अमरप्रित चौकात भरधाव वाहनाने दुचाकीला उडवले

एका भरधाव वाहनाने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीला रविवारी दुपारी १२ च्या सुमारास अमरप्रित चौकात धडक मारली. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणी ही नियोजित वधू होती. अमरप्रित चौकातील महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. शहरातील एकूणच वाहतुकीचे तीनतेरा वाजले असून सिग्नल तोडण्याचा बिनधास्तपणा वाढत चालला आहे. यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचीही वाहने आहेत, हे विशेष!

प्रथमा सुभाष वाठोरे (वय २१) ही दुचाकीवरून अमरप्रित चौकातून जात होती. यादरम्यान एका चारचाकी वाहनाने तिच्या दुचाकीला पाठीमागून उडवले. यात प्रथमा गंभीर जखमी झाली. तिला तातडीने महात्मा गांधी मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह घाटीत दुपारी तीनच्या सुमारास नेण्यात आला. या घटनेची नोंद क्रांती चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. प्रथमा बँकेच्या परीक्षेसाठी दुचाकीवरून जात होती. पडेगाव येथील माजी सैनिक कॉलनीतील रहिवासी असलेल्या प्रथमाचा अवघ्या काही दिवसांपूर्वीच म्हणजे १७ एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता. २८ मे रोजी तिचे लग्न निश्चित झाले होते. मात्र तत्पूर्वीच शहरातील बेशिस्त वाहतुकीने तिचा बळी घेतला आहे.

अमरप्रितसह इतरही काही चौकातील अपघाताचे प्रमाण अलीकडे वाढत चालले आहे. सिग्नलचे पालन करणाऱ्या काही मोजक्याच चौकापैकी अमरप्रित चौकातील सिग्नल आहे. मात्र या सिग्नलच्या ठिकाणी वाहनांधारकांची निघण्याची अतिघाई इतरांच्या जीवावर उठत आहे. अवघे काही सेकंदही वाहनधारकांना थांबता येत नाही. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असल्याने आणि मागील वाहनांचा रेटा सुरू असल्याने सिग्नल तोडून पुढे जाण्याचे प्रकार सर्रासपणे सध्या शहरात सुरू आहेत. अनेक चौकांमधील सिग्नल नावालाच सुरू आहेत. सिग्नल पाळण्यासाठी आहेत की तोडण्यासाठी आहेत, असा प्रश्न निर्माण व्हावा, एवढी वाहतूक व्यवस्था ढासळली आहे.

औरंगाबादेतील चंपा चौकचे उदाहरण समोर आहे. या चौकात सिग्नल सुरू असतात. मात्र ते कोणाकडूनही पाळले जात नाहीत. सिग्नल न पाळणाऱ्यांमध्ये केवळ एक विशिष्ट वर्गच नाही तर शासकीय वाहनेही सिग्नल पाळत नाहीत, हेही दिसून येत आहे. शनिवारी दुपारी शहानूरमियाँ दर्गा मार्गावरून दूध डेअरीच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेल्या एका शासकीय वाहनाने टिळकनगर चौकातील सिग्नल सुरू असतानाही पुढे जाणे पसंत केले. शासकीय अधिकाऱ्यांचीच वाहने नियम पाळत नसतील तर सर्वसामान्यांकडून कशी अपेक्षा करावी, असा सूर उमटू लागला आहे.

सिग्नलवर थांबणारेच दोषी

सिग्नल तोडण्याचा जणू काही ‘नियम’च सध्या औरंगाबादेत लागू करण्यात आला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश चौकात सिग्नलचे नियम पाळले जात नाहीत. सिग्नलचा नियम पाळणाऱ्यांकडेच तिरक्या नजरेने पाहिले जाते. त्यामुळे सिग्नलवर थांबणाऱ्यांकडेच दोषी असल्यासारखे पाहिले जाते. पोलीसही यासंदर्भात कडक नसल्यानेच दिवसेंदिवस वाहतूक व्यवस्था ढेपाळत आहे. त्यातूनच बळी जात आहेत.