पावसाअभावी पिकांची दुरवस्था ; शेतात कामच नाहीमराठवाडय़ात रोजगार हमीच्या कामांची मागणी

पावसाने पाठ फिरविली आणि शेतीत राबणाया हाताची मजुरी घसरली आहे. शेत करपून जात असल्याने काम उरले नाही. परिणामी रानामध्ये काम करताना एकही माणूस दिसत नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून मजुरीचे दर पुरुषांसाठी २०० ते २५० आणि महिला मजुरासाठी १०० ते १५० रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. गावागावात काम नसल्याने रोजगार हमीचे काम केव्हा निघते याची वाट शेतकरी पाहत आहे. पीक हातातून गेल्याने पुढे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी रोजगार हमीवर काम करणाऱ्यांची संख्या कमी होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये १हजार १२२ कामांवर ७ हजार ५५५ मजूर होते. या वर्षी त्यात चौपटीने वाढ झाली आहे. ९ ऑगस्टपर्यंत ६ हजार २३६ कामांवर ३२ हजार २९१ मजूर उपस्थिती आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस असल्याने शेतात काम उपलब्ध होते. त्यामुळे मजुरांची उपस्थिती कमी होती. या वर्षी शेतात खुरपणीचे कामही शिल्लक नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी रोहयोचे काम सुरू आहे तेथे मजुरांची उपस्थिती वाढली आहे. विविध भागातून कामांची मागणीही वाढली आहे.

पैठण तालुक्यातील पारुंडी, कडेठाण, गेवराई(मर्दा), सुंदरवाडी, तुपेवाडी, कचनेर या गावांमध्ये लावलेला कापूस रानात दिसतो तो कोमेजलेल्या, खुरटय़ा अवस्थेमध्ये. पारुंडी हे आडूळ जवळचे गाव. १५०० लोकसंख्येचे. गावाभोवतीच्या डोंगरावरची हिरवळ आता करपू लागली आहे. पिके उगवून आली नाहीत. एकनाथ फकीरचंद राठोड सांगत होते, ‘जूनमध्ये पाऊस झाला. त्यानंतर पाऊस आला तो भूरभूर. तो देखील दोनदाच. आता पीक उगवूनच आले नाही. ज्यांच्या शेतात अंकुरले ते करपून गेले. पाण्यावर लावलेला कापूसही हातचा गेला आहे. त्यामुळे रानात कोणी मजूर लावत नाही. पीक येणारच नाही म्हटल्यावर त्याची मशागत कोण करणार?’ आता मजुरांची गरज भासत नाही. पारुंडी तांडय़ावर बहुतांश लोक मजूर. काही जणांनी ऊस तोडीसाठी अग्रीम रक्कम घेतली त्यावर त्यांचा गुजराण सुरू आहे. हाताला काम नसल्याने तांडय़ावरची माणसं निवांत एका किराणा दुकानाजवळ बसलेली. रोजगार हमीतून काम मिळावे, अशी मागणी केली होती. गटविकास अधिकाऱ्यांकडे तशी मागणी केली. मात्र, त्यांनी काम उपलब्ध करुन दिले नाही, असे गावाचे उपसरपंच बाजीराव राठोड यांनी सांगितले. हाताला काम मिळाले नाही. शेतात काम नाही. कारण मशागत करण्यासारखी पिकांची स्थितीच नाही. परिणामी मजुरांनी कमी दरातही काम करण्याची तयारी केली. मजुरीचे दर उतरले आहेत. खेर्डा भागातील तरुण शेतकऱ्यानेही मजुरीचे दर कमी केल्याचे सांगितले.

पैठण तालुक्यातील बालानगर व पारुंडी या भागात बप्पासाहेब जनार्दन इरकल यांची १६ एकर शेती आहे. ४ एकरापैकी साडेतीन एकरातील कापूस वाळून गेला आहे. लावलेली तूर वाढली नाही म्हणून ती त्यांनी मोडून काढली. आई-वडील, पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीसह रानात ते मशागत करीत होते. ते म्हणाले, येत्या दोन दिवसात पाऊस आला नाही तर काही खरे नाही. आता जे देव देईल ते होईल.’ आपल्या शेतात पाणी यावे म्हणून ९ लाख रुपयांचे कर्ज काढून शेती करणाऱ्या  बप्पासाहेब इरकल यांचे सारे कुटुंम्ब शेतात राबत होते. आता मजूर लावणे परवडणारे नाही. त्यांना मजुरीचे पैसे दिले तर येणाऱ्या उत्पन्नातून हाती काहीच उरणार नाही. त्यामुळे मजूर लावले नाहीत. पैठण तालुक्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या या आडुळ पट्टय़ात आता पाऊस पडला तरी शेतकऱ्यांच्या हाती काही येणार नाही. शेतमध्ये काम शिल्लक राहिले नाही त्यामुळे मजुरांच्या हातालाही काम नसल्याने दुष्काळ झळा वाढू लागल्या आहेत.

रोजगार हमी योजनेमध्ये कामाची मागणी वाढली आहे. त्यामुळे उपायुक्तांनी सर्व ठिकाणी तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कृषी अधिकारी, तहसीलदार यांना संयुक्त बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाऊस आला नाही तर तातडीने काम सुरू केले जाईल. डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त