मुंबई महानगरपालिकेतील सेनेच्या कारभारासंदर्भात भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येणारे घोटाळ्याचे आरोप आणि बेताल वक्तव्यांविषयी शिवसेनेच्या नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकाचवेळी आरोपही करायचे आणि युतीची चर्चाही करायची, हे योग्य नसल्याचे सेनेचे नेते अनिल परब यांनी सांगितले. आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे भाजपशी युतीची बोलणी करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शिवसेनेशी युती करण्याची इच्छा दर्शविली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत आशिष शेलार आणि किरीट सोमय्या हे नेते शिवसेनेवर बेछूट आरोप करत आहेत. याचे दोनच अर्थ निघतात. ते म्हणजे एकतर मुख्यमंत्र्यांचे या सगळ्याला समर्थन आहे किंवा हे नेते त्यांचे ऐकत नसतील. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. त्यांना आमच्याशी युती करायची नसेल तर त्यांनी तसे स्पष्टपणे सांगावे, नाहीतर आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करावी. एका बाजूला आरोप करायचे आणि युतीची चर्चाही करायची, हे आम्हाला योग्य वाटत नसल्याचे अनिल परब यांनी म्हटले. आम्ही आमच्या भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवल्या आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत योग्य तो संदेश पोहचवला आहे. त्यामुळे आता आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची प्रतिक्षा आहे. त्यांनी स्वत:ची भूमिका जाहीर केल्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ, असे परब यांनी सांगितले.

तत्पूर्वी भाजपकडून मुंबई महानगरपालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या ११४ उमेदवारांच्या यादीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. आज रात्री भाजपकडून ही यादी शिवसेनेकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे समजते. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही यादी मुख्यमंत्र्यांकडे दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी याबाबत आशिष शेलार यांच्यासोबत एक तासाहून अधिक काळ चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यादीवर शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्र्यांनी या यादीला हिरवा कंदील दाखविल्यामुळे भाजपचा समान जागांचा आग्रह कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापूर्वी भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्यांमधून फार काही निष्पन्न झाले नसल्याचे दिसत आहे.