उत्तर इराकमध्ये आत्मघाती अंगरखे परिधान केलेल्या बंदूकधाऱ्यांनी किरकुक या कुर्दीशांच्या ताब्यातील शहरात सरकारी इमारतींना लक्ष्य केले. त्यात इराणच्या कंपनीतर्फे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्फोटात १६ जण ठार झाले. हल्ल्याची जबाबदारी अजून कुणी घेतली नसून हे हल्ले आयसिसने केले असण्याची शक्यता आहे.

इराकमधील अखेरचा बालेकिल्ला राखण्यासाठी आयसिसचे प्रयत्न सुरू आहेत. एका हल्ल्यात तीन घुसखोर वीज केंद्रात घुसले व स्फोट केला. किरकुकच्या वायव्येला चाळीस किलोमीटर अंतरावर हा हल्ला करण्यात आला. तीन आत्मघाती हल्लेखोरांनी सकाळी सहा वाजता वीज केंद्रावर केलेल्या हल्ल्यात १२ अभियंते व प्रशासक तसेच चार तंत्रज्ञ ठार झाले आहेत, असे दिबीसचे महापौर अब्दुल्ला नुरेद्दीन अल सलेही यांनी सांगितले.

मृतांच्या संख्येला पोलिस लेफ्टनंट कर्नलने दुजोरा दिला असून महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांनी एका हल्लेखोराला ठार करण्यात यश मिळवले पण इतर दोघांनी आत्मघाती स्फोट घडवले. त्या आधी काही तास आत्मघाती हल्लेखोराने किरकुक येथे अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. कुर्दीश गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितले, की सात आत्मघाती हल्लेखोरांनी पहाटे तीन वाजता पोलिस मुख्यालयावर हल्ला केला. या वेळी सुरक्षा दलांनी एकाला ठार केले नंतर त्यांची सुरक्षा दलांशी चकमक झाली. पाच तास धुमश्चक्री सुरू होती. किरकुकमध्ये संचारबंदी लागू केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.