मुलांनी शाळेच्या विविध उपक्रमांत भाग घेतला आणि शाळेतले अभ्यासाचे तास बुडवूनही ते इतिहास शिकले, भूगोल शिकले. नागरिकशास्त्र इतकंच नव्हे तर गणितही शिकले. कारण शिकणं फक्त पुस्तकात थोडंच असतं!
ते जगण्यात असतं, अनुभवात असतं, अनुभवण्यात असतं. पुस्तकात फक्त त्याचं चित्ररूप असतं इतकंच.

‘मुलं किती किती गोष्टीतून शिकतात, याचा कधी विचार केलाय तुम्ही?’ शाळा विचारत होती. पण ऐकू कुणाला जाणार? याचंच तिला वाईट वाटत होतं! खरं तर नवा दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी शाळेनं आज वेगळाच पवित्रा घेतला होता. कुणाला नाही समजलं, कुणी नाही विचार केला तरी माझी मुलं नक्की विचार करतील ही शाळेला खात्री होती. ती मुलांशी बोलू लागली. मुलं गडबडीत होती. मुलांना आज वेळ नव्हता. स्वच्छता, सजावट, रंगरंगोटी, आवराआवर.. मुलं म्हणाली, ‘एवढा कार्यक्रम होऊ दे. मग बोलू ना आम्ही!’
शाळेचा थोडासा हिरमोड झाला. ‘मुलांना महत्त्व आहे, आपल्या आग्रहाला नाही,’ हे तिनं समजून घेतलं. सगळेच आज गडबडीत असल्याने तिला विचार करायला निवांत होता. विचार करताना एकटेपण नव्हतं. मुलांची पळापळ, शिक्षकांची आवराआवर, पालकांचा उत्साह.. नेहमीच असं काही तरी असावं. असाच उत्साह! असंच चैतन्य! अर्थात सगळं काही मनापासून नव्हतं. याचंच तिला जरा वाईट वाटत होतं. जिवंत माणसांसाठी काम करणारी जागा कशी मनातलं मनापासून जाणणारी हवी! अशी का एरवी मरगळ असते?
 ‘हाय शाळा! रागावू नकोस हं. तुझ्याशी बोलणार आहोत आम्ही. इकडे कार्यक्रम सुरू होईल, तिकडे आपण गप्पा मारू.’
 ‘नाही दोस्तांनो! आज मला तुमच्याशी कार्यक्रम सुरू असताना बोलायचंय. तुम्हाला मी..’
 ‘काय मनात काय आहे तुझ्या? आधी सांग बरं.. नाहीतर आमची फजिती होईल.’
 शाळा आणि मुलांच्या गप्पा सुरू होत्या. इतक्यात लाऊड स्पीकरवरून निवेदन करण्यात आलं, मुलांचं स्वागतगीत, ईशस्तवन मग मोठय़ाचं सरस्वती पूजन. मागोमाग सत्कार, हार, तुरे, फुलं, शाली, भाषणं. आणि इकडे मुलांची मज्जा. कुणी झाडाखाली बसून, कुणी वर्गा-वर्गातून. गावातल्या महिला कुणी स्वयंपाक करत होत्या, तर मुलांच्या सुरू होत्या गप्पाच गप्पा. वर्गात कंटाळणारी मुलं वर्गाबाहेर एवढय़ा आनंदात का असतात? कारण सोपं होतं, वर्गात सगळ्यांना गप्प बसावं लागतं. एकजण फक्त (आपलाच बोलायचा अधिकार आहे, असे समजून) बोलत असतो.
 गेले चार दिवस कार्यक्रमाची तयारी सुरू होती. शिक्षक आपापसात बोलताना म्हणत होते. ‘शिकवायचं कधी मुलांना? कामं, कामं, कामं..’’ शेवटी कार्यक्रमाचा दिवस उजाडला. बाहेरगावची माणसं येणार, आपलं हे सुंदर रूप पाहणार म्हणून शाळा आनंदात होती. शाळेच्या दारात मुलांनी ‘सुस्वागतम्’ ही अक्षरे फुलांनी, शंख-शिंपल्यांनी कोरली होती. डाव्या हाताला मेथी-मुळा ही पालेभाजी लावली होती. छान ओळी पाडून लावलेली नि टवटवीत भाजी. उजव्या बाजूला कोपऱ्यात किल्ला केला होता. राजगड! माहिती लिहिली होती. गावाचा नकाशा काढला होता,  ठिपक्यांची रांगोळी काढली होती नि काटक्या-कुटक्यांच्या भौमितिक रचना केल्या होत्या. प्रदर्शन भरवलं होतं. मुलांनी वेगवेगळ्या  वस्तू तयार केल्या होत्या. त्या मुलांच्या होत्या, कारण फार सुबक नव्हत्या. अशी ही मजा. मुलं खूप आनंदात होती!
 कार्यक्रम सुरू झाला. नेहमीप्रमाणे स्वागतगीत, ईशस्तवन आणि देवीपूजन याने! आलेल्या पाहुण्यांनी मुलांना बोलावले. खरं तर पाहुण्यांची भाषणाची वेळ झाली होती. मुलं जरा घाबरली. ‘घाबरू नका! तुम्ही सगळी खूप छान तयारी केलीय. सगळं तुम्ही मुलांनी केलंय. इतकी छान तयारी मी कुठेच पाहिली नाही. पाहुण्यांच्या या बोलण्याने घाबरलेली मुलं मोकळी झाली. मुलं ६वी-७वीतली होती. मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. इतर शिक्षकांकडे पाहून पाहुणे म्हणाले, ‘या सगळ्या तयारीत अभ्यास बुडाला. तास बुडाले..’ एकदम जोरदार होकार आला.
