निवडणूक कष्टाने थकलेल्या शरीराला विश्रांती, मनात मात्र चलबिचल

निवडणूक.. मग ती कोणतीही असो, उमेदवाराइतकाच किंबहुना जास्तच राबतो तो जवळचा विश्वासू कार्यकर्ता. सभा, प्रचारफेरीसाठीच्या परवानग्या, रणनीती, प्रचार साहित्याची खरेदी, छपाई आणि वाटप, महत्त्वाच्या गोष्टींची, संदेशांची नोंद, त्याबाबत उमेदवाराला सतत करून दिली जाणारी आठवण, निवडणुकीचा खर्च, पक्षातल्या सर्व वयोगटांतल्या, विचारधारांच्या कार्यकर्त्यांमध्ये आवश्यक असलेला समन्वय, उमेदवाराच्या अनुपस्थितीत महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी अशा भूमिका हा कार्यकर्ता पार पाडत असतो. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली आणि या कार्यकर्त्यांने सुटकेचा नि:श्वास सोडला. महिना-दोन महिने अंगवळणी पडलेल्या शारीरिक, मानसिक ताणातून बुधवारी या कार्यकर्त्यांला विश्रांती मिळाली; परंतु गुरुवारच्या निकालाबाबत त्याच्या मनात चलबिचल होतीच!

‘‘काल आमच्या प्रभागातले मतदान लवकर आटोपले होते. तरी घरी येऊन पाठ टेकायला बारा वाजलेच. दोनेक महिन्यांनंतर आज लवकर घरी आल्याने पत्नीला थोडे आश्चर्य वाटले. खूप थकल्यामुळे लवकर झोप येईल अशी अपेक्षा होती, पण झाले उलटेच. परवा (शुक्रवारी) काय निकाल लागेल, आपण कितीच्या फरकाने जिंकणार, अशा एक ना अनेक विचारांनी झोप उडाली. वर अलीकडच्या सवयीमुळे सकाळी सात वाजता आपोआप डोळे उघडले’’.. माहिमला राहाणारे संतोष साळी सांगत होते. साळी मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांचे मित्र आणि निवडणूक काळातील विश्वासू सहकारी. साळी अलीकडेच विवाहबद्ध झालेत, पण नवा संसार दोन महिने बाजूला ठेवत त्यांनी प्रचारात झोकून दिले.

प्रभाग क्रमांक २१९ मधून शिवसेनेच्या उमेदवार दुर्गा भोसले यांचे प्रचारप्रमुख सत्यवान फोपे यांनी बुधवारचा संपूर्ण दिवस घरात पेपर वाचून काढला. ‘‘सकाळी सात वाजता सुरू झालेला दिवस मध्यरात्री एक, दोन, तीन, कधी कधी चारही वाजताही संपे. सवयीप्रमाणे आज लवकर उठलो. मात्र, आज पूर्ण वेळ कुटुंबाशी गप्पा मारल्या. त्यातून आसपास, कुटुंबात, नातेवाईकांमध्ये घडलेल्या बऱ्याच नव्या गोष्टी समजल्या. प्रचाराच्या धामधुमीत घरी येणारे वृत्तपत्रही वाचणे शक्य नव्हते. मात्र आज अगदी महिनाभरातील वृत्तपत्रेही रद्दीतून काढून वाचून काढली,’ फोपे यांनी सांगितले.

‘प्रचाराच्या गडबडीत एक घरचे लग्न सुटले. शेजारी राहाणाऱ्या जवळच्या मित्राच्या लग्नाला जाता आले नाही. एका मित्राची आई रुग्णालयात दाखल होती. तिला पाहायलाही जाता आले नाही,’ महेश तावडे सांगत होते. प्रभाग क्रमांक ११५ मधील भाजप उमेदवार जितेंद्र घाडीगांवकर यांच्या अत्यंत विश्वासू कार्यकर्त्यांपैकी तावडे आहेत. ‘श्रद्धास्थानी असलेला उमेदवाराकडे पाहून प्रचाराच्या रणधुमाळीत मरेस्तोवर काम करण्याची नशा वेगळीच. नेहमीपेक्षा कित्येकपटीने जास्त काम करतोय याची जाणीव त्या नशेत होत नाही. कारण तेव्हा पक्ष आणि उमेदवाराचा विजय हेच ध्येय मनात असते,’ असे तावडे सांगतात. बुधवारीही ते पक्षकार्यालयातच होते. परंतु, कामाचा ताण वा गडबड नसल्याने सारे काही निवांत चालले होते.

मतदान आणि निकाल यांच्यादरम्यानचा दिवस हा अशा कार्यकर्त्यांसाठी एखाद्या ‘टॉनिक’ सारखा. महिनाभराच्या धावपळीनंतर आणि मानसिक ताणानंतर बुधवारी मिळालेल्या विश्रांतीने त्यांच्या शरीरात नव्याने ऊर्जा भरली ती गुरुवारच्या धावपळीसाठी. अर्थात आपल्या उमेदवाराचा विजय हेच त्यांच्या परिश्रमाचे खरे टॉनिक!