‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रपर ग्रंथाला मराठवाडा साहित्य परिषदेचा विशेष वाङ्मय पुरस्कार मिळाल्यानंतर लेखक शरद पवार यांना आणखी काही लिहिण्याची प्रेरणा मिळाली आहे. काय लिहायचे आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना?- वेगवेगळ्या प्रदेशांतील माणसांचे वेगवेगळे स्वभाव. काही इबलिस आणि काही इरसाल.

त्यांनी सांगितलेले किस्से रविवारच्या कार्यक्रमात हशा पिकवून गेले. ते सांगत होते, १९६७ साली सर्वत्र अन्नधान्याची टंचाई होती. वसंतराव नाईक तेव्हा मुख्यमंत्री होते. उत्पादनवाढीसाठी त्यांनी नव्या जातीची वाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. सगळ्या आमदारांना त्यांनी सांगितले, जे आमदार त्यांच्या मतदारसंघात चांगले उत्पादन वाढवून दाखवतील, त्यांचे मी कौतुक करेन. तेव्हा मतदारसंघात गव्हाची पेरणी केली. त्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले. बी-बियाणे आणि खते दिली. पीक बहरात आले तेव्हा तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब सावंत यांना मतदारसंघात घेऊन गेले. याच काळात सिमेंटचीही टंचाई होती. शेतकऱ्यांना लागणारे सिमेंट आणि लोखंड देण्यासाठी एक स्वतंत्र विभाग काढण्यात आला होता. बाळासाहेब सावंत शिवारात आले तेव्हा त्यांनी विचारले, तुम्हाला काही हवे आहे का? एक शेतकरी म्हणाला, विहीर खणली आहे, पण काही भाग वारंवार ढासळतो, तेव्हा सिमेंट मिळाले तर द्या. त्यावर सावंतांनी उत्तर दिले, जुन्या सगळ्या वास्तू चुन्यामध्ये बांधल्या आहेत. जुने ते सोने असते, सिमेंट कशाला मागता? तो बिचारा शांत झाला. गांधीवादी सावतांनी पुन्हा एकदा कुणाला काही शंका आहे का? असे विचारले. पुन्हा त्या शेतकऱ्याने हात वर केला. तेव्हा मला कळाले, हा जरा इरसाल आहे. त्याला थांबवत होतो, पण मंत्री सावंत गांधीवादी पडले. ते म्हणाले, त्यांची शंका रास्त असेल तर त्याला उत्तर द्यायला हवे. या पठ्ठय़ाने प्रश्न विचारला, ‘आजकाल यशवंतराव चव्हाण कुठे असतात?’ सावंतांनी उत्तर दिले-  ते म्हणाले, ‘हिमालयाच्या मदतीसाठी सह्य़ाद्री धावला आहे. ते संरक्षणमंत्री आहेत.’ त्यावर तो शेतकरी म्हणाले, मग ते इकडचे रक्षण करायचे सोडून रशियात काय करतात?’ त्यावर सावंतांनी संरक्षण करार कसे आवश्यक असतात, शस्त्रास्त्र खरेदी किती महत्त्वाची असते, हे सांगितले. शेतकरी मोठा करामती होता. ‘शिवाजी महाराजांसारखं गमिनी कावा सोडून देऊन अत्याधुनिक शस्त्रास्त्रात काय ठेवलं आहे. जुनं ते सोनं असतं.’ असं तो म्हणाल्याचे पवार यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. अशी काही माणसे भेटली. ती लिहायला हवीत, असे वाटते. लिहिण्याच्या किश्शांचा भाग पुढे चालू ठेवून पवारांनी सरकारविषयी लोक कसे बोलतात, या विषयीचा किस्साही खुमासदार शैलीत सांगितला.

Sunetra Pawar
मतदानाआधीच सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा, ‘या’ घोटाळ्यातून मिळाली क्लीन चिट!
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
What Ramdas Athwale Said?
रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीस मला शिर्डीतून उमेदवारी देणार होते, पण एकनाथ शिंदे..”
Sharad pawar udyanraje bhosle satara lok sabha election
उदयनराजेंना महायुतीने डावललं तर तुम्ही तिकीट देणार का? शरद पवारांनी कॉलर उडवत दिलं उत्तर…

याकुबच्या खुराडतल्या चार कोंबडय़ा

‘एकदा वेंगुल्र्याला गेलो होतो. कोकणात १६ वर्षांची मुले आणि ६० वर्षांची म्हातारी माणसे गावात असतात. त्यांच्या आपल्या गप्पा असतात. महात्मा गांधींपासून गावच्या सरपंचापर्यंत नेते कसे चुकतात, याची चर्चा असते. वेंगुल्र्यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून मी, राज्यमंत्री नानासाहेब सपकाळ आणि उपमंत्री अली हसन मोहंमद गेलो होतो. लोक आपल्या विषयी काय बोलतात, हे पाहण्यासाठी म्हणून एका झाडाखाली बसलेल्या मंडळींकडे गेलो होतो. अंगावर पांढरे कपडे नव्हते. त्यामुळे कोणी ओळखले नाही. गावकऱ्यांपैकी एकजण म्हणाला, ‘आपल्या गावात साडेतीन मंत्री आलेत.’ आता साडेतीन मंत्री असा शब्द उच्चारल्यावर मी थबकलो. आम्ही तिघे मंत्री. मग हा अर्धा कोण, असा प्रश्न पडला. नानासाहेब सपकाळ, शरद पवार आणि अली हसन या तीनमध्ये ‘अर्धा’ कोण, असा प्रश्न पडला. सभागृहात कुठलीच प्रतिक्रिया उमटलीच नाही, तेव्हा शरद पवार म्हणाले, ‘तुम्हाला जरा उशिरा कळालेले दिसते.’ त्यातील अली हसनसाठी गावकऱ्यांनी ‘अर्धा मंत्री वाढवलेला होता’ हे सभागृहाला कळाले आणि सभागृहात पुन्हा हशा पिकला. त्यातील एक गावकरी म्हणाला, कालच्या दिवसभरात आपल्या गावासाठी काहीच झाले नाही. त्यावर दुसरा म्हणाला, ‘ही सगळी काँग्रेसची मंडळी आहेत. होणार तर काहीच नाही. पण, याकुबच्या खुराडतल्या चार कोंबडय़ा मात्र रात्रीतून फस्त झाल्या.’

रविवारी विशेष वाङ्मय पुरस्कार स्वीकारल्यानंतर शरद पवारांनी काय लिहिता येऊ शकेल, हे सांगितले. शिवाय याच कार्यक्रमात ज्यांना नटवर्य लोटू पाटील पुरस्कार देण्यात आला, त्या जब्बार पटेल यांना कशी मदत केली, याचेही किस्से सांगितले. ‘सिंहासन’ या चित्रपटाच्या वेळी मंत्रालयासह मुख्यमंत्र्यांच्या दालनातही चित्रीकरण करू दिले. शिवाय, ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाला मदत करण्यासाठी शिवसैनिकांना कसा कात्रजचा घाट दाखवला, याचाही किस्सा त्यांनी रंगवून सांगितला.

एकुणात शरद पवारांना आणखी लिहायचे आहे आणि त्यांच्याकडे लिहिण्यासारखे खूप काही आहे, असे सभागृहातील श्रोत्यांना समजले.

ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते शरद पवार आणि जब्बार पटेल यांना मराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी कवी ना. धों. महानोर, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, दिलीप घारे, मनोहर जाधव, कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, मधुकरअण्णा मुळे आदी उपस्थित होते.