राज्यातील भाजप-सेना नेत्यातील युतीच्या नेत्यांच्या बोलणीचा रोख पारदर्शक कारभारावर सुरू असल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले. युतीबाबतचा निर्णय २१ जानेवारीपर्यंत घेतला जाईल. सध्या पारदर्शक कारभारावर बोलणी सुरू आहे. जागा वाटपाबाबतचे कोणतेही सूत्र ठरले नसल्याचे सांगत सध्या चर्चेचा केंद्रबिंदू पारदर्शक कारभार असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये युती होणार की नाही, यावरून शिवसेना-भाजपमध्ये सध्या बोलणी सुरू आहे. महापालिकेतील भ्रष्टाचारावरून भाजप सेनेला चिमटे काढण्याची संधी सोडत नाही. यातूनच पारदर्शकतेचा मुद्दा भाजपकडून रेटला जात असल्याचे दिसून येत आहे. शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सतीश पत्की यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार रावसाहेब दानवे मंगळवारी औरंगाबाद येथे आले होते. अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बोलणी पारदर्शक कारभारावर सुरू असल्याचे दोनदा सांगितले. सर्व निवडणुकांसाठी युती करायची नाही, अशीच चर्चा सुरू आहे. मात्र, पारदर्शक कारभार हा चर्चेचा भाग असल्याचे रावसाहेब यांनी दोन वेळा पत्रकारांना सांगितले. युतीबाबतचा निर्णय २१ जानेवारी रोजी होईल, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याच्या वक्तव्याचाही दानवे यांनी पुनरुच्चार केला. पारदर्शकता कोणत्या पातळीवरची याचा तपशील मात्र दानवे यांनी दिला नाही.