 पाहुणे म्हणाले, ‘अभ्यास बुडाला पण त्यातून अनुभव वर आला,’ आता मात्र सगळे एकमेकांकडे पाहू लागले. ‘मुलं सगळे विषय तर शिकलीच, पण कौशल्यं आणि मूल्यं शिकली, जगली.’ पाहुण्यांनी विचारलं,
‘तुम्हाला शाळेत काम करताना काय वाटलं?’
‘मजा आली.’
‘कामं कशी कशी ठरवली? काही अडचणी आल्या?’
‘आम्ही आमचे आमचे गट केले. काम काय आणि कसं करायचं ते ठरवलं. सर सांगत पण त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो.’
‘आम्ही खूप गप्पा मारल्या.’
‘शेण कुणी आणायचं? केव्हा आणायचं यावर विचार केला. ज्याच्याकडं गुरं त्यांनी शेण आणायचं. एका गटानं पाणी आणायचं.’
मुली म्हणाल्या, ‘सगळ्यांनी मिळून सारवायचं. आम्ही, मुलांनी पण सारवलं.’
‘हार-गुच्छ केले. गाव कसं दिसतं हे कळलं, किल्ल्याची माहिती मिळाली.’
‘एवढा छोटासा किल्ला कसा बांधला असेल? गेट्र.’
 मुलांना बोलताना-सांगताना काय सांगू असं झालं होतं. पाहुणे म्हणाले, ‘मुलं इतिहास शिकली. नागरिकशास्त्र शिकली. कारण गावाचा नकाशा काढताना मुलं गावात फिरली. गाव आठवलं, मुलं गणित शिकली. कार्यानुभव शिकली, भूगोल शिकली. चार दिवसांच्या कामावर निबंध, गृहपाठ तयार करतील. कामाचा अहवाल तयार होईल. बातमी तयार करता येईल. लोकभाषा, लोकसंस्कृती. विचार केला तर किती तरी.. आता तुम्हाला काय वाटतं मुलांचा वेळ वाया गेला? अभ्यास बुडाला? की मुलं शिकली?..’’
 एकदम शांतता पसरली. शाळेने पाहुण्यांना विचारलं की, ‘तुम्ही काय करता? कुठं असता?’ पाहुणे एका लहानशा गावातल्या शाळेतच शिक्षक होते. शाळेला खूप आनंद झाला. शाळेने मुलांना एकत्र केले आणि शाळा म्हणाली, ‘घटनेकडे किती वेगळ्या नजरेने बघतो हा माणूस. आधी हा ‘माणूस’ आहे. तुम्ही मुलांनी आणि शिक्षकांनी हे समजून घ्यावं. शिकणं फक्त पुस्तकात थोडंच असतं! ते जगण्यात असतं, अनुभवात असतं, अनुभवण्यात असतं. पुस्तकात फक्त त्याचं चित्ररूप असतं.’
मुलं पटकन म्हणाली, ‘आमचीही इच्छा आहे, पण आम्ही काम केलं की आमच्या घरातले लोक म्हणतात लहान मुलांनी काम करणं चुकीचं आहे..’ हे म्हणणारी मुलं थोडी मोठी होती. शाळा मनात थोडी दु:खी झाली. मनातले भाव न दाखवता मुलांना म्हणाली, ‘मित्रांनो, श्रम तर केलेच पाहिजेत. सगळ्यांनी मिळून केले पाहिजेत. हे श्रमदान कितीतरी गोष्टी शिकवतं. त्या शिक्षक पाहुण्यांनी सांगितलेली गोष्ट किती सुंदर आहे! गेल्या चार दिवसांत सर्व सर्व विषय तुम्ही अनुभवातून एकत्रितपणे शिकलात. मजा आली. तुमच्या शिक्षकांना सांगा याचेच पाठ बनवा  आणि आमचं मूल्यमापन करा. ही बालमजुरी नाही बरे. हे आहेत अनुभवातून मिळणारे संस्कार..’
‘एखाद्या/ प्रत्येक गोष्टीकडे किती वेगवेगळ्या भूमिकेतून बघता येतं ही ‘नजर’, ही मलाच द्यायला हवी. सोच बनानी है।’ शाळा म्हणाली.
   मुलं सुखावत शांत झाली. हास्याची नि आनंदाची एक हलकीशी लाट त्यांच्या चेहऱ्यावर पाहून शाळेने तसाच प्रतिसाद दिला. अनुभवातून किती किती शिकता येतं हे समजून घेतलं तर सारं काही आनंदाने शिकता येतं. हे समजून घेतलं तर सारं काही आनंददायी बनतं.   

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Essay on My Favourite Teacher goes viral
VIRAL: ६ वीतल्या विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात; भूमिका मॅडमसाठी लिहिलेला निबंध होतोय तुफान व्हायरल
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
Printing of NCERT textbooks by private publishers without permission
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?