मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मुंबईच्या रस्त्यावर उतरला होता. त्यावेळी मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारे कुठं होते? असा प्रश्न उपस्थित करत, मराठ्यांना बाजूला काढून एक आंदोलन करून दाखवा, असं आव्हान नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. औरंगाबाद मधील तापडिया नाट्य मंदिरात ‘मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा’ या विषयावर व्याख्यानाच आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भगव्या गमज्यावर बंगले उभे करणारे ‘राम-शाम’ मुंबईत मराठा मोर्चा होता तेव्हा कुठे गेले? अशा शब्दांत मराठा मोर्चावरून नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना चिमटा काढला. निस्वार्थीपणे एखादी व्यक्ती लढत असेल तर समाज बांधव म्हणून आपण त्याच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे. मुंबईचा मोर्चा झाल्यानंतर मी शेवट पर्यंत तिथे थांबून होतो. पळून गेलो नाही. असं सांगत मराठा आरक्षणाचा विषय सुटू देणार नाही. आता आमदार असलो तरी कायम आमदार राहणार नाही. हे सांगत येत्या काळात मंत्रिपदी आपली वर्णी लागेल असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’वर टीका करत, मराठा आरक्षणा संदर्भातील लढा न्यायालयात लढणारे वकील हरीश साळवे यांना महाराष्ट्र भूषण द्यायला हवा, असं राणे म्हणाले. तसेच राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्यानंतर रस्त्यावर आलेले मराठी कलाकार मराठा मोर्चावेळी कुठे होते. याचा विचार करायला हवा आणि त्यांचे चित्रपट चालू द्यायचे का ? याचा विचारही करायला हवा असा सल्ला राणे यांनी दिला.

आरक्षण द्यायला किती वेळ घ्यायचा तो घ्यावा. मात्र तोपर्यंत मराठा समाजाला केजी टू पीजी पर्यंत मोफत शिक्षण द्यावं, अशी मागणी मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा लढणाऱ्या विनोद पाटील यांनी केली. तापडिया नाटयगृहात कायक्रमाला मोठ्या प्रमाणात युवकांची उपस्थिती होती.