जिल्ह्य़ातील राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे ती भाजपचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी स्वतंत्रपणे आयोजित केलेल्या सामूहिक विवाहसोहळ्यांची!
लोणीकर यांनी ७ फेब्रुवारीला परतूर येथील बैठकीत आपल्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या परतूर व मंठा या दोन तालुक्यांसाठी २४ एप्रिलला सामूहिक विवाहसोहळा घेण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ११ फेब्रुवारीच्या जालना दौऱ्यात परतूर व मंठा तालुक्यांतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी या विवाहसोहळ्यांचे जाहीर निमंत्रण दिले होते. मुख्यमंत्र्यांनी या निमंत्रणाचा स्वीकारही केला होता. लोणीकर सामूहिक विवाहसोहळ्याची तयारी करीत असतानाच २९ फेब्रुवारीला पत्रकार बैठक घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आयोजक या नात्याने १७ एप्रिलला जालना येथे जिल्हापातळीवर सामूहिक विवाहसोहळ्याची घोषणा केली. विशेष म्हणजे दानवे यांच्या सामूहिक विवाहसोहळ्याचे क्षेत्र संपूर्ण जिल्हा म्हणजे लोणीकर यांचा विधानसभा मतदारसंघही आहे.
‘दिवस दुष्काळाचा त्यातून नापिकीची रात, सामूहिक विवाहातून करू या वाईटावर मात’ असा संदेश देत दानवे यांनी आयोजिलेल्या सामूहिक विवाहसोहळ्याचे मुख्य कार्यालय भाजप जिल्हा कार्यालयात उघडण्यात आले. संपर्कासाठी अन्य तालुक्यांप्रमाणे लोणीकर यांच्या विधानसभा मतदारसंघातील दोन तालुक्यांसाठीही प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. कोणतेही शुल्क नसणाऱ्या या विवाहसोहळ्यात मंडप, भोजन, वधू-वरांचे कपडे, मंगळसूत्र, भेटवस्तू देण्यात येणार आहेत. शहरातून वरात काढण्यात येणार आहे. विवाहानंतर आकर्षक आतषबाजी केली जाणार असल्याचे दानवे यांच्या वतीने जाहीर करण्यात आले.
या पाश्र्वभूमीवर लोणीकर यांनी गुरुवारी त्यांनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाहसोहळ्याच्या पूर्वतयारीची कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. जास्तीत जास्त वधू-वरांना सामूहिक सोहळ्यात सहभागी करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन लोणीकर यांनी या वेळी केले. दुष्काळी स्थितीत जनतेने विवाह समारंभावरील अनावश्यक खर्च टाळावा, असे ते म्हणाले.
दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी स्वतंत्ररीत्या आयोजित केलेल्या विवाहसोहळ्यांचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे यांनी मात्र समर्थन केले. भांदरगे म्हणाले की, दोन्ही वरिष्ठ नेते असून स्वतंत्र सामूहिक सोहळ्यांमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नास हातभारच लागणार आहे. ही काही दोन्ही नेत्यांमधील आपसांमधील स्पर्धा नाही. त्या दृष्टीने याकडे पाहणे योग्य नाही, तर एक सामाजिक कार्य म्हणून त्याकडे पाहावे.