केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच करण्यात येणार आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबचे सूतोवाच केले आहे. मराठवाड्यात लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येणार असून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमानंतर सहकारनगरात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या दालनाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला.

मराठवड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यासाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाकडून औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील प्रश्नांबाबत विविध क्षेत्रातील नागरिकांना भेटून आढावा घेण्यात आला होता. रविवारी मुख्यमंत्र्यांनी लवकरच बैठक होणार असल्याचे सांगितले. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पावलावर पाऊल टाकत हा विस्तार होणार आहे.

प्रत्येक मंत्र्याचे काम पाहून बदल करण्यात येणार आहेत. यासाठी मंत्र्यांना एक प्रश्नावली देण्यात आली आहे. या विस्तारात काही खाते बदल, तर काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची आशा आहे. मात्र, विस्तार नेमका कधी होणार याबाबत त्यांनी काहीही स्पष्टपणे सांगितलेले नाही.

महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या उमेदवारांनी एकत्र येत ‘कॉर्पोरेट असोसिएशन’ या कंपनीची स्थपना केली आहे. तिच्या माध्यमातून सोलर दालन उभारण्यात आले आहे. या असोसिएशनने ऍग्री सोलर फिडरचे काम करावे, पारंपरिक ऊर्जा आता मर्यादित राहिल्यामुळे अपारंपरिक ऊर्जाचा वापर करीत सोलर फिडरच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मात्र राज्यात सुरू असलेल्या वीज टंचाई आणि भरनियमनाविषयी बोलणे त्यांनी टाळले.