सीएमआयच्या वतीने फुलंब्री तालुक्यात नदी खोलीकरण-रुंदीकरणाची कामे केली जात आहेत. यामध्ये फुलमस्ता नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे या नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे वाहून गेले होते. या ठिकाणी दुरुस्तीचे कामही सुरू असल्याची माहिती राम भोगले यांनी दिली. या कामासाठी मुंबईच्या ज्वेलेक्स ग्रुपने १० लाख रुपयांचा सीएसआर निधी शुक्रवारी होशंग इराणी यांनी दिला.
फुलंब्री तालुक्यात गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक कोल्हापूर बंधारे वाहून गेले. अनेक ठिकाणी बंधाऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. सीएमआयच्या वतीने सध्या या तालुक्यात दुष्काळ निवारणाची कामे करण्यात येत आहेत. यामध्ये बिल्डा येथे नदीचे तीन मीटर खोलीकरण व २० मीटर रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. या बंधाऱ्याच्या आजूबाजूच्या वाहून गेलेल्या ठिकाणची दुरुस्तीही करण्यात येणार आहे. या कामामुळे शेतीला फायदा होईल, अशी प्रतिक्रिया शेतकरी राजू चव्हाण यांनी दिली. वाघलगाव येथे राम नदीवर बंधाऱ्याचे काम होत आहे. येथे खोलीकरण करून ५० मीटर लांबीचा बंधारा घालण्याचे काम सुरू आहे. बोरगाव येथे गिरजा नदीवर पाणी अडविण्यास बंधाऱ्याचे काम सुरू आहे. फरशी फाटा येथे सीएमआयच्या वतीने १०० फूट लांबीचा बंधारा केला जात आहे.
फुलंब्री तालुक्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे या भागात काम करावे, या साठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी उद्योजकांसमवेत दोन वेळा बैठका घेतल्या. मुंबईतील ज्वेलेक्सचे हिरे व्यापारी होशंग इराणी यांनी या कामाची पाहणी केली. उद्योगाच्या वतीने दुष्काळी भागातील कामाची पाहणी करून त्यांनी कौतुक केले. सीएमआयच्या वतीने सहा गावांत सध्या काम सुरू आहे. आगामी काळात आणखी कामे करण्यात येणार आहेत. नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरणामुळे या भागातील शेतक ऱ्यांना फायदा होईल, तसेच गावाच्या पाणीपातळीत वाढ होईल, असे मत भोगले यांनी व्यक्त केले.