देशभरात आज मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण साजरा करण्यात येत आहे. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारी या गावातील संपूर्ण मुस्लिम नागरिकांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तान सोबत लढताना सिल्लोड तालुक्यातील संदीप जाधव या जवानाला वीरमरण आले. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी गावाने ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नमाज देखील काळ्या फिती लावून अदा करण्यात आली.

अंधारी या संपूर्ण गावात जवळपास पंधराशे पेक्षा जास्त मुस्लिम नागरिक राहतात. आपल्या तालुक्यातील जवान देशासाठी लढताना शहीद झाला म्हणून आपण ईद कशी साजरी करावी म्हणून गावातील सर्व मुस्लिम नागरिकांनी एकमताने आज संदीप जाधव या जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला. गावातील लोकांनी साध्या पद्धतीने नमाज अदा केली. तसेच गावातील कोणत्याही मुस्लिम समाजातील व्यक्तीने नवीन कपडे देखील परिधान केले नाहीत.

यावेळी नमाज अदा केलेल्या ठिकाणी पाकिस्तानाचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. ठीक ठिकाणी पाकिस्तान मुर्दाबाद, शहीद जवान अमर रहे, असे फलक झळकताना पाहायला मिळाले. हिंदू -मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या नेत्यांना अंधारी येथील मुस्लिम समाजातील नागरिकांनी या कृतीतून एक चपराकच लगावली आहे.