भाजपशी फारकत घेत शिवसेनेने राज्यात स्वबळावर भगवा फडकावण्याचे उद्दिष्ट घेऊन ‘हनुमान उडी’ मारण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेची उडी ही त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई-ठाणे आणि काही प्रमाणात नाशिकपर्यंतच पोचू शकली. शिवसेनेकडून मुंबई हिसकावून घेण्याची दहशत भाजपने निर्माण केल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबई-ठाण्यातच अडकून पडले. त्यामुळे राज्यात अन्यत्र शिवसेनेला दमदार यश मिळू शकले नाही.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे विधानसभेवरच भगवा फडकावण्याचे उद्दिष्ट असल्याने ‘मिनी विधानसभा’ मानली गेलेली ही महापालिका व जिल्हा परिषदांची निवडणूक त्यादृष्टीने रंगीत तालीमच होती. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट ओसरली आहे आणि नोटाबंदीमुळे झालेल्या जनतेच्या प्रचंड हालांमुळे व अनेक उद्योग बंद पडून रोजीरोटी बंद झाल्याने जनमत भाजपविरोधात जाईल. त्याचा फायदा शिवसेनेला होईल. ही प्रामुख्याने शिवसेनेची भूमिका होती. त्यामुळे शिवसेनेचे बाहू फुरफुरायला लागले आणि त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत भाजपशी युती तोडून ‘हनुमान उडी’ मारली. मात्र शिवसेनेची ही उडी मुंबई-ठाण्यापर्यंतच पोचली आणि काही प्रमाणात नाशिकमध्ये मजल मारता आली. त्याव्यतिरिक्त राज्यभरात शिवसेनेला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.

शिवसेनेची राज्यात सर्वत्र ताकद नाही, हे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले होते. तरीही युती तोडण्याचा निर्णय घेवून शिवसेनेने भाजपला आव्हान दिले. ठाकरे यांनी यावेळी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करुन मंत्र्यांवर जबाबदारी वाटून दिली होती. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई-ठाणे महापालिकेत भाजपने जोरदार आव्हान उभे केल्याने ठाकरे यांना हे गड राखण्यासाठी बरेच झुंझावे लागले. त्यामुळे प्रचारात बराच काळ ते याच भागात अडकून पडले. त्या तुलनेत फडणवीस यांनी दिवसभरात चार-पाच सभा राज्यभरात व सायंकाळच्या दोन-तीन सभा मुंबईत हे सूत्र ठेवले. त्यामुळे त्यांना राज्यभरात फिरता आले. त्यांच्या तुलनेत ठाकरे यांना राज्यभरात फारसे उतरता आले नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांनी जोरदारपणे प्रचारात उडी घेतली आहे, असे चित्र दिसून आले नाही. त्या तुलनेत भाजपचे बहुतेक सर्व मंत्री ताकदीने प्रचारात उतरले आणि त्यांनी आपल्या विभागात प्रचाराची आखणी केली.

शिवसेनेने मुंबईसह राज्यात मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागत त्यांचा उद्धार करणे, यावरच सर्वाधिक भर दिला. ‘डिड यू नो’, ‘करुन दाखविलं, पुन्हा’ यासह मी बोलतो ते करुन दाखवितो, अशा प्रचार मोहीमा राबवीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेही मुंबईकरांना साद घातली. महापालिकेने काय करुन दाखविले आणि ‘व्हिजन’ काय आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अपेक्षे इतके यश मिळू शकले नाही. भाजपने कडवी लढत दिल्याने शिवसेनेला बालेकिल्ल्यातच झुंजावे लागले. मराठी मतदार हा शिवसेनेचा हुकुमी एक्का. पण मुंबईतील बराच मराठी टक्का ठाणे जिल्ह्य़ात गेला असून भाजपनेही मराठी मतदारांवर लक्ष केंद्रित केले. तर शिवसेनेने ‘मराठी कार्ड’ न वापरता गुजराती, उत्तर भारतीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी खासदार संजय राऊत, मंत्री रामदास कदम आदी नेत्यांनाही काही प्रमाणात आवर घालण्यात आला होता. भाजप आणि मोदी-फडणवीस यांच्यावर केवळ ठाकरे हेच तोफ डागत होते. या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे शिवसेनेने ‘मुंबईत बूज राखली, तर ठाणे काबीज केले,’ एवढीच राहिली. मात्र शिवसेनेच्या तोफगोळ्यांच्या भडिमारापेक्षा भाजपने केलेल्या विकासाच्या स्वप्नांना राज्यात जनतेने अधिक पसंती दिली. त्यामुळे या ‘मिनी विधानसभा’ निवडणुकीचे पडसाद शिवसेनेच्या भविष्यातील रणनीतीवर खचितच होणार असून भाजपविरोध किंवा युती तोडण्याच्या निर्णयाची किंमत तर चुकवावीच लागणार आहे.