उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्य़ातील साफीपूर भागातील परियार घाटाजवळ गंगा नदीतून गेल्या दोन दिवसांत मिळालेल्या सुमारे शंभर मृतदेहांबाबत गूढ अद्याप कायम असून याबाबत केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे.
मंगळवारी येथून ५० मृतदेह मिळाले होते तर बुधवारी आणखी ३० मृतदेह मिळाले. अजूनही आणखी मृतदेह हाती लागत आहेत. उन्नाव जिल्ह्य़ाच्या न्यायदंडाधिकारी सौम्या अग्रवाल यांनी सांगितले की, आतापर्यंत ८० मृतदेह मिळाले असून आणखी मृतदेह हाती लागत आहेत. इतके मृतदेह एकाच ठिकाणी कसे आणि कोठून वाहून आले याचे गूढ अद्याप उकललेले नाही.
 पोलीस महानिरीक्षक ए. सतीश गणेश यांनी सांगितले बहुतेक मृतदेह अविवाहित मुली आणि लहान मुलांचे आहेत आणि ते खूपच सडलेल्या अवस्थेत आहेत. काही मृतदेह इतके छिन्नविच्छिन्न आहेत की त्यांचा लिंगभेद करणेही अवघड आहे.
 मृतांच्या नातेवाईकांनी अंत्यविधीचा भाग म्हणून त्यांना नदीत विसर्जित केल्यासारखे वाटते. अग्रवाल म्हणाल्या की मृतदेहांचे शवविच्छेदन करणे अवघड आहे. त्यामुळे डीएनए नमुने गोळा केले जात आहेत.
 मुख्य वैद्यकीय अधिकारी गीता यादव यांच्या अध्यक्षतेखालील पथक न्यायवैद्यक नमुने गोळा करत आहे. मृतदेह फारच सडले असल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी ते बाहेर काढण्यास नकार दिला आहे.
शुद्धीकरणाचे काय?
नवी दिल्ली : गंगा शुद्धीकरणाचा कार्यक्रम गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून सुरू असूनही त्याचा विशेष परिणाम जाणवत नाही, सरकारला आपल्या याच कार्यकाळात या बाबत काही करावयाचे आहे, की पुढील कार्यकाळात हा कार्यक्रम ढकलण्यात येणार आहे, असा आश्चर्ययुक्त सवाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केला.