औरंगाबादमध्ये ट्रक मालकाला लाच मागितल्या प्रकरणी  पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत आणि पोलीस उपनिरीक्षक ताहेर पटेल, अशी निलंबन करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. एमआयडीसीमध्ये पकडण्यात आलेल्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी ट्रक मालकाकडे तब्बल आठ लाख रुपयांची मागणी केली होती.

एका बड्या कंपनीतून भंगार घेऊन दोन ट्रक वाळूज एमआयडीसी भागात आले. १९ जून रोजी हे दोन ट्रक एमआयडीसी पोलिसांनी पकडले. मात्र, दोन दिवसांत त्या ट्रकवर पोलिसांनी कोणतीच कायदेशीर कारवाई केली नाही. हा प्रकार आयुक्त यशस्वी यादव यांना समजला. त्यांनी गोपनिय चौकशीचे आदेश दिल्यावर तत्काळ चौकशी करण्यात आली. यात सहाय्यक निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत आणि उपनिरिक्षक ताहेर पटेल हे दोघांनी ट्रक मालकाकडे पैशाची मागणी केल्याचे समोर आले. या अधिकाऱ्यांवर तात्काळ  निलंबनाची कारवाई करण्यात आली.