निर्देशांकाची सलग चौथ्या सत्रात आपटी; पंधरवडय़ाचा तळ
सलग चौथ्या व्यवहारात घसरण नोंदविताना मुंबई शेअर बाजाराने नव्या सप्ताहाची सुरुवातही नकारात्मक प्रवासाची राखली. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत येत्या महिन्यात होणाऱ्या व्याजदर वाढीच्या अन्य बाजारावरील चिंतेचे पडसाद येथेही उमटले.
७१.५४ अंश घसरणीने सेन्सेक्स २५,२३०.३६ वर येऊन ठेपला. तर १८.६५ अंश नुकसानासह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,७३१.०५ वर स्थिरावला. प्रमुख निर्देशांकांनी आता गेल्या पंधरवडय़ाचा तळ अनुभवला आहे.
गेल्या तीन व्यवहारात सेन्सेक्सने ४७८ अंश घसरण नोंदविल्यानंतर सोमवारचा त्याचा प्रवास काहीसा तेजीसह झाला. मात्र चिंतेबरोबरच गुंतवणूकदारांमध्ये नफेखोरीही दिसून आली. त्याची परिणीती बाजारात दिवसअखेर घसरण होण्यात झाली.
मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात दुपारनंतर घसरणीचे चित्र अधिक गडद होऊ लागले. या दरम्यान निफ्टीचा स्तर ७,८२०.६० ते ७,७२२.२० असा राहिला.
सेन्सेक्समधील ३० पैकी २३ समभागांचे मूल्य घसरले. यामध्ये टाटा स्टील, ल्युपिन, ओएनजीसी, सिप्ला, बजाज ऑटो, एचडीएफसी, टीसीएस यांचा क्रम राहिला. तर अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, हिंदुस्थान यूनिलिव्हर, कोल इंडिया, आयसीआयसीआय बँक यांनी दिवसअखेरही वाढ नोंदविली.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये भांडवली वस्तू, आरोग्यनिगा, माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता आदी घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.३८ व ०.२९ टक्क्य़ांनी घसरले.
एमसीएक्सवरील र्निबध मागे
नवा वायदे बाजार असलेल्या एमसीएक्सवरील विदेशी गुंतवणूकदारांच्या समभाग खरेदीचे र्निबध रिझव्‍‌र्ह बँकेने रद्द केले आहेत. यामुळे भांडवली बाजारात सूचिबद्ध या बाजाराच्या समभागाचे मूल्यही सप्ताहारंभीच्या व्यवहारात ७ टक्क्य़ांनी उंचावले. मुंबई शेअर बाजारात त्याला ९१६.६० तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर त्याला ९२०.४५ रुपये भाव मिळाला. व्यवहारात समभाग मूल्य ९३४ रुपयांपर्यंत झेपावले होते.
मुंबई शेअर बाजाराकडे असलेल्या माहितीनुसार, मार्च २०१६ अखेर एमसीएक्समध्ये ९९.६५ टक्के ‘पब्लिक होल्िंडग’ आहे. तर उर्वरित ०.३६ टक्के हिस्सा अन्यमार्फत आहे.
एमसीएक्समधील थेट संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा थेट विदेशी गुंतवणूक धोरणानुसार निश्तिच पातळीपेक्षा कमी झाला असल्याने त्याच्यावरील याबाबतचे र्निबध मागे घेत असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितले. यामुळे कंपनीवरील समभाग खरेदीचे बंधनही तातडीने हटविण्यात आल्याचे मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले आहे.
व्ही-मार्टमधील कोटक महिंद्रचा
हिस्सा रोडावला
किरकोळ विक्री साखळी क्षेत्रातील व्ही-मार्ट रिटेलमधील हिस्सा कोटक महिंद्रने कमी केला आहे. ५०.६९ कोटी रुपयांना १० लाख समभाग खुल्या बाजारात विकत कोटक महिंद्र (इंटरनॅशनलने) व्ही-मार्ट रिटेलमधील आपला हिस्सा ५.५४ टक्क्य़ांनी कमी केला आहे.
कंपनीचा यापूर्वीचा हिस्सा ९.४३ टक्के होता. या व्यवहारामुळे दिवसअखेर बाजारात सूचिबद्ध व्ही-मार्ट रिटेलला ५१५ रुपयांचा भाव मिळाला.
जस्ट डायल
रु. ७०२.२५ (-६.७७%)
कारण : तिमाही नफ्यातील २५ टक्के घसरण.
पॉवर ग्रीड
रु. १४८.०५ (+२.५६%)
कारण : सेन्सेक्समध्ये भेलऐवजी प्राप्त स्थान.
नाल्को
रु. ४१.५५ (+२.७२%)
कारण : निर्गुतवणुकीबाबतच्या बुधवारच्या बैठक पाश्र्वभूमिवर.
कॉक्स अ‍ॅन्ड किंग्स
रु. १४९.८० (-१३.९८%)
कारण : ३०५.५३ कोटींच्या निव्वळ तोटय़ानंतर