सुमनताई महादेवकर, वय वर्षे ८१. आजही त्या वेदांचा, प्राचीन ग्रंथांचा, श्लोकांचा अभ्यास तसेच त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करणं, इतकंच नाही तर त्यावर व्याख्यानं देणं तसेच संस्कृत शिकवणं अशासारख्या ज्ञान प्रसाराच्या कामात व्यग्र आहेत. ‘योगवासिष्ठ’ या ग्रंथाचे मराठीत रूपांतर करणाऱ्या, वेदान्त विशद करण्यात कुशल अर्थात वेदान्तवागीश ही पदवी आपल्या कर्तृत्वावर मिळवणाऱ्या सुमनताईंविषयी..
योग म्हणजे आसनं, प्राणायाम..आदी. शरीर धडधाकट ठेवण्यासाठी केलेले उपाय आणि तत्त्वज्ञान, आत्मचिंतन.. ये तो अपने बस की बात नाही, या माझ्या घट्ट समजुतीला ८१ वर्षांच्या ‘वेदान्तवागीश’ सुमनताई महादेवकर यांच्या भेटीने सणसणीत सुरुंग लागला.
ज्या प्रमाणे संत जनाबाई, ‘देव खाते, देव पिते। देवावर मी निजते। देव येथे देव तेथे। देवाविण नाही रिते’ म्हणत जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी देवालाच अनुभवतात. त्याचप्रमाणे सुमनताईंनाही या जगात संस्कृत साहित्याशिवाय दुसरं-तिसरं काहीच सुचत नाही. त्यांचं आजवरचं काम (लेखन, संपादन, भाषांतर) पाहताना आपण थक्क होऊन जातो.
त्यांच्या कामाचा डोंगर असा..‘महर्षी विनोद जीवनदर्शन’, ‘धवलगिरीची वाटचाल’, ‘व्यासपौर्णिमा व्यासदर्शन’ आदी ग्रंथांचे लेखन/संपादन, वृत्तपत्रे व मासिकांमधून स्फुट लेखन, संतकृपा मासिकाच्या सहसंपादक असताना अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांच्या संपादनात सहयोग. याशिवाय सुभाषित कोश, केसरी शताब्दि-सारांशसहित विषयसूची, तीन खंडांत प्रसिद्ध झालेल्या नरसिंहकोशात संपूर्ण नरसिंहपुराणाचा मराठीत अनुवाद तसेच श्रीमद् अनिरुद्धाचार्यकृत ‘स्तोत्ररत्न व श्रीस्तुति’वरील हिंदी टीकेचे व ‘ऋषिविज्ञान संशोधन’विषयक लेखनाचे संपादन. संस्कृतइतकेच त्यांचे इंग्रजीवरही प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी स्वामिनारायण संप्रदायाच्या ‘सत्संगिजीवन’ ग्रंथातील दोन खंडांचे व गोपालानंद मुनी यांच्या संस्कृत गीताभाष्याचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. शिवाय ‘योगवासिष्ठ’ या मूळ ३२००० श्लोकांच्या महाप्रचंड ग्रंथावर संशोधन करून त्यांनी या दुबरेध व अतिविस्तृत ग्रंथाचं संक्षिप्त (८०० पानं) व प्रमाणित सार ‘सुबोध योगवासिष्ठ’ नावाने वाचकांपुढे ठेवलंय. अशा कामांसाठी अर्थातच संपूर्ण एकाग्रता लागते. म्हणून त्या मधूनमधून म्हैसूरजवळील मैलकोठे या गावातील प्राचीन संस्कृत विद्यापीठात जाऊन राहतात आणि तिथे आजही शांतपणे १२-१२ तास काम करतात. लेखनाबरोबरच त्या भगवद्गीता, श्रीमद्भागवत, योगवासिष्ठ आदी विषयांवर प्रवचनं, व्याख्यानं देत असतात. जागतिक तत्त्वज्ञान परिषद व अन्य चर्चासत्रांत त्यांना नेहमी निमंत्रण असतं. एवढंच नव्हे, तर हे सर्व व्याप सांभाळून त्या गेली २५ वर्षे पुण्याच्या नव्या पेठेतील आपल्या घरातून सिंहगड रोडवरील शारदामठात संस्कृत शिकवण्यासाठी नियमितपणे जात आहेत. आज ८१व्या वर्षीही त्यांच्या या नेमात खंड पडलेला नाही. वेदान्तवागीश म्हणजे वेदान्त विशद करण्यात कुशल. ही पदवी सुमनताईंना ‘चांदोद’ येथील श्रीवैष्णवपीठाधीश ‘श्रीमान अनिरुद्धाचार्य’ यांनी १९९५ मध्ये प्रदान केली आहे.
सुमनताई बोलू लागल्या की त्यांच्या जिभेवर सरस्वती वास करतेय हे जाणवतं. त्याबरोबर ‘विद्या विनयेन शोभते’ हे सुभाषितही त्यांना शोभून दिसतं. त्यांचा ‘सुबोध योगवासिष्ठ हा ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वी म्हणजे १९८२ साली त्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील एक प्रसिद्ध वेदान्ती पू. तात्यासाहेब वासकर महाराज यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. या भेटीसंबंधी त्या म्हणतात, ‘त्यावेळी आमची वेदान्तावर दीड तास चर्चा झाली आणि माझं भाग्य असं की महाराजांनी मला उत्तीर्ण केलं.’ शारदामठातील संस्कृत अध्यापनाविषयी त्यांचं म्हणणं, ‘तो तर मला मिळणारा सहज सत्संग आहे.’ या व्यासंगी स्त्रीचे हे विनम्र बोल ऐकताना, काहीही न बोलता फक्त त्यांचे पाय धरावे एवढीच इच्छा मनात दाटून आली.
आपल्या आध्यात्मिक वाटचालीचं श्रेय सुमनताई आपले मातापिता- आनंदीबाई आणि दत्तात्रेय बाळकृष्ण महादेवकर यांना तसंच निरंतर अभ्यासाची प्रेरणा देणारे गुरुवर्य न्यायरत्न ‘महर्षी धुंडीराज गोविंद विनोद’ यांना देतात.
त्यांची आई आनंदीबाई एक साक्षात्कारी बाई होती. तिला तिच्या पूर्वजन्मांचं ज्ञान होतं, म्हणतात. तसंच भविष्याचीही जाण होती. निरक्षर आनंदीबाई मुलांच्या पुस्तकातील एकेक अक्षर लावून वाचायला शिकल्या आणि त्यांनी पुढे अनेक ग्रंथाचं वाचन केलं. उत्तम कपडे, दागदागिने, छानछोकी यापैकी कसलाच मोह न धरता कमीत कमी गरजात आनंदाने कसं जगायचं ही सुमनताईंना आईकडून मिळालेली शिकवण. म्हणूनच आज कोणतंही निवृत्तिवेतन मिळत नसताना आपल्या तुटपुंज्या आमदनीतही त्या समाधानाने संशोधन, लेखन करत आहेत. त्यांचे वडीलही साधू वृत्तीचे. दत्ताचे भक्त. त्यामुळे आध्यात्मिक विचारांचं बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालं.
सुमनताईंचा जन्म पुण्याचा. सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमधून त्यांनी बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर तिथल्याच राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेत ४/५ वर्षे नोकरी करून त्या पुण्याला आल्या. त्या वेळी पुण्यातील एक महापंडित ‘न्यायरत्न धुंडीराजशास्त्री विनोद’ यांना त्यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाकरता लेखनिक म्हणून एका मदतनीसाची गरज होती. सुमनताई त्यांच्याकडे जायला लागल्या आणि त्यांच्या घरच्याच झाल्या. धुंडीराजशास्त्रींची पत्नी मैत्रेयी विनोद ही त्या काळी मॅट्रिकला पहिली आलेली स्त्री. या विद्वान दाम्पत्याच्या सहवासात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडत गेले. १९५९ ते १९६९ अशी १० वर्षे त्या लेखन साहाय्यक म्हणून काम करत होत्या. १९६९ मध्ये धुंडीराजशास्त्री गेल्यावर सुमनताईंनी त्यांचं काम पुढे ४/५ वर्षे सुरू ठेवलं. या लेखनामुळे संस्कृतचा व्यासंग वाढला. परिणामी १९७५ मध्ये त्यांनी ‘वेदान्त’ या विषयात ‘एम.ए.’ पूर्ण केलं.
 सुमनताईंच्या मते वेदान्त शिकण्यासाठी श्रवण, मनन व निदिध्यासन या प्रमुख पायऱ्या होत. त्या वेळी यशवंतराव मराठे नावाचे विद्वान गृहस्थ सदाशिव पेठेतील स्वत:च्या घरातच न्यायशास्त्र व वेदान्ताचे इतर ग्रंथ शिकवत असत. सकाळी ६ पासून विद्यार्थी येत. घरगुती गुरुकुलच होतं ते. वेदान्त शिकण्यासाठी न्यायशास्त्र येणं गरजेचं असल्यामुळे त्या गुरुकुलात सुमनताई सतत ४/५ वर्षे जात राहिल्या. त्याचप्रमाणे गणेशशास्त्री जोशी हे प्रवचनकार सदाशिव पेठेतील, नरसिंहाच्या देवळात ज्ञानेश्वरी, उपनिषदं, अमृतानुभव यावर प्रवचनं देत. तीही सुमनताइर्ंनी कधी चुकवली नाहीत. याशिवाय नागपूरचे सीतारामशास्त्री कुरुंदकर, सहजयोग परंपरेचे काका महाराज करमरकर व रत्नागिरीचे पुरुषोत्तम शास्त्री फडके यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभलं. अशा पूर्वतयारीमुळे वेदान्त समजून घेणं त्यांना फारसं अवघड गेलं नाही.
महर्षी व्यासांनी विभागणी केलेल्या मुख्य वेदांची सुमनताईंनी थोडक्यात ओळख करून दिली ती अशी, ‘ऋचा आणि सूक्तं यांनी बनलेला तो ऋग्वेद. यज्ञीय प्रक्रियेच्या दृष्टीने जो उपयोगी भाग आहे, तो यजुर्वेदात सापडतो. जगाचं रक्षण करणाऱ्या देवतांना संतुष्ट करण्यासाठी जे गायन केलं जातं (साम गायन) ते सामवेदात अंतर्भूत आहे तर अथर्ववेदात लौकिक जीवनासंबंधी मार्गदर्शन केलंय. या वेदात बराचसा आयुर्वेदाचाही भाग येतो.’
बोलता बोलता सुमनताइर्ंनी सर्वसामान्यांना अगम्य वाटणाऱ्या शब्दांचे सोपे अर्थ सांगितले. त्या म्हणाल्या, ‘वेद म्हणजे ज्ञान आणि वेदांचा निष्कर्ष तो वेदान्त म्हणजेच तत्त्वज्ञान. वेद, ब्राह्मण (गं्रथ) अरण्यकं, उपनिषदं, गीता.. या प्रवाहातून वेगवेगळी शास्त्रे निर्माण झाली.
महाकाय अशा ‘योगवासिष्ठ’ ग्रंथाचे सुबक, संक्षिप्त असे मराठीत रूपांतर करण्याचा बहुमान सुमनताईंकडे जातो. त्यांच्या दीर्घ अभ्यासाचा, प्रज्ञेचा, अर्थवाही लेखनशैलीचा व संपादन कौशल्याचा सवरेत्कृष्ट आविष्कार म्हणजे ‘सुबोध योगवासिष्ठ.’ त्यांच्या या ग्रंथाला टिळक, न्या. रानडे यांनी स्थापन केलेली महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा, औरंगाबादची ‘एकनाथ संशोधन संस्था’ व पू. किशोरजी व्यासांचे ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ अशा तीन मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.
सुबोध योगवासिष्ठच्या प्रस्तावनेत ‘आचार्य किशोरजी व्यास’ म्हणतात, ‘आजच्या शिक्षित पिढीने ‘द सिक्रेट’ नावाचं जे पुस्तक डोक्यावर घेतलंय, त्यातील मानसिक सामर्थ्यांच्या संकल्पनेचा विचार अनेक वर्षांपूर्वीच योगवासिष्ठात अत्यंत प्रभावीपणे मांडलाय. पण अमूल्य अशा या विचारधनाचा आम्हा भारतीयांना पत्ता नसावा हे या देशाचे दुर्भाग्यच होय!
दु:खातून सावरण्यासाठी या ग्रंथाचा कसा उपयोग होतो ते समजण्यासाठी सुमनताईंनी एक ताजा दाखला दिला. त्यांचे एक स्नेही गेल्याच वर्षी अमेरिकेला परत जाण्यापूर्वी त्यांना भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी आपला ‘सुबोध योगवासिष्ठ’ हा ग्रंथ त्यांना भेट दिला. तिकडे गेल्यावर दुर्दैवाने काही दिवसांनीच त्यांच्या एकुलत्या एका मुलाचं अपघाती निधन झालं. त्यावेळी सैरभैर झालेल्या मनाला कुठेतरी गुंतवायचं म्हणून सहजच त्यांनी तो ग्रंथ उघडला आणि वाचता वाचता मन शांत झालं. ही गोष्ट त्यांनी सुमनताइर्ंना आवर्जून कळवली आणि त्यांचे आभार मानले.
विद्याभ्यासात आकंठ बुडालेल्या सुमनताइर्ंना विवाह करावा, संसार मांडावा असं कधी वाटलंच नाही. बाह्य़ परिस्थितीतून आनंद मिळवण्यासाठी त्यांचा जन्म नाहीच. आज ८१ व्या वर्षीही त्या अत्यंत आनंदाने दिवसातले ६/७ तास वाचन, मनन, लेखन, अध्यापन करत असतात.
जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन। हाच त्यांचा
धर्म आहे.    

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!