‘किंग कोब्रा’ या प्रजातीचा साप हा जगातील सर्वाधिक लांबीचा विषारी साप म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये सर्वसाधारण १० फुटापर्यंत या प्रकाराचा साप आढळतो. मात्र आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात तब्बल १५ फुटाचा किंग कोब्रा आढळला आहे. हा दुर्मिळातील दुर्मीळ प्राणी असल्याचे प्राणितज्ज्ञांचे मत आहे.
पूर्व गोदावरी जिल्ह्यातील रामपाचोदावरम गावातील निवास भागात हा साप आढळला. या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला आपल्या घराजवळ सापाचा फूत्कार ऐकू येत होता. त्याने तात्काळ याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाने तब्बल चार तासांच्या परिश्रमानंतर या सापाला पकडण्यात यश मिळवले. पकडलेला साप ही मादी असून, गर्भवती असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विशाखापट्टणमच्या प्राणिसंग्रहालयात या सापाला ठेवण्याचा विचार होता, जेणेकरून तो प्रेक्षकांना पाहता येईल. मात्र प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाने हा साप ठेवण्यास असमर्थता दर्शविली. हा साप प्राणिसंग्रहालयातील अन्य प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकतो, त्याशिवाय त्याला सांभाळणे परवडण्यासारखेही नाही, अशी सबब प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून सांगण्यात आली. त्यामुळे या सापाला विशाखापट्टणम आणि पूर्व गोदावरी जिल्ह्यादरम्यान असलेल्या घनदाट जंगलात सोडून देण्यात आले.
ऑस्ट्रेलियामध्ये सर्वसाधारण १५ ते १८ फुटांपर्यंत किंग कोब्रा आढळतात. मात्र भारतात एवढय़ा लांबीचा हा साप आढळल्याने हे एक आश्चर्यच आहे, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.