिरीबाबत नरमाईचे संकेत यापूर्वीच दिले असून, त्याचेच प्रत्यंतर येत्या मंगळवारी (१५ जानेवारी) जाहीर इन्फोसिसच्या तिमाही निकालात प्रत्यक्षात उमटलेले पाहायला मिळेल, असा सर्वच विश्लेषकांचाही कयास आहे.
शेअर बाजार आणि एकूण गुंतवणूकदारांनीही या  कंपन्यांच्या निकालांबाबत फारसे उत्साहवर्धक अंदाज बांधले नसले तरी, महसुली वाढीत टीसीएस आणि इन्फोसिस दोहोंनाही यंदा एचसीएल टेक आणि विप्रो या कंपन्यांकडून मात दिली जाईल, असे मानले जात आहे. इन्फोसिसच्या तिमाही नफ्यात दीड ते तीन टक्क्य़ांनी घसरण होईल यावर विश्लेषकांचे एकमत होताना दिसत आहे.
मंगळवारी (सोमवारच्या सुट्टीनंतर) शेअर बाजार इन्फोसिसच्या निकालासहच उघडणार असल्याने, इन्फोसिसकडून चालू २०१४-१५ आर्थिक वर्षांसाठी महसुली वाढीबाबत निर्देश काय असतील, यावरच बाजाराचा आगामी पंधरवडय़ासाठी कल बहुतांश ठरेल. टीसीएस आणि इन्फोसिस या दोन्ही कंपन्यांनी २०१४-१५ हे वर्ष वित्तीय कामगिरीच्या दृष्टीने उत्तम राहण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. परंतु या वर्षांत ६ ते ८ टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दराने महसुलात वाढीचे संकेत मंगळवारच्या निकालासमयी दिले गेल्यास, ते बाजाराच्या दृष्टीने सुखकारक ठरेल, असे मत कोटक इन्स्टिटय़ूशनल इक्विटीज्चे संजीव प्रसाद यांनी व्यक्त केले. इन्फोसिसच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवरच अन्य माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या कामगिरीला जोखले जाण्याचा आपल्याकडे परंपरागत प्रघात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पण महसुली वाढीबाबत सहा टक्क्य़ांपेक्षा खालचे इन्फोसिसच्या व्यवस्थापनाने कयास व्यक्त केल्यास, ते बाजाराच्या दृष्टीने खूपच नकारात्मक ठरेल आणि सर्वच माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांना याचा फटका बसेल.

समभागाची कामगिरी
शुक्रवारी, ११ एप्रिलला इन्फोसिसचा बंद भाव रु. ३,२३५.८५ असा होता. अलीकडच्या काळात माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमधील नरमाईत सर्वाधिक वाईट कामगिरी इन्फोसिसच्या समभागाची राहिली आहे. मार्च तिमाहीत कामगिरी खराब राहील, असे अंदाज बांधत गेल्या महिन्याभरात इन्फोसिसच्या समभाग १२ टक्क्य़ांनी आपटला आहे. जानेवारीत या समभागाने ३,८४७.२० रु. असा वार्षिक उच्चांक दाखविला होता.