औरंगाबादमधील ‘आपली मुलं’ वसतिगृहातील गायत्री राऊतची कैफियत

‘कर्जमाफी झाली, चांगलं झालं. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव दिला पाहिजे. पण हा निर्णय थोडा आधी झाला असता तर माझे वडील कदाचित वाचले असते,’ अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावची गायत्री राऊत सांगत होती. तिचीच मैत्रीण गीतांजली. तिलाही अगदी असंच काहीसं सांगायचं होतं. पुरेसं व्यक्त नाही होता आलं तिला. पण म्हणाली, ‘गरिबाला भाकर मिळाली की भागतं’. या दोघी जणी औरंगाबाद शहरातील ‘आपली मुलं’ या वसतिगृहात राहतात. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या मुलांसाठीची शाळा शामसुंदर कनके चालवतात. ३०० हून अधिक विद्यार्थी या वसतिगृहात राहतात. कनके म्हणाले, ‘कर्जमाफी ही तशी तात्पुरती मलमपट्टी. शेतकऱ्यांच्या मालाला जास्त नाही, पण रास्त भाव मिळाला तर त्याच्यावरचं दडपण कमी होईल. खेडय़ात शेतीत नाही भागलं तर ही माणसं शहरात येतात आणि शहर म्हणजे समस्या. तसा कर्जमाफीला उशीर झाला असला तरी त्याबरोबरच रास्त भावाचा प्रश्न अधिक गंभीर असल्याचे या कामातून जाणवते.’

परळी तालुक्यातील पिंप्रीराजा येथे गीतांजलीचे वडील संजय काळे राहायचे. सात-आठ एकर जमीन होती. तीन-चार वेळा विंधन विहीर घेतली. पण पाणी नाही लागले. पण शेवटी थोडे पाणी लागले, कष्टही केले. अगदी ऊस, कापूस लावला. पण कर्ज वाढत गेलं आणि त्यांनी एके दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. देणेकरांच्या नावाची चिठ्ठी लिहिली होती. ती पुढे गीतांजलीच्या आईपर्यंतसुद्धा पोहोचली नाही. गीतांजलीची आई, आजी या दोघीही कनके गुरुजींच्या शाळेत मुलांचा सांभाळ करीत आहेत. गीतांजलीची मैत्रीण गायत्री. आजी-आजोबा, आई आणि एक भाऊ, एक बहीण असा परिवार. ती मूळची अंबाजोगाई तालुक्याच्या पूसची. वडिलांच्या नावे शेत नव्हतं. आजीच्या माहेरकडून दोन एकर शेत आले होते. वडिलांनी आत्महत्या केली. आजीने शेत बटईने दिले.

आता आई दुसऱ्याच्या शेतात मजुरी करते आहे. सरकारने वेळेवर कर्जमाफी केली असती तर ही वेळ कदाचित आली नसती, असं गायत्री म्हणते. खरं तर ही छोटी पोर. नववीतून दहावीत जाणारी. पण समज मात्र मोठी. परिस्थिती माणसाला घडविते, ती अशी. मंगेश दाभाडे याच शाळेतला विद्यार्थी. तोही नववीतून दहावीत जाणारा. बारीकशा अंगकाठीचा. बघितल्यावर कोणालाही वाटणार नाही, हा दहावीत जात असेल. त्याला एवढंच माहीत आहे की, वडिलांना कर्ज झाले म्हणून त्यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. ते गेले, त्याला ११ वर्षे झाली. घरची अडीच एकर शेती आता आई करते. चुलते आहेत, पण कोणी मदत करीत नाहीत. आईशी अधूनमधून दूरध्वनीवरून संपर्क साधणारा मंगेश म्हणतो, आमच्या घरातल्या फोनची बॅटरी खराब आहे. त्यामुळे कधी तरी आईशी बोलणं होतं. आता तेथे मला सांभाळायला कोणी नाही म्हणून या शाळेत आलो. आता कर्जमाफी झाली आहे. ती मिळाली तर मदत होईल का, या प्रश्नाचं उत्तर त्याला माहीत नाही.

अशा ३०० मुलांची जबाबदारी सांभाळणारे कनके गुरुजी सांगत होते, ‘कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टीच आहे. जे मिळाले ते चांगले आहे, पण उत्पादनाला रास्त भाव हेच त्यावरचं खरं उत्तर आहे. जो पिकवतो, त्याला भाव मिळाला तर देश पुढे सरकेल. नाही तर शहरं वाढतील. त्याची वाढ रोखायला हवी. अशा गरीब कुटुंबातील मुले शिकली तरच त्यांची प्रगती होईल म्हणून हा प्रकल्प सुरू केला. दररोज प्रवेश घेणारी मुलं आणि त्यांच्या कहाण्या ऐकल्या की मन हेलावून जातं. अगदी पार मनातून हादरा बसतो. हे रोज घडतं. त्यामुळेच अशा समस्याग्रस्त मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्य़ात एक प्रकल्प व्हायला हवा.’