सरस्वती भुवन शिक्षण संस्था व परिवर्तन यांच्या वतीने मागील वर्षांपासून शेक्सपिअर महोत्सवाचे आयोजन शहरात करण्यात येत आहे. मागील वर्षी १ ते ५ मे दरम्यान महोत्सवाचे आयोजन केले होते. यात दोन अंकी नाटक, एकांकिका, दीर्घाक, शेक्सपिअरवरच्या पुस्तकांचे प्रकाशन, व्याख्यान आदींचे सादरीकरण करण्यात आले.
शेक्सपिअर स्मृतीचे हे ४००वे वर्ष आहे. महोत्सव उद्या (गुरुवारी) व शुक्रवारी होणार आहे. प्रसिद्ध नाटककार दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. ‘शेक्सपिअर आणि मराठी नाटक’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच ‘पाझर’ ही एकांकिका याच दिवशी व्याख्यानानंतर सादर होणार आहे. एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन प्रवीण पाटेकर यांनी केले आहे. जगदीश जाधव, शुभम खरे, प्रशांत गिते, अभिजित सावंत, प्रमोद तांबे, गणेश मुंढे, आकाश थोरात हे कलाकार आहेत.
शुक्रवारी परिवर्तन रंगोत्सव हा अनोखा रंगाविष्कार सादर होणार आहे. लढा, आपल्या बापाचं काय जातं, संघर्ष, हमीदाबाई की कोठी, डॉक्टर, तुम्हीसुद्धा, देहधून या नाटकांमधील विविध प्रवेशांवर आधारित कार्यक्रम यात होणार आहेत. या प्रयोगाची संकल्पना अजित दळवी यांची, तर दिग्दर्शन व संगीत लक्ष्मीकांत धोंड यांचे आहे. प्रयोगात सुजाता कांगो, अनुया दळवी, लक्ष्मीकांत धोंड, मोहन फुले, डॉ. भालचंद्र कानगो, मधुकर कुलकर्णी, पुरुषोत्तम खोपटीकर, विवेक दिवटे, नीना निकाळजे, कानगो, अदिती मोखडकर, विकास पगारे, उदय खिल्लारे, सुरज तावरे, अथर्व बुद्रूककर, अभिषेक देशपांडे हे सहभागी होणार आहेत.
सरस्वती भुवन संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होईल. रसिकांनी या नाटय़महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. सुनील देशपांडे, डॉ. मोहन फुले, डॉ. आनंद निकाळजे, श्रीकांत उमरीकर व स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर, सरचिटणीस अॅड. दिनेश वकील यांनी केले आहे. खिंवसरा ग्रुप यांनी या कार्यक्रमास साह्य़ केले आहे.