नातवाचा दाखला शुल्कासाठी अडकला

सावित्रीबाईंना आज कचरा वेचता-वेचता दुपार झाली. तहानेने व्याकुळ झाल्यामुळे त्यांनी नजीकच घर असलेल्या नातवाला पाणी घेऊन येण्याचा निरोप पाठवला. दहा वर्षांंचा नातू पाणी घेऊन आला. गणेश भारत पाचोणे त्याचे नाव. पाणी दिल्यानंतर गणेश आजीने अर्धवट सोडलेले कचऱ्याचे पोते बांधण्याचे काम करू लागला. हा कोण पोरगा, असे सावित्रीबाईंना विचारले तर त्यांनी सांगितले, हा माझ्या लेकीचा पोर! गणेशची शाळा सुटली का? यावर त्या म्हणाल्या, ‘आता काय सांगावी त्याच्या शाळेची कथा.. शाळेत जात होता. लेकीला लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून माझ्याकडे आणला आहे. आता शाळा पाहायचीय. पण अगोदरच्या शाळेतून दाखला कसा आणावा, हे सूचत नाही. तेथील सहा हजार रुपये शुल्क बाकी आहे. ती द्यायची ऐपत नाही. लेक धुणी-भांडी करते. अन् जावई मोलमजुरी.. सावित्रीबाई सांगत होत्या.’

मुलांची शाळा कशी सुटते आणि ते कसे शाळाबाह्य़ होतात, याचे गणेश पाचोणे हे एक प्रातिनिधिक उदाहरण. राज्यात गुरुवारी सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला. शाळा, मुले, शिक्षकही कसे झळकतील, याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून कोडकौतुकाचे सोहळे रंगले. एकीकडे राज्यभर दिसणारे हे चित्र. तर दुसरीकडे औरंगाबादच्या कटकटगेट भागातील कमर इकबाल रोडवर कचरा वेचणाऱ्या सावित्रीबाईंपुढील नातवाच्या शुल्कामुळे अडकलेल्या दाखल्याचे! तो सहा हजार रुपये भरून कसा आणावा? दुसऱ्या शाळेत नाव नोंदवण्यासाठी सहा हजारांची तजवीज कशी करावी, याची सावित्रीबाईंना चिंता. दोन दिवस तर शाळेचे गेले. आता कधी नव्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करणार, असा प्रश्न विचारला तर तीच तर चिंता करतेय मी, असे पोटतिडकीचे त्यांचे शब्द!

सावित्रीबाईंनी नातवासाठी त्यांनी आता आपल्याच घराजवळची एक शाळा पाहून ठेवली आहे. पण तेथे नाव नोंदवायचे कसे? त्यासाठी पूर्वीच्या शाळेतून दाखला आणावा लागेल. त्यासाठी शुल्काचे सहा हजार रुपये बाकी भरण्यासाठी तजवीज करावी लागेल. त्यात पुन्हा पहिल्या दिवशीच पुस्तक मिळण्याची संधीही हुकल्याने वह्य़ा-पुस्तकांसाठी वेगळा खर्च जमवावा लागेल. म्हणजे तसा सहा हजार अधिक एक ते दीड हजार, असा सात ते आठ हजार रुपयांच्या घरात त्यांना शैक्षणिक खर्च करावा लागेल.

कचरा वेचून हाती ते काय लागत असेल? जगण्याचीच जिथे मारामार, तिथे शाळेची शुल्क कशी भरायची? असे अनेक प्रश्न सावित्रीबाई तांबेंना पडले आहेत. त्यांची उत्तरे साहजिकच त्यांच्याकडेही नाहीत. तोपर्यंत गणेश शाळाबाह्य़च राहणार, हे त्याही मान्यच करतात. नातू गणेशबाबत त्या सांगतात, लेकीने हौसेने मुकुंदवाडीतील एका इंग्रजी शाळेत नाव नोंदवले. ती धुणी-भांडी धुण्याचे काम करते. दिवसभर बाहेरच असते. त्याचा बाप मोलमजुरी करतो. तो नादीक. मुलाचे शिक्षण कुठे चाललेय, प्रगती सुरू की अधोगती, याच्याकडे लक्ष देण्यास दोघांनाही वेळ नाही. पाचवीचा निकालही आणणे त्या दोघांनाही जमले नाही. निकाल आणायला तू का गेला नाहीस, असे नातवाला विचारले तर मास्तर शुल्काचा विषय काढतो, असे गणेश सांगतो. हा शाळेतून घरी आल्यानंतर दिवसभर भटकायचा. रेल्वे रुळाकडे हिंडायचा. त्यात तो एकुलता एक. काही झालं तर? म्हणून माझ्यासोबत नजरेसमोर राहील म्हणून आणलाय. आता बघू त्याचे केव्हा शाळेत नाव नोंदवता येईल ते.. कदाचित या सावित्रीच्या नातवाचे नाव शाळेत दाखल होईलही, पण तो शिकेल?