राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र, दोन महिने झाले तरी अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये शिवसेनेच्यावतीने सोमवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. विजयादशमीच्या अगोदर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, कर्जमाफी संदर्भात सरकारकडून घालण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करा, अशी मागणी शिवसेनेकडून विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली.

कर्जमाफीचे फॉर्म भरण्यासाठी जिल्हाभरात १५०० केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आलं होतं. मात्र यापैकी ५०० केंद्रही नीट चालत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठीचे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी. सरकारकडून एका कुटुंबातील केवळ एका व्यक्तीच्या नावावरील कर्ज माफ करण्यात येत आहे. याकडे लक्ष वेधून सरसकट सर्व खातेदारांच्या नावावरील कर्ज माफ करावं, अशी भूमिका शिवसेनेने मांडली. विजयादशमीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्याही परिस्थितीत पैसे जमा झाले पाहिजेत. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. ऑनलाईन फॉर्म भरत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका केंद्रावर दिवसाकाठी आठ ते दहा फॉर्म भरले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे. ही प्रक्रिया गतिमान करुन विजयीदशमीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला हवेत, असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे.