ch24घरातल्यांची जबाबदारी. सून, पत्नी, आई या भूमिकांवर अन्याय होऊ नये म्हणून मी बढती नाकारली. आहे त्याच पदावर राहून घराकडे लक्ष ठेवत आहे.

मी पदवीधर १९९१ ला झाले आणि जानेवारी १९९२ ला महाराष्ट्र बँकेच्या सेवेत रुजू झाले. माझं माहेर तेव्हा महाडला होतं. रायगड जिल्हय़ातील
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रोहा औद्योगिक वस्ती या शाखेत मी रुजू झाले. रोज जाऊन-येऊन करणं शक्य नव्हतं म्हणून मी रोहय़ातच एका मावशीकडे पेइंग गेस्ट म्हणून राहायला सुरुवात केली.
१९९३ साली विवाह झाला. पती धाटावला एका कंपनीत नोकरीला होते. त्यामुळे नोकरी व संसार रोहय़ात सुरू झाला. पतीने नोकरी करताना एम.कॉम. व एल.एल.बी.सुद्धा केले; पण त्यांच्या कंपनीत प्रमोशन वरिष्ठपदाप्रमाणे दिलं जात होतं. म्हणून त्यांनी २००१ मध्ये नोकरी सोडून वकिली करण्याचा निर्णय घेतला तेव्हा दुसरा मुलगा दीड वर्षांचा होता व मोठा सात वर्षांचा. नोकरी सोडून नवीन व्यवसाय सुरू करायचा हे पचनी पडायला मला वेळच लागला. मनात थोडी भीती होती, की त्यांना स्थिरस्थावर व्हायला किती वेळ लागेल? पण त्यांना खात्री होती की, यश नक्की मिळेल. त्याप्रमाणेच ते यशस्वी झालेत. त्यांचा त्या वेळचा निर्णय योग्य ठरला याची आज पावती मिळतेय!
त्यांची व्यवसायात प्रगती होत होती. पण त्याचबरोबर माझ्या कामातले बदल आणि संसारातील व्यग्रता वाढू लागली होती. पण नवीन शिकण्याची सातत्याने हौस होती. त्यातच माझ्या नोकरीच्या कामात संगणकीकरण झाल्यामुळे बदल झाले. कोअर बँकिंग झाल्यानंतर मी सगळी सिस्टीम चांगली आत्मसात केली. मी सगळी कामं शिकले. मग मलाही वाटू लागलं की, आपण बढती घेऊन अधिकारी व्हावं आणि या वर्षी मी प्रमोशनच्या परीक्षेचा फॉर्म भरला व सहज म्हणून परीक्षेला गेले. पेपर चांगला गेला होता. निकाल लागला आणि मी लेखी परीक्षेत पास झाले!
संधी आली, पण.. बढती घेतली तर दर तीन वर्षांनी बदली. मोठा मुलगा शिकायला पुण्याला असतो. धाकटा मुलगा यंदा दहावीत म्हणजे त्याचं महत्त्वाचं वर्ष. पती वकिली रोहा व पाली न्यायालयात करतात. शिवाय त्यांनी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतलेली आहे. सासूबाई पडल्यामुळे अंथरुणावर होत्या. त्या पालीला होत्या. त्यामुळे मला वरचेवर पालीला जावं लागायचं. बढती घेतली तर चौघांची तोंडं चार दिशांना होतील. मुलांकडे लक्ष देता आलं नसतं. त्यामुळे आई, पत्नी, सून या भूमिकांना न्याय देऊ शकणार नाही असे वाटू लागले.
    बँकेत काम करायला दुसरा मॅनेजर नक्कीच मिळणार, पण माझ्या घराला दुसरा मॅनेजर मिळणं कठीणच. म्हणून मी इंटरव्हय़ूला गेलेच नाही. लोकांनी मला प्रोत्साहन दिलं होतं, पण मी समाधानाचं मुकुटमणी घालायचं ठरवलं. आज तरी बढती या विषयावर पडदा पडून आहे. आहे त्या पदावर समाधान मानत ग्राहकांना उत्तम सेवा द्यायचं ठरवलं आहे.
अचला धारप, रोहा
या सदरासाठी मजकुराबरोबर आपला ई-मेल, संपर्क क्रमांक व पासपोर्ट साइज फोटो अवश्य पाठवावा. ई-मेलवर मजकूर पाठवताना- पीडीएफ  तसेच आरटीएफ याच फॉर्मेटमध्ये मजकूर पाठवावा. पाकिटावर वा ई-मेलवर ‘माझा त्याग, माझं समाधान’ लिहिणे आवश्यक.