चिंदबरम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा गोलमाल असून, आम आदमी त्यामध्ये कुठेच जागा नसल्याची टीका विरोधकांनी सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीवर केली. चिदंबरम यांनी गुरुवारी सकाळी पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी कडाडून हल्ला चढविला.
महागाई, भाववाढ यामुळे आधीच पिचलेल्या सामान्य माणसासाठी दिलासा देणारे या अर्थसंकल्पात काहीच नसल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. शेतकऱयांसाठी अर्थसंकल्पात काहीच नाही
चिदंबरम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प कल्पनेच्या पलीकडला, अवास्तव आणि रटाळ असल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली. महागाई नियंत्रणा आणण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीच तरतूद करण्यात आलेली नाही, असेही त्या म्हणाल्या.
खर्च कमी करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी केवळ आकड्यांचा गोलमाल केला असल्याची टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी केली. अर्थसंकल्पात वास्तवाचे भान नसल्याची टीका त्यांनी केली.
चिदंबरम यांचा अर्थसंकल्प गरीबविरोधी आणि शेतकऱयांच्याविरोधी असल्याची टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी केली. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी हे बजेट गोंधळ निर्माण करणारे असल्याचे म्हटले आहे